हे दोन शब्द सध्या महाराष्ट्रातून कानावर पडत आहेत, एका शब्दाचं गारुड आणि दुसऱ्यातून; जो त्याच्या अर्थातच दडलेला असा रागाचा सूर अनुभवायला मिळत आहे. या दोन्ही शब्दांचा संबंध एकाशीच आहे, "सैराट".(Sairat).
भन्नाट दिग्दर्शक नागराज मंजुळेंचा हा चित्रपट सध्या सैराट होऊन धुमाकूळ घालतो आहे. 'An epic love story' अशी ओळ लिहून ज्याप्रमाण याचं जोरदार प्रमोशन केलं गेलं, त्याचप्रमाणं महाराष्ट्र त्याला डोक्यावर घेताना दिसत आहे. कारण अजय-अतुल यांचं बहारदार संगीत, सिनेमाला असलेला स्पेशल 'नागराज' टच, सुंदर चित्रीकरण आणि करमाळ्यातली सुंदर लोकेशन्स यामुळे खरंच 'याड लागलंय'. याचं कौतुक करावं तितकं कमी आहे. या चित्रपटाची संकल्पना ज्यावर आधारित आहे ती नाजूक भावना साधं आयुष्य कसं सैराट बनवते याचा हा लेखा-जोखा. 'प्रेमात असते मृदुता; कठोरताही असते, फुलाप्रमाणे नाजूक प्रेम पाषाणाला ही भेदू शकते' या कुण्या कवीच्या वाचलेल्या ओळींचा प्रत्यय हा सिनेमा बघताना येतो. या चित्रपटाला असलेला मराठी उसाचा गोडवा आणि त्याला येणारा कस्तुरीचा वास पार जर्मनीमध्ये ही दरवळला आणि बर्लिनकर ही त्यामुळे झिंगाट झाले; दणक्यात प्रीमियर पार पडला. प्रमोशनवेळी दिलेल्या मुलाखतीत नागराज म्हणतात तसं त्यातलं परश्या - आर्चीचं प्रेम प्रेक्षकांना आपलस वाटून जात आहे. आकाश ठोसर-रिंकू राजगुरू या दोघांचा पहिल्याच प्रयत्नातला अभिनय अतिशय सुंदर आहे, त्याबद्दल अभिनेता आणि अभिनेत्रींचं सगळीकडून कौतुक होत आहे. रिंकू-प्रेरणाने तर पहिल्याच चेंडूंमध्ये राष्ट्रीय पुरस्काराचा षटकारच मारला. संगीत - अजय अतुल (Ajay - Atul) म्हणलं की पुढं काही बोलायचीच गरज आहे असं वाटत नाही. "याड लागलं" आणि "सैराट झालं जी" यातली सिंफनी, "आता ग बयाचा" रॉक बाज आणि "झिंगाट"वर तर तरुण, म्हातारे-कोतारे, बाया बापड्या सगळीच हौस फिटे पर्यंत नाचत आहेत. या द्वयींच्या संगीताची गोडी शब्दांत मांडणं अवघड आहे, कारण त्याचा केवळ अनुभव घ्यावा आणि तृप्तता मिळवावी. हा सिनेमा प्रेम रसात ओतप्रोत न्हाऊन गेलेला आहेच पण शृंगार, करुण ,वीर, रौद्र, हास्य आणि शेवटी पसरणारी भयाण शांतता इ.रसांचा नागराज यांनी सुरेख मेळ घातलेला आहे. एकूणच पब्लिकच्या तोंडून ऐकायला मिळत आहे, "झालय झिंग झिंग झिंगाट....."
आता या झिंगाट मध्ये बॉयकॉटचा विषय कुठून आला? वर तोंड भरून कौतुक केल्यानंतर बहिष्कार करण्यासारखं आहेच काय यांत? आले ना हे प्रश्न डोक्यात? बघितल्यानंतर मलाही हे उमगत नव्हतं की बॉयकॉट कशासाठी? नंतर समजलं की सैराटच्या पटकथेत उच्च जातीत जन्मलेेली तरुणी व नीच जातीत जन्मलेल्या तरुणाची प्रेमकथा आहे, प्रेमासाठी घर-दार सोडणं याला समर्थन करायचं? का? हा संस्कृतीवर घाला आहे. तसंच यामुळं तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या मुला-मुलींवर वाईट संस्कार होतील, सिनेमा बघून ते असंच काही भलतं-सलतं करतील. "V" किंवा "Mtv" वरचे थिल्लर कार्यक्रम तरुण पिढी आवडीने पाहते त्याच्याकडे काणाडोळा का? तेंव्हा संस्कार आडवे येत नाहीत? गद्धे पंचविशी येईपर्यंत २-३ वेळा ब्रेकअप , पॅचअप होऊन जातं आणि प्रेमिकांनी "चिल्ल" मारलेलं असतं याचा थांगपत्ता असतो कुणाला? चित्रपटात प्रेमाचा ओलावा जसा दाखवला तसे नंतर वास्तवाचे चटके सुद्धा कसे बसतात यावर ही प्रकाश टाकण्यात आला आहेच की, मग प्रेम करावं की नको हा ज्याचा त्याचा प्रश्न!
जातीयवाद पसरवतात म्हणून एकीकडे राजकारण्यांना शिव्या द्यायच्या आणि आपण त्याच पंक्तीला जाऊन बसायचं, हा विरोधाभास कसा कायजमतो आपल्याच लोकांना? हो आपल्याच लोकांना! कारण सारे भारतीय 'माझे' बांधव आहेत. तर या आपल्याच लोकांनी तुमचे सावरकर आणि आमचे बाबासाहेब हे केलंच आहे पण आता कलाकृतींच्या बाबतीत ही? का? आमची 'कट्यार' तुमचा 'सैराट' हा 'ट्रेंड' येऊ द्यायचा नाही. नागराज यांनी भीषण वास्तव, खोटी प्रतिष्ठा , विखारी मानसिकता मांडली तर बिघडलं कुठं? जे चित्रपटाच्या शेवटाचं समर्थन करणाऱ्या तथाकथित उच्चंवर्णीय अशा दोन्ही जातींमधले लोक म्हणतात की दलित - उच्चवर्णीय यांनी लग्न केल्याचा परिणाम असाच होणार! मग कोल्हापुरातील विवाहित ब्राह्मण तरुण - मराठा तरुणी ते ही असेच दुर्दैवी ठरले. त्याबाबत काहीच अवाक्षर नाही. या मानसिकतेच्या त्रासातून बाजीराव-मस्तानी किंवा पठ्ठे बापूराव-पावळा सुटले नाहीत तर आर्चि- परश्याची काय बात महाराजा! म्हणूनच सोशल मीडियावर #boycottsairat पाहायला मिळत आहे.
यासाठी नागराजला एकट्यालाच का जबाबदार धरायचं? निर्माते निखिल साने आणि नितीन केणीही आहेतच की!
आपल्या देशात चांगल्या परंपरा आहेत त्यामुळंच आपली संस्कृती टिकली आहे, पण त्यासोबत विषारी मानसिकता बाळगणे, खोट्या प्रतिष्ठेपायी प्रेमिकांचा बळी घेणे, जातीयवाद याचीही जपणूक होत आहे ,हे वाईट आहे.
एकीकडे संवेदनशीलता, प्रेम, नवं काही करण्याची उर्मी आणि दुसरीकडे खोटी प्रतिष्ठा, जातीयवाद आणि विषारी मानसिकता. बॉयकॉट कशाचा करायचा? हे सुज्ञांस सांगणे न लगे!
