२०२० या सालातले पहिले २ महीनेच काय ते
चांगले गेले असतील, आपण गेले काही महीने लॉकडाऊनमध्येच काढले. कोरोनानं (Corona) सगळ्यांना
हैराण करून टाकलं आहे. आपली जीवनशैली पुर्णपणे बदलून गेलेली आहे. आता जरी सगळं
अनलॉक होत असलं तरी परिस्थिती अजूनही गंभीर आहे. सोशल डिस्टन्सिंग (Social Distancing) ही फार महत्वाची
गोष्ट आहे हे सारखं बिबवण्याचं काम खुद्द बच्चन साहेबही करत आहेत. एकमेकांपासून
दूर राहणं हे आरोग्याच्या कारणास्तव खूपच आवश्यक झालेलं आहे,
सोशल डिस्टन्सिंग कायदाच झाला आहे. तो आपण पाळत नाही ही गोष्ट वेगळी. पण या अशा
काळातही काही माणसं ही परस्परांच्या कायमची जवळ आलेली आहेत. त्यांनी आयुष्यभर
एकत्र राहण्याच्या, सुख दुःखात भागीदार होण्याच्या आणाभाका
घेतल्या आहेत. तसा आपल्याकडे वर्षातले चातुर्मास आणि पौष (हे मराठी महीने आता
लक्षात असण्याचं आता काही कारण नाही, या गोष्टींकडे लक्ष
दिलं की सनातनी/प्रतिगामी हा टॅग बसू शकतो.) सोडले तर बाकीचे दिवस लगीनसराईचा मौसम
असतो, पण यावर्षी या काळातही जोडप्यांचे विवाह झाले. त्यांना आशिर्वाद देण्यासाठी दोन्ही बाजूची मोठी माणसं हजर राहू शकली
नाहीत. घरात लग्न आहे म्हणजे नुसती धांदल, गडबड ज्याला लगीनघाई असं गोंडस नाव आहे, ती नव्हती.
लगीनघर लांबूनही लक्षात येऊ शकतं पण ती बहु गलबला करणारी पाहुणे मंडळी जमू शकली नव्हती.
आता तीच नाहीत मग त्यांचं आगत-स्वागत पाहुणचार करण्याचीही संधी नाही. पंगती नाहीत
म्हणून त्यातला आग्रह नाही. वरात नाही, वरातीतला नाच नाही.
ही ‘नाही’ ची तशी यादी मोठी आहे.
म्हटलं ना गोष्टी बदलल्या आहेत, बदलाव्या लागल्या आहेत. पण
तो बदलही सकारात्मक होता, आनंददायी होता. आमचा एक मित्र श्रेयस लोखंडे; पेशानं फोटोग्राफर आहे, त्यानं नामी शक्कल लढवून
यावर मात केली. पठठ्यानं स्पेशल लॉकडाऊन विवाह सोहळ्याला वधू-वराच्या सर्व
पै-पाहुण्यांना उपस्थित राहण्याची सोय केली, त्यानं त्या
लग्नाचं यू ट्यूब लाईव (Youtube live) प्रक्षेपण केलं. सर्वांनी जोडप्याच्या
डोक्यावर आभासी/वर्चुअल अक्षता टाकल्या व आशिर्वाद मात्र खरेखुरे दिले. वृत्तपत्रांनी
या प्रक्षेपणाची दखल घेतली यासाठी श्रेयसचं कौतूक झालं. एक नवीन पद्धत पडली, वेळ काळाप्रमाणे असे बदल हे होत असतात.
स्रोत : साभार इंटरनेट
पण… पण काय?... हा पण फार महत्वाचा आहे, काय आहे लग्न म्हणजे हम आपके हैं कौन/ हम हम साथ साथ हैं सारखंसगळं गुडी गुडी होत असतं असं लहानपणी वाटायचं पण या प्रकरणाच्या सुरूवातीला,
याच्यादरम्यान किंवा ऐन समारंभात फोटोसेशनसाठी हसरे चेहरे ठेवले जातात खरे पण
पडद्यामागं बरीच उलथापालथ सुरू असते. नक्की काय होतं हे समजून घेण्यासाठी अ पासून सुरू करू. लग्न ठरणं हे नशीब आणि काय ते योग वगैरे
असतं हे खरतर या वाक्यापासून हे सुरू होतं, 'प्रेम-विवाह' (Love marriage) या बद्दल वेगळा लेख लिहावा लागेल. तो यातला विषय नाही तर 'लग्न ठरवणं' या विषयात
सुरुवातीपासूनच एकांकिका किंवा २ ते ३
अंकांपेक्षा जास्त नाटकं चालतात. श्रीमंत-अतिश्रीमंत यांची बातच वेगळी.. हा विषय
सर्वसाधारणपणे मध्यमवर्गीय लोकांचा आहे त्यांच्यातल्या उच्च आणि निम्न ही वर्गवारी
लक्षात घेऊन मांडण्याचा प्रयत्न आहे. ज्या लोकांना एकत्र
राहून संसार करायचा आहे, त्यांनी एकमेकांना समजून घेण्यासाठी ठराविक वेळ
घेणं आणि तो ही लग्नाआधी. टीव्हीवर “स्वभाव जुळतात की नाही हे कसं
कळेल” अशी जाहिरात केली जाते, पण जुळवून कुठं आणि कसं
घ्यायचं याची मुलगा आणि मुलगी यांना कितपत कल्पना आहे? एकतर
या मध्यमवर्गातले तरुण-तरुणी पदवी-पदव्युत्तर शिक्षणाच्या निमित्तानं परदेशी किंवा
निदान पुणे-मुंबई सारख्या मोठ्या शहरांत जातात. फक्त महाराष्ट्राचा विचार करता कोकणपट्टा, पश्चिम-उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागांतून पुण्या-मुंबईत आलेली ही तरुण मंडळी लग्नाआधी फक्त
मुलगा आणि मुलगी भेटणार असं म्हंटलं तर ही असली थेरं, तिकडं पुण्या-मुंबईत भेटणार
असाल तर करायची इथं नाही अशी सुरुवात होते आणि तिथल्या बोलीभाषेतल्या अस्सल
शिव्या देऊन शेवट होतो. हे असं आता अजिबात होत नाही हे कुणी म्हणालं तर खूप चांगलं
वाटेल. शादी मे जरूर
आनाच्या (Shadi mein jarur aana) राजकुमारराव आणि कीर्ती खरबंदा सारखं थोड्या प्रमाणात काही मुलं-मुली असं करत असावेत.
