गुरुवार, ३० एप्रिल, २०२०

Irrfan- संघर्षाचा सोबती.

     

                                स्रोत : साभार इंटरनेट
   
   आजच्या घडीला संपूर्ण जगावर कोरोना (Covid 19) नावाचं भयानक संकट आहे, त्यातून सुटका व्हावी यासाठी जगाचा जोरदार संघर्ष सुरू आहे. पण दि. २९/०४/२०२० या दिवशी एक संघर्ष थांबला, तो कायमचाच. इरफान खानला (Irrfan Khan) २ वर्षापूर्वी neuroendocrine च्या कर्करोगानं ग्रासलं पण त्यातून तो बरा झाला होता. शेवटच्या सिनेमा अंग्रेजी मीडियमच्या प्रमोशनवेळी त्याची तब्येत पुन्हा बिघडली आणि दवाखान्यातून प्रेक्षकांसाठी एक संदेश पाठवला, त्यात त्याचं शेवटचं वाक्य होतं “And yes wait for me.” असं वाट बघायला लावून इरफान जो गेला तो गेलाच. इरफान आणि संघर्ष यांचं जवळचं आणि घट्ट नातं, तसं मायानगरी मुंबईमध्ये सिनेसृष्टीत करियर करण्यासाठी येणार्‍या जवळपास प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो, पण ‘साहबजादे इरफान अलि खान’ साहेबांची बात काही औरच होती. यासाठी संघर्ष व त्यांची मैत्री कशी झाली हे ही फिल्मी स्टाइलनं फ्लॅशबॅक मध्ये नको का बघायला!
     इरफानचं बालपण गुलाबी शहर जयपूरला गेलं, टोंक या गावी त्याच्या मावशीच्या घराजवळ एक सिनेमागृह होतं, म्हणजे घराची आणि सिनेमागृहाची भिंतच एक म्हणून कधीही सिनेमा पाहायला तो आणि त्याची भावंडं जायची बहुतेक तिथं त्याची सिनेमाशी ओळख झाली. दुपारच्या वेळी ही लहान मुलं खेळताना नाटक करण्याचा प्रयत्न करत, कदाचित तेंव्हापासूनच त्याला अभिनयाची आवड निर्माण झाली असावी. पण त्याला क्रिकेटपटू व्हायचं होतं त्याची निवडही प्रथम श्रेणी क्रिकेट साठी झाली होती, पण तो तिथं जाऊ नाही शकला. त्याच्या एका जवळच्या व्यक्तीनं एकदा राजेश विवेक(लगान मधला ‘साधू’) बद्दल कौतूक करताना इरफानला सांगितलं की तो एक उत्तम कलाकार आहे आणि तो Natinal school of drama मध्ये शिकला आहे. यामूळं प्रभावित झालेल्या इरफाननं मनाशी ठरवलं होतं की आपणही तिथंच जायचं पण त्याच्या कुटुंबात त्याला अभिनय क्षेत्रात करियर साठी परवानगी मिळणार नाही कारण परिवारात हे हलक्या दर्जाचं काम मानलं होतं म्हणून त्यानं थाप मारली की एम.ए नंतरचं पुढचं शिक्षण घ्यायला दिल्लीला जावं लागणार आहे, त्यानंतर तो जयपूर विद्यापीठात प्रोफेसर होईल. इकडे NSD मध्ये प्रवेश मिळवायचा झाला तर कमीतकमी १० नाटकांमध्ये काम केलं असलं पाहिजे असा नियम होता पण त्याला तर कसलाच अनुभव नव्हता म्हणून त्यानं इथंही थाप मारली आणि १९८४ साली NSD मध्ये प्रवेश मिळवला. इथच संघर्ष त्याला पहिल्यांदा भेटला कारण तेंव्हाच त्याचे वडील वारले होते. आता घरात मोठा मुलगा-कर्ता पुरुष तोच होता आणि घरातून आता पैसा मिळणार नव्हता. यावर मात करून त्यानं शिष्यवृत्ती मिळवली आणि शिक्षण पूर्ण केलं. आणि त्याच्या कष्टाचं फलित म्हणून त्याला मीरा नायर यांच्या सिनेमात पहीला ब्रेक मिळाला. नाव होतं ‘सलाम बॉम्बे’ (Salam Bombay). पण त्याच्या कामावर कात्री लागली, म्हणून हताश होऊन तो टेलिविजनकडे वळला. त्याला सुरूवातीला एका रुसी कलाकृतीवर आधारित एका नाटकात (लाल घांस पर नीले घोडे) लेनिनची भूमिका मिळाली, ९०च्या दशकांत त्याला भारत एक खोज, चाणक्य, सारा जहा हमारा, बनेगी अपनी बात, चंद्रकांता सारख्या मालिका मिळाल्या, यामुळे कमाई तर होत होती, पण चंदेरी पडद्यावर काम करण्याची इच्छा असणार्‍या त्याचं छोट्या पडद्यावर मन रमत नव्हतं. त्याला एकसूरी भूमिका करायच्या नव्हत्या, त्याला कोणत्याही साच्या मध्ये अडकायचं नव्हतं. ज्या सिनेसृष्टी यश आणि कमाई हे मूलभूत तत्वज्ञान आहे, पण त्याच्या आतली जी जिद्द होती ती केवळ यश या संकल्पनेसाठी साठी भुकेली नव्हती, स्वतःच्या पद्धतीनं, स्वतःच्या दृष्टिकोनातून यश मिळवण्याची होती. या फिल्मीदुनियेत