गुरुवार, २६ नोव्हेंबर, २०२०

काय सांगते संविधानाची उद्देशिका? - भाग २

                       
                           ( स्त्रोत : साभार इंटरनेट )

 भाग १ च्या पुढे.....

स्वातंत्र्य- स्वातंत्र्य (liberty) म्हणजे व्यक्तीच्या कृतीवर बंधन न घालणे व त्याचबरोबर वैयक्तिक प्रगतीच्या संधीची उपलब्धता करून देणे. सर्व भारतीय नागरिकांना त्यांच्या मूलभूत हक्कांद्वारे विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा, विश्वास व प्रार्थना या गोष्टींचे देण्यात आलेले स्वातंत्र्य याचे रक्षण उद्देशिका करते. ज्याला जे वाटेल ते करण्याचा परवाना म्हणजे स्वातंत्र्य नव्हे, आपल्याला याचा उपभोग संविधानाच्या चौकटीत राहूनच घेता येतो.  स्वातंत्र्य या संकल्पनेचा उद्देशिकेमध्ये सखोल विचार करून समावेश करण्यात आला आहे, मूलभूत हक्क हे परिपूर्ण नसले तरी योग्य आहेत.

समानता/समता- समाजातल्या कोणत्याही ठराविक वर्गाला विशेषाधिकार नसणे म्हणजे समता (equality), कोणत्याही भेदभावाशिवाय पुरेश्या संधी सर्वांना उपलब्ध करून देणे. सर्व भारतीय नागरिकांना दर्जा आणि संधीची समानता उद्देशिकेद्वारे प्रदान केली गेली आहे. या तरतूदीमध्ये समानतेचे ३  प्रकार समाविष्ट आहेत, - नागरी, राजकीय आणि आर्थिक.
- कायद्यापुढे सर्व समान (कलम १४)
- जाती, धर्म, वर्ण, लिंग किंवा जन्म स्थळ यापैकी कोणत्याही बाबींवरून होणाऱ्या भेदभावावर प्रतिबंध. (कलम १५)
- रोजगाराच्या संधीची समानता (कलम १६)
- अस्पृश्यतेचे उन्मूलन/अस्पृश्यता नष्ट करणे (कलम १७)
- किताब/उपाधी नष्ट करणे (कलम १८)- रावबहाद्दूर, राय साहब इ. अशा सर्व उपाध्या- पदव्या यांचा वापर न करणे, केवळ सैन्यदल व शैक्षणिक पात्रता सांगणाऱ्या पदव्या वापरात असाव्यात.
वरील मुद्दे सामाजिक एकतेबद्दल माहिती देतात.
*कलम ३२५ प्रमाणं कोणतीही व्यक्ती तिच्या जात, धर्म, पंथ, वर्ण व लिंग या गोष्टींमुळे निवडणूक-मतदान प्रक्रियेपासून वंचित राहू शकत नाही.
*कलम ३२६ सांगतं की लोकसभा आणि विधानसभा यांच्या निवडणुका या प्रौढ मताधिकाराप्रमाणे व्हाव्यात.
ही झाली राजकीय समता.
राज्याची मार्गदर्शक तत्वे कलम ३९ नुसार नागरिक म्हणजे  सर्व पुरुषांना स्त्रियाही राज्यसरकार जीवनोपयोगी सर्व साधने
उपलब्ध करून देईल व समान कामासाठी समान वेतन देईल.
म्हणजे हा विषय आर्थिक समतेचा आहे.