स्रोत : साभार इंटरनेट
पण काय करायचं भेटून…
त्यानं काय होणार? लग्नाआधी मुलगा-मुलगी किती वेळा भेटतात? काय काय बोलतात? आपले सद्गुण-दुर्गुण याबद्दल किती
आणि कसं बोलतात हे फार महत्वाचं आहे. आपले गुण म्हणजे चांगले गुण काय आणि दोष काय
याबद्दल त्यांना स्वतःला कितपत माहिती आहे? होणार्या
बायकोकडून-नवर्याकडून काय काय अपेक्षा आहेत? बरं या अपेक्षा
वास्तवात पूर्ण होणार्या आहेत का? त्या दोघांनी याचा नीट विचार
केला आहे का? कारण एकमेकांना समजून घेणं म्हणजे काय व ते कसं
घ्यावं? याची संबंधित मुलगा व मुलगी यांना कितपत माहिती आहे? हे एकमेकांना भेटण्याआधी याची नीट माहिती घेतली पाहिजे. मुळात वास्तव काय आहे की कोकण, पश्चिम व उत्तर
महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागात
राहणार्या मुलींना मुलगा मोठ्या शहरातला पाहिजे, त्याचं
तिशीच्या वयात पुण्या-मुंबईत घर पाहिजे, गलेलठ्ठ पगार पाहिजे, भरीस भर आई-वडील मूळ गावातून इथं यावेत की नाही हा अजून भाग वेगळाच आहे.
तसंच मुलांचं म्हणाल तर इथे बघितलेली अस्सल शहरी प्रेक्षणीय स्थळं याच्याशी
मुळगावातल्या स्थळाची तूलना होते. बरं लग्नानंतर बायकोला गृहीत धरणं, आपलं म्हणणं तिने कायमच ऐकलं पाहिजे... वगैरे वगैरे.. अशी पुरषी मानसिकता, आर्थिक-व्यावहारिक
बाबी बघण्याबरोबरच दोघांनी एकमेकांचे भावनिक दृष्टिकोनही कसे आहेत त्याचबरोबर आपापल्या पूर्वआयुष्याबद्दल माहिती करून घेणं गरजेचं
आहे. कारण आजकाल अफेअर (affair) असणं ही बाब साधारण झाली आहे, आजवर
किती झाली आहेत? मग ब्रेक-अप का झाले वगैरे.. त्याबरोबरच
व्यसनाधिनता ही आहे, त्या बद्दलही बोललं गेलं पाहिजे.
आधीच्या जमान्यात कशी स्वयंवरं होत होती, आपला नवरा निवडण्याचं स्वातंत्र्य महिलांना होतं पण नंतर परिस्थिती बदलली...पण....पण काय? आता पुन्हा ती बदलायला पाहिजे. दोघांनाही ते स्वातंत्र्य असायला हवं...त्यासाठी एकमेकांना जाणून आणि पारखून घेतलं पाहिजे. पण जाणून घेणे आणि पारखून घेणे या दोन्ही गोष्टी मोठ्यांनी त्या दोघांना शिकवल्या पाहिजेत. अफेअर मध्ये, व्यसनं करताना जशी सहजता असते, अगदी तीच सहजता लग्नाआधी पासून असली ना तर नंतर नातं ओढून-ताणून टिकवण्याची गरज पडत नाही. या सर्व नमूद केलेल्या गोष्टी खाजगी आहेत, यांवर हवा तसा निर्णय ज्याचा त्याने घ्यावा पण लिहिण्याचा अट्टहास एवढ्याचसाठी केला आहे की दोघांचं आयुष्य सुखी-आनंदी झालं पाहिजे आणि ते करणं हे त्या दोघांच्याच हातात आहे.
आधीच्या जमान्यात कशी स्वयंवरं होत होती, आपला नवरा निवडण्याचं स्वातंत्र्य महिलांना होतं पण नंतर परिस्थिती बदलली...पण....पण काय? आता पुन्हा ती बदलायला पाहिजे. दोघांनाही ते स्वातंत्र्य असायला हवं...त्यासाठी एकमेकांना जाणून आणि पारखून घेतलं पाहिजे. पण जाणून घेणे आणि पारखून घेणे या दोन्ही गोष्टी मोठ्यांनी त्या दोघांना शिकवल्या पाहिजेत. अफेअर मध्ये, व्यसनं करताना जशी सहजता असते, अगदी तीच सहजता लग्नाआधी पासून असली ना तर नंतर नातं ओढून-ताणून टिकवण्याची गरज पडत नाही. या सर्व नमूद केलेल्या गोष्टी खाजगी आहेत, यांवर हवा तसा निर्णय ज्याचा त्याने घ्यावा पण लिहिण्याचा अट्टहास एवढ्याचसाठी केला आहे की दोघांचं आयुष्य सुखी-आनंदी झालं पाहिजे आणि ते करणं हे त्या दोघांच्याच हातात आहे.
क्रमशः......