असं वेगवेगळ्या भूमिका मिळण्याची इच्छा धरणं आणि यासाठी वेगळा विश्वास बाळगणं म्हणजे त्या काळात बेईमानीच्या गोष्टी होत्या. त्यात त्याचं व्यक्तिमत्व आधीच मितभाषी, लाजरं; कुणाकडे आपले फोटो दाखवायला जाणं व सिनेमात रोल मिळण्यासाठी त्या व्यक्तिला impress करणं त्याला जमत नव्हतं. कदाचित करण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा नकारात्मक परिणाम व्हायचा, यामुळंच त्याचा संघर्ष जोरदार बनत होता. १९८८-२००० पर्यन्त तो सिनेमा-टीव्ही दोन्हीकडे मिळेल तशा भूमिका करत राहिला पण त्याला ओळख मिळायची होती. २००१ मध्ये त्याला आसिफ कपाडीयांच्या ‘वॉरियर’ (Warrior) मध्ये मुख्य भूमिका मिळाली. या सिनेमाला मानाचा बाफ्टा पुरस्कार मिळाला पण सिनेमा जरी ब्रिटिश असला तरी  ब्रिटिश वंशाचे मंडळी नाहीत म्हणून ऑस्करसाठी ब्रिटनकडून अधिकृतरित्या पाठवण्यात आला नाही. त्याचा जवळचा मित्र- NSDचा सहपाठी तिग्मांशू धूलिया दिग्दर्शित ‘हासिल’ २००३ साली आला. त्यातल्या ‘रणविजय सिंह’ या भूमिकेसाठी त्याला पहिला-वहिला फिल्मफेअर पुरस्कार (Filmfare award) मिळाला. त्याला ‘हासिल’मूळं राष्ट्रीय स्तरावर आणि ‘वॉरियर’मूळं आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली. २००३ मध्येच शेक्सपियरचा कट्टर चाहता संगीतकार- दिग्दर्शक विशाल भारद्वाज यानं ‘मॅकबेथ’वर आधारित ‘मकबूल’ हा सिनेमा बनवला, यातल्या इरफानच्या ‘मियाँ मकबूल’ या भूमिकेचं कौतूक झालं, हा सिनेमा कान्स, टोरण्टो इथल्या मानाच्या चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला.
     इरफान जरी शांत, लाजाळू स्वभावाचा असला तरी रोखठोक होता. या त्याच्या रोखठोकपणामुळं तो आणि तथाकथित कट्टर धर्मवादी आमने-सामने आले होते. एकदा जयपूरमधल्या कार्यक्रमामध्ये त्यानं आपलं मत प्रकट केलं होतं की आताच्या परंपरांमध्ये कुर्बानीचा अर्थच समजून घेतला जात नाही. बाजारातून एक बोकड आणणं आणि दुसर्‍या दिवशी त्याचा बळी देणं ही कुर्बानी असू शकत नाही. नंतर एका टीव्ही कार्यक्रमामध्ये त्यानं तथाकथित धर्ममार्तंडांना रमजान व मुहर्रमच्या वेळी पाळल्या जाणार्‍या प्रथा तपासून पाहण्याचा सल्ला दिला. पुढे तो म्हणाला होता की रमजानमध्ये रोजे पाळण्यापेक्षा त्या काळात आत्मपरिक्षण करावं. तो म्हणायचा, “लहानग्यांच्या निष्पापपणावर ज्याप्रमाणं माया-प्रेम येतं तसं माझं देवाबरोबरचं नातं होतं पण नंतर ते हळूहळू संपत गेलं. रुढींवरून माझं मन उडून गेलं, कारण ती एक सौदेबाजी असते की तुम्ही अमूक केलं तर तुम्हाला अमुक मिळेल. परंपरेच्या मार्गावर चालायच्या भानगडीत मी पडलोच नाही.” या त्याच्या परखड स्वभावामुळं त्याचा कट्टरतावाद्यांशी संघर्ष झाला होता.
    २०१८ च्या मार्चमध्ये इरफाननं ट्विटरद्वारे कळवलं की त्याला Neuroendocrine tumor आहे. तो लंडनमध्ये यासाठी उपचार घेत होता. त्यानं एक वर्ष उपचार घेतले. २०१९ च्या फेब्रुवरी महिन्यात तो भारतात परतला. म्हणजे संघर्षाचा हा अजून एक अध्याय होता, पण तो अचानक होता आणि वेदनादायी सुद्धा. त्यानं आजाराचं निदान झाल्यानंतर एक पत्र लिहिलं होतं ते कधीही वाचलं नक्कीच डोळ्यांच्या कडा पाणावतील.
    त्याची NSDची अजून एक सहाध्यायी आणि त्याची पत्नी सुतपा; तिनं एका मुलाखतीत सांगितलं, “NSD मध्ये शिकत असताना कायम त्याच्या हातात संहिता असायच्या, माझ्या घरी जेंव्हा सगळे मित्र-मैत्रिणी यायच्या तेंव्हा बाकी सगळे दंगा-मस्ती करण्यात रमलेले पण इरफान माझ्या भावाचं पुस्तकांचं कपाट होतं त्यातली पुस्तकं वाचण्यात मग्न झालेला असायचा. याबाबतीतली त्याची कायमच भूक अशा पद्धतीची होती की कमी वेळात त्याला खूप काही करता येईल.” हा त्याचा वेळेशी असलेला संघर्ष होता, कदाचित त्याच्याकडे असलेल्या कमी काळाची त्याला कल्पना असल्याप्रमाणं?
     