बंधुता - (fraternity) आपण नागरिकतेच्या रकान्यात फक्त भारतीय लिहितो, म्हणजे एकेरी नागरिकत्व यातूनच राज्यघटना बंधुभावाला उत्तेजन देते. मूलभूत कर्तव्ये (कलम ५१-अ) सांगतात की प्रत्येक भारतीय नागरिकाचं हे कर्तव्य आहे की जरी भाषा, धर्म, प्रदेश यांमध्ये जरी विविधता असली तरी सर्व भारतीय लोकांमध्ये सुसंवाद आणि बंधूभाव याचा प्रचार करणे.
उद्देशिका म्हणते की बंधुता या संकल्पनेत दोन गोष्टी समाविष्ट होतात, पहिली म्हणजे व्यक्तीची प्रतिष्ठा आणि देशाची एकात्मता किंवा अखंडता आणि दुसरी एकता. 'एकात्मता' हा शब्द ४२व्या घटना दुरुस्ती (१९७६) नुसार अंतर्भूत करण्यात आला.
के. एम्. मुन्शी (संविधानसभेच्या मसुदा समितीचे सदस्य) म्हणत की 'व्यक्तीची प्रतिष्ठा' हे सुचवते की राज्यघटना ही फक्त लोकशाहीची चौकट सांभाळणं व भौतिक जगातली उत्तमता ठरवणं इतकंच काम करत नाही तर व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं माहात्म्य ही ओळखून आहे. 
'देशाची एकता आणि अखंडता' ही संकल्पना एकीकरणाच्या प्रादेशिक आणि मानसिक दृष्टीकोन यांकडे निर्देश करते. राज्यघटना कलम १ मध्ये सांगितलं आहे की 'भारत हे राष्ट्र म्हणजे  राज्यांचा संघ आहे', यातून कोणतेही राज्य बाहेर पडू शकत नाही. यावरून अखंडता कशी अबाधित आहे हे लक्षात येऊ शकतं व पर्यायाने सांप्रदायिकता, प्रदेशवाद, जातीवाद, भाषावाद आणि फुटीरतावादावर विजय मिळवता यावा हा उद्देश आहे.
       ही उद्देशिका आणि त्यातले हे शब्द जे आपण समजून घेतले, आता घटना समितीचे जे विविध सदस्य होते त्यांनी या उद्देशिकेचं खूप कौतुक केलं आहे. त्यांच्याबद्दलची जी मतं मांडली ती थोडक्यात समजून घेऊ की, ही उद्देशिका आपल्याला राजकीय, धार्मिक व नैतिक मूल्यं याबद्दल माहिती देते. आम्ही घटनकारांनी जे विचार केले होते; सशक्त,सार्वभौम, लोकशाही देशाचं स्वप्न पाहिलं होतं तेच विचार या उद्देशिकेत आहेत. ती आपल्या देशाची खरी कुंडली आहे. ती संविधानाची चावी आहे. तो एक रत्न हार आहे. हिदायतूल्लाह या सर्वोच्च न्यायालयाच्या माजी सरन्यायाधीशांनी असं म्हटलं की ही उद्देशिका म्हणजे अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा जसा आहे तशीच आहे. पण त्यातल्या मूल्यांमुळे ती जाहिरनाम्यापेक्षा ही वरचढ आहे. तो संविधानाचा आत्मा आहे.
      आपण जिच्याबद्दल इतकं बोलतोय ती उद्देशिका, त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्यात असा निकाल दिला की उद्देशिका हा संविधानाचा भाग नाही(बेरुबारी १९६०) कारण यातल्या शब्दांचे एकाहून अधिक अर्थ निघतात व जेंव्हा गरज पडेल तेंव्हा या उद्देशिकेच्या शब्दांचे योग्य अर्थ समजून घेण्यासाठी तज्ज्ञांची मदत घ्यावी. पुढे केशवानंद भारती यांच्या खटल्यात कोर्टाने आपलं मत बदललं आणि सांगितलं उद्देशिकेला खूप महत्व आहे व तो संविधानाचा अविभाज्य भाग आहे. या उद्देशिकेची सुद्धा दुरुस्ती केली आहे. १९७६ मध्ये झालेली ४२ वी घटना दुरुस्ती (42nd Constitutional amendment) ही प्रसिद्ध आहे. त्यात समाजवादी, धर्मनिरपेक्ष व एकात्मता असे शब्द समाविष्ट केले गेले. संविधानात कलम क्र. ३६८ नुसार घटना दुरुस्ती केली जाते. संविधान बदललं जाईल या अपप्रचाराला बळी पडता कामा नये, कारण जशी उद्देशिकेत केली तशीच राज्यघटनेतही दुरुस्ती होऊ शकते. व ती ग्राह्य धरायची की नाही यांवरही निर्णय होऊ शकतो. संविधानाची मूलभूत चौकट कधीच बदलली जाऊ शकत नाही…
      म्हणूनच संविधान सर्वोपरी!.!.! जय संविधान!.!.!

