गेल्या वर्षीचा ८०% काळ आपण टाळेबंदीत काढला, कोरोनाचा कहर पाहिला, सध्या परत तीच परिस्थिती ओढवली आहे, पुन्हा लॉकडाऊनची टांगती तलवार आहेच. पण या सगळ्यात आपल्याला आठवत असेल तर कोरोनाची साथ सुरू झाल्यावर ती खोकल्याची नंतर ही मास्क घाला वगैरे, विलगीकरणासंदर्भातली आणि नंतर बच्चन यांच्या आवाजातली अशा वेगवेगळ्या कॉलर ट्यून आठवत आहेत का? मला नाही वाटत की त्या विसरल्या असतील कारण हे कोरोना संकट, ते सगळे निर्बंध, या सूचना तेंव्हा आपल्यासाठी नवीन होत्या, म्हणून ते पक्कं डोक्यात बसलं आहे. त्यातली ही "आपल्याला रोगाशी लढायचं आहे रोग्याशी नाही." ही जरा खास आहे कशामुळे काय ते जरा पाहूयात.....
कोविड १९ ची साथ पसरली आणि सर्वांचं आयुष्य बदलून गेलं आहे, कोविडचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपल्या सर्वांना अंतर ठेवून वावरायला सांगण्यात आलं होतं, आता परत तेच सांगत आहेत पण आता ती गोष्ट होत नाही जी आधी झालेली आहे, की ज्यांना कोविड झाला त्यांना संस्थात्मक विलगीकरणात (istitutional quarantine) ठेवण्यात आलं होतं. कोविड बरा झाल्यानंतर या लोकांना घरी आल्यावरही त्यांच्या संपर्कात कुणी येत नव्हतं, शिवत नव्हतं. आपल्याला कोविड होईल या भीतीने आजूबाजूचे लोक जवळ येत नव्हते. हे इतक्या थराला जात होतं की पूर्वी कुष्ठरोग्यांना जशी वागणूक दिली जायची तीच वागणूक बऱ्या होणाऱ्या व्यक्तींना दिली जात होती. ही परिस्थिती फक्त गरीब किंवा निम्न - अति निम्न मध्यमवर्गीय वस्त्यांमध्ये नव्हती तर उच्चभ्रू सोसायट्यांमध्येही असाच अडाणीपणाचा एपिसोड चालू होता, बरं त्यावेळी अज्ञान होतं, भीती होती म्हणून ठीक पण याचा परिणाम असा होत होता की त्या रुग्णांना या मिळणाऱ्या वागणुकीमुळं नकारात्मकता येत होती, खूप वाईट अनुभव येत होते. लोकांचे डोळे उघडावे म्हणून ही कॉलर ट्यून सुरू करण्यात आली.....मग हळूहळू हे वागणं कमी होत गेलं...
आपल्या देशामध्ये समाजसुधारणेचं खूप मोठं काम झालं आहे. महात्मा फुले, राजाराम मोहन रॉय, स्वामी दयानंद सरस्वती, न्या. रानडे, आगरकर, कर्वे, विठ्ठल रामजी शिंदे, राजर्षी शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, गाडगेबाबा इ. ही समाज सुधारकांची नावं इतिहासात अजरामर झालेली आहे. यांनी आपलं आयुष्य समाजाच्या सुधारणे बरोबरच विकासासाठी, स्थिरता देण्यासाठी खर्ची घातलं. ते कायम आपल्याला वंदनीय आहेत. आजच्या काळातही आपण त्यांच्याच विचारांवर चालण्याचं काम करतो.