बुधवार, ११ नोव्हेंबर, २०२०

हे बदललं कोरोनामुळे पण...पण काय? भाग - १


    २०२० या सालातले पहिले २ महीनेच काय ते चांगले गेले असतील, आपण गेले काही महीने लॉकडाऊनमध्येच काढले. कोरोनानं (Corona) सगळ्यांना हैराण करून टाकलं आहे. आपली जीवनशैली पुर्णपणे बदलून गेलेली आहे. आता जरी सगळं अनलॉक होत असलं तरी परिस्थिती अजूनही गंभीर आहे. सोशल डिस्टन्सिंग (Social Distancing) ही फार महत्वाची गोष्ट आहे हे सारखं बिबवण्याचं काम खुद्द बच्चन साहेबही करत आहेत. एकमेकांपासून दूर राहणं हे आरोग्याच्या कारणास्तव खूपच आवश्यक झालेलं आहे, सोशल डिस्टन्सिंग कायदाच झाला आहे. तो आपण पाळत नाही ही गोष्ट वेगळी. पण या अशा काळातही काही माणसं ही परस्परांच्या कायमची जवळ आलेली आहेत. त्यांनी आयुष्यभर एकत्र राहण्याच्या, सुख दुःखात भागीदार होण्याच्या आणाभाका घेतल्या आहेत. तसा आपल्याकडे वर्षातले चातुर्मास आणि पौष (हे मराठी महीने आता लक्षात असण्याचं आता काही कारण नाही, या गोष्टींकडे लक्ष दिलं की सनातनी/प्रतिगामी हा टॅग बसू शकतो.) सोडले तर बाकीचे दिवस लगीनसराईचा मौसम असतो, पण यावर्षी या काळातही जोडप्यांचे विवाह झाले. त्यांना आशिर्वाद देण्यासाठी दोन्ही बाजूची मोठी माणसं हजर राहू शकली नाहीत. घरात लग्न आहे म्हणजे नुसती धांदल, गडबड ज्याला लगीनघाई असं गोंडस नाव आहे, ती नव्हती. लगीनघर लांबूनही लक्षात येऊ शकतं पण ती बहु गलबला करणारी पाहुणे मंडळी जमू शकली नव्हती. आता तीच नाहीत मग त्यांचं आगत-स्वागत पाहुणचार करण्याचीही संधी नाही. पंगती नाहीत म्हणून त्यातला आग्रह नाही. वरात नाही, वरातीतला नाच नाही. ही नाही ची तशी यादी मोठी आहे. म्हटलं ना गोष्टी बदलल्या आहेत, बदलाव्या लागल्या आहेत. पण तो बदलही सकारात्मक होता, आनंददायी होता. आमचा एक मित्र श्रेयस लोखंडे; पेशानं फोटोग्राफर आहे, त्यानं नामी शक्कल लढवून यावर मात केली. पठठ्यानं स्पेशल लॉकडाऊन विवाह सोहळ्याला वधू-वराच्या सर्व पै-पाहुण्यांना उपस्थित राहण्याची सोय केली, त्यानं त्या लग्नाचं यू ट्यूब लाईव (Youtube live) प्रक्षेपण केलं. सर्वांनी जोडप्याच्या डोक्यावर आभासी/वर्चुअल अक्षता टाकल्या व आशिर्वाद मात्र खरेखुरे दिले. वृत्तपत्रांनी या प्रक्षेपणाची दखल घेतली यासाठी श्रेयसचं कौतूक झालं. एक नवीन पद्धत पडली, वेळ काळाप्रमाणे असे बदल हे होत असतात.
   

  
                                                   स्रोत : साभार इंटरनेट
  
   पण पण काय?... हा पण फार महत्वाचा आहे, काय आहे लग्न म्हणजे हम आपके हैं कौन/ हम हम साथ साथ हैं सारखंसगळं गुडी गुडी होत असतं असं लहानपणी वाटायचं पण या प्रकरणाच्या सुरूवातीला, याच्यादरम्यान किंवा ऐन समारंभात फोटोसेशनसाठी हसरे चेहरे ठेवले जातात खरे पण पडद्यामागं बरीच उलथापालथ सुरू असते. नक्की काय होतं हे समजून घेण्यासाठी अ पासून सुरू करू. लग्न ठरणं हे नशीब आणि काय ते योग वगैरे असतं हे खरतर या वाक्यापासून हे सुरू होतं, 'प्रेम-विवाह' (Love marriage) या बद्दल वेगळा लेख लिहावा लागेल. तो यातला विषय नाही तर 'लग्न ठरवणं' या विषयात सुरुवातीपासूनच एकांकिका किंवा २ ते ३ अंकांपेक्षा जास्त नाटकं चालतात. श्रीमंत-अतिश्रीमंत यांची बातच वेगळी.. हा विषय सर्वसाधारणपणे मध्यमवर्गीय लोकांचा आहे त्यांच्यातल्या उच्च आणि निम्न ही वर्गवारी लक्षात घेऊन मांडण्याचा प्रयत्न आहे. ज्या लोकांना एकत्र राहून संसार करायचा आहे, त्यांनी एकमेकांना समजून घेण्यासाठी ठराविक वेळ घेणं आणि तो ही लग्नाआधी. टीव्हीवर “स्वभाव जुळतात की नाही हे कसं कळेल” अशी जाहिरात केली जाते, पण जुळवून कुठं आणि कसं घ्यायचं याची मुलगा आणि मुलगी यांना कितपत कल्पना आहे? एकतर या मध्यमवर्गातले तरुण-तरुणी पदवी-पदव्युत्तर शिक्षणाच्या निमित्तानं परदेशी किंवा निदान पुणे-मुंबई सारख्या मोठ्या शहरांत जातात. फक्त महाराष्ट्राचा विचार करता कोकणपट्टा, पश्चिम-उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागांतून पुण्या-मुंबईत आलेली ही तरुण मंडळी लग्नाआधी फक्त मुलगा आणि मुलगी भेटणार असं म्हंटलं तर ही असली थेरं, तिकडं पुण्या-मुंबईत भेटणार असाल तर करायची इथं नाही अशी सुरुवात होते आणि तिथल्या बोलीभाषेतल्या अस्सल शिव्या देऊन शेवट होतो. हे असं आता अजिबात होत नाही हे कुणी म्हणालं तर खूप चांगलं वाटेल. शादी मे जरूर आनाच्या (Shadi mein jarur aana) राजकुमारराव आणि कीर्ती खरबंदा सारखं थोड्या प्रमाणात काही मुलं-मुली असं करत असावेत. 



                                            स्रोत : साभार इंटरनेट

  पण काय करायचं भेटून त्यानं काय होणार? लग्नाआधी मुलगा-मुलगी किती वेळा भेटतात? काय काय बोलतात? आपले सद्गुण-दुर्गुण याबद्दल किती आणि कसं बोलतात हे फार महत्वाचं आहे. आपले गुण म्हणजे चांगले गुण काय आणि दोष काय याबद्दल त्यांना स्वतःला कितपत माहिती आहे? होणार्‍या बायकोकडून-नवर्‍याकडून काय काय अपेक्षा आहेत? बरं या अपेक्षा वास्तवात पूर्ण होणार्‍या आहेत का? त्या दोघांनी याचा नीट विचार केला आहे का? कारण एकमेकांना समजून घेणं म्हणजे काय व ते कसं घ्यावं? याची संबंधित मुलगा व मुलगी यांना कितपत माहिती आहे? हे एकमेकांना भेटण्याआधी याची नीट माहिती घेतली पाहिजे. मुळात वास्तव काय आहे की कोकण, पश्चिम व उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागात राहणार्‍या मुलींना मुलगा मोठ्या शहरातला पाहिजे, त्याचं तिशीच्या वयात पुण्या-मुंबईत घर पाहिजे, गलेलठ्ठ पगार पाहिजे, भरीस भर आई-वडील मूळ गावातून इथं यावेत की नाही हा अजून भाग वेगळाच आहे. तसंच मुलांचं म्हणाल तर इथे बघितलेली अस्सल शहरी प्रेक्षणीय स्थळं याच्याशी मुळगावातल्या स्थळाची तूलना होते. बरं लग्नानंतर बायकोला गृहीत धरणं, आपलं म्हणणं तिने कायमच ऐकलं पाहिजे... वगैरे वगैरे.. अशी पुरषी मानसिकता, आर्थिक-व्यावहारिक बाबी बघण्याबरोबरच दोघांनी एकमेकांचे भावनिक दृष्टिकोनही कसे आहेत त्याचबरोबर आपापल्या पूर्वआयुष्याबद्दल माहिती करून घेणं गरजेचं आहे. कारण आजकाल अफेअर (affair) असणं ही बाब साधारण झाली आहे, आजवर किती झाली आहेत? मग ब्रेक-अप का झाले वगैरे.. त्याबरोबरच व्यसनाधिनता ही आहे, त्या बद्दलही बोललं गेलं पाहिजे.
   आधीच्या जमान्यात कशी स्वयंवरं होत होती, आपला नवरा निवडण्याचं स्वातंत्र्य महिलांना होतं पण नंतर परिस्थिती बदलली...पण....पण काय? आता पुन्हा ती बदलायला पाहिजे. दोघांनाही ते स्वातंत्र्य असायला हवं...त्यासाठी एकमेकांना जाणून आणि पारखून घेतलं पाहिजे. पण जाणून घेणे आणि पारखून घेणे या दोन्ही गोष्टी मोठ्यांनी त्या दोघांना शिकवल्या पाहिजेत. अफेअर मध्ये, व्यसनं करताना जशी सहजता असते, अगदी तीच सहजता लग्नाआधी पासून असली ना तर नंतर नातं ओढून-ताणून टिकवण्याची गरज पडत नाही. या सर्व नमूद केलेल्या गोष्टी खाजगी आहेत, यांवर हवा तसा निर्णय ज्याचा त्याने घ्यावा पण लिहिण्याचा अट्टहास एवढ्याचसाठी केला आहे की दोघांचं आयुष्य सुखी-आनंदी झालं पाहिजे आणि ते करणं हे त्या दोघांच्याच हातात आहे.


क्रमशः......

मातृ दिनाच्या इतिहासाची कहाणी

                              प्रेम स्वरूप आई वात्सल्यसिंधु आई                  बोलावू तुज आता मी कोणत्या उपायी                             ...