इथं कोविड सोडून इतिहासात जायचं काय कारण आहे? असं वाटलं असेल ना? कारण सध्या कोविड सोडला तर बऱ्याच बाबतीत रोगाशी न लढता रोग्याशी लढत असलेली उदाहरणं पाहायला मिळत आहेत. या समाजसुधारकांचे इथं नक्की काय म्हणावं हा शब्दच सुचत नाही कारण त्यांना अनुयायी म्हणलं तर समाजसुधारकांचे विचार त्यांनी कितीसे समजून घेतले आहेत याची शंका येते... भक्त म्हणावं तर त्यांनी समाजसुधारकांनी सांगितलेल्या मार्गाच्या विरुद्ध मार्गावर ही लोकं चालत असतात. स्वतःला 'पुरोगामी' म्हणवून घेतात, हे लोक. 'स्वातंत्र्य' 'समता' व 'बंधुता' 'एकता' 'अखंडता' या शब्दांचा कायम वापर करतात, कारण या शब्दांना राज्यघटनेत स्थान आहे. पण या शब्दांप्रमाणे वागतात का? आपल्याला बऱ्याच वेळा सोशल मीडिया बातम्या, वर्तमानपत्रांमधून हे पहायला मिळतं... एकी नांदेल असं यांचं वागणं नसतं, कायम दुफळी माजेल, कोणत्याही समाजविघातक घटनेत हे लोक फोडणी टाकतात, ती अधिक पेटली जाईल याची काळजी घेतात. हे लोक सक्रिय राजकारणी नाहीत; पत्रकार, साहित्यिक, प्राध्यापक, कलाकार म्हणजे एकूणच सामाजिक भान असणारी बुद्धीजीवी मंडळी आहेत. इथं राजकारणी लोकांना का नाही टार्गेट केलं आहे? कारण राजकारणात नीतीला नितीमत्तेपेक्षा जास्त महत्व आहे. पण वर उल्लेख केलेले लोक हे मूल्ये, नीतीमत्ता, आदर्शांचा यांचा बोलण्यात वापर करतात.. पण खरंतर सक्रिय राजकारणी लोकांपेक्षा हे मोठे लबाड, कावेबाज असतात. राजकारणी ढोंग करतात असं म्हणलं तर हे त्यांच्याहून मोठे ढोंगी आहेत, राजकारणात मतं, मूल्ये, आदर्शांवर कायम ठाम असून चालत नाही वेळ येईल तसा त्याच्यात बदल हा करावाच लागतो, म्हणून राजकारणी आपापल्या जागी बरोबर आहेत असं म्हणलं पााहिजे. कोणत्या गुन्ह्यात जर ते दोषी असतील तर तो भाग वेगळा....कारण त्याची शहानिशा करायला, शिक्षा करायला कोर्ट आहे. तर या पुरोगामी लोकांना जातपात रहित समाज हवा आहे तर जाती-जातीत मुख्यत्वे क्षत्रिय विरुद्ध दलित किंवा ओबीसी असे वाद पेटत रहावेत, ब्राह्मण - ब्राह्मणेत्तर चळवळ याला इतिहास आहे. पण ही चळवळ सुद्धा समतेसाठी, शोषित लोकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी होती. अजूनही उत्तर भारतात या चळवळीची जास्त गरज आहे तिथला जातीयवाद नाही संपला....कारण महाराष्ट्रापासून खाली दक्षिण भारतीय ब्राह्मण इतके सरंजामशहा आता नाहीत, तरीही सर्व समाजाचं प्रबोधन करण्यापेक्षा 'ब्राह्मण भगाव देश बचाव' '१९४८ परत केलं जाईल' अशा धमक्या दिल्या जातात, 'मनुवाद' अजून काय तर 'संघवाद' से आझादी....कुणीही यांना प्रश्न विचारावा की देश वाचवण्यासाठी ब्राह्मणांना पळवून लावलंत का? गेले का सगळे ब्राह्मण पळून? नाही गेले तर कधी लावायचं? घटनेनं सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य दिलं असताना ही अजून कसली आझादी? बरं आझादी कधी आणि कशी मिळावयाची की जन्मभर फक्त ते डफ बडवत बसायचे आहेत? ही सामाजिक चळवळ कधी पर्यंत चालू राहणार याला यश मिळतंय का? मिळत नाही तर का मिळत नाही? बरं हे सगळं विष कोणाच्या मनात कालवलं जातं तर बहुजन तरुणांच्या मनात...म्हणजे हातघाईचे प्रसंग आले की हे म्होरके निवांत बसतात..आणि शेकलं जातं तरुण पोरांच्या अंगावर....दिल्लीत शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेली लाल किल्ला दंगल आठवा. या पुरोगामी लोकांच्या नादाला लागलेले किती दलित व अहिंदू तरुण- तरुणी उच्च शिक्षण घेऊन परदेशात गेले किंवा भारतात कुठल्या कुठल्या क्षेत्रात कार्यरत आहेत? आणि जे ओबीसी, एससी-एसटी तरुण-तरुणी सरकारी आणि खाजगी क्षेत्रातल्या मोठमोठ्या हुद्यांवर आहेत, ते यांच्या नादाला न लागता स्वतः कष्ट करून पुढं आलेले आहेत. सत्ताधारी पक्षाच्या निर्णयांना नावं ठेवा, त्याला विरोध करा, राजकीय भाग आहे तो पण त्याचा आधार घेऊन केवळ हिंदू धर्मालाच लक्ष्य केलं जातं...सत्ताधारी पक्ष म्हणजे संपूर्ण हिंदू समाज नव्हे....हिंदूंमध्ये कुप्रथा, वाईट चालीरीती आजही आहेत पण यासाठी अख्खा धर्मच वाईट, काहीच चांगलं त्यामध्ये नसेल का? बरं बाकी धर्मांबद्दल काही बोलायचं नाही कारण त्यांना घटनेनं स्वातंत्र्य दिलं आहे, त्यामुळं बाकी धर्म आपल्या कुप्रथा वगैरे जपत असतात, त्यावेळी हे बुद्धीजीवी चिडीचूप असतात.यांना ज्याप्रमाणे 'दाभोलकर आठवतात तर दाभोलकरांचे प्रेरणास्थान असणारे व ज्यांच्या नावावरून दाभोलकरांनी आपल्या मुलाचं नाव ठेवलं ते 'हमीद दलवाई' का नाही आठवत? त्याच दाभोलकर-पानसरेंचे खुनी सापडले जावेत, त्यांना शिक्षा व्हावी यासाठी किती मोठं आंदोलन उभं राहायला हवं होतं पण या ढोंग्यांनी काहीही केलं नाही...खरा इतिहास पाहिजे म्हणून इतिहास पुन्हा लिहिला पाहिजे म्हणायचं आणि मुद्दाम अशा घटना लिहायच्या ज्यामध्ये आक्रमाकांना चांगलं दाखवायचं की वाचणाऱ्याला प्रश्न पडला पाहिजे की हे आक्रमक इतके चांगले होते तर शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण कशासाठी केलं? इंग्रजांचा सुधारणावादी दृष्टिकोन समोर ठेवायचा की वाटलं पाहिजे...सगळे स्वातंत्र्यसैनिक उगीच चांगल्या राजवटीच्या विरोधात होते. यांच्या मते हिंदू समाज हिंदुत्वाच्या रोगी मानसिकतेत अडकला आहे, तर त्याला यातून बाहेर काढण्यासाठी प्रबोधनाचं औषध द्यायला हवं ना..ते हे ढोंगी पुरोगामी देतात का? नाही....या उलट हिंदू धर्माची टिंगलटवाळी बदनामी करण्यात धन्यता मानतात. हे सगळं वागणं इतक्या थराला गेलेलं आपण कायम पाहतो की भारतीय शासन व्यवस्थेच्या विरुद्ध हे पुरोगामी- उदारमतवादी (लिबरल) बोलून जातात...राजद्रोह करतात...पुलवामा हल्यानंतर "how is the josh?" ट्विट केलं जातं...बरं नुकत्याच झालेल्या छत्तीसगड मधल्या नक्षली हल्ल्याबाबत काहीच बोललं जातं नाही...हे सगळं हे लोक ढोंगी आहेत हे दाखवतं....हे भारतात आपली समांतर व्यवस्था प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असतात, देशातलं वातावरण यांनी गढूळ केलं की याचा फायदा आपल्या शत्रू राष्ट्रांना होतो...कदाचित ही शत्रू राष्ट्रे यांना त्याबद्दल आर्थिक मदतही करत असतील.
आता सांगा खरे रोगी कोण? आपापल्या धर्माचं पालन करणारे सगळे थोडे शहाणे- थोडे मूर्ख असे आपण अर्धवट भारतीय की स्वतःला शहाणे समजणारे आणि सामाजिक शांतता प्रस्थापित करतो असं दाखवणारे आणि वास्तवात समाज फोडणारे आणि देशविघातक कामं करणारे हे बुद्धीजीवी, पुरोगामी, उदारमतवादी? या पुरोगामी लोकांना "शहाण्याला शब्दांचा मार" असं सांगून ते ऐकणाऱ्यांपैकी नाहीत..म्हणून या रोग्यांना ते जेंव्हा जेंव्हा सापडतील तेंव्हा कायद्याच्याच औषधाचा डोस देणं योग्य आहे...कारण देशाचं भलं होण्यापेक्षा नुकसानच अधिक होत आहे.