       

                                     (स्रोत : साभार india.in.pixel)
  
     सलाम बॉम्बेमधला लेखक, मकबूलचा मियाँ मकबूल, पिकुचा राणा चौधरी, लाइफ इन ए मेट्रोचा मॉन्टी, डी-डे चा शाहवली खान, रोगमधला पोलिस ऑफिसर, लंचबॉक्सचा साजन फर्नांदेस  या आणि अशा अजून भूमिका या बॉलीवुड सिनेमांत आणि जुरासिक वर्ल्ड, लाइफ ऑफ पाई, स्लमडॉग मिलिनेअर, द माइटी हार्ट, इन्फेर्नो या आणि अन्य हॉलीवुड सिनेमांमध्ये त्यानं वठवलेल्या भूमिकांमध्ये वेगळेपण होतं, आणि ते राखणं, स्वतः स्वतच्या इमेजला तोडणं आणि आपलेच एकेक मुखवटे उतरवत जाणं हीच त्याची खासियत होती. पानसिंग तोमरच्या भूमिकेसाठी त्याला त्यावर्षीचा राष्ट्रीय पुरस्कार आणि फिल्म फेअर दोन्ही मिळालं होतं. तो असा एकमेव भारतीय कलाकार होता की त्यानं काम केलेल्यापैकी दोन सिनेमे ऑस्कर पुरस्कार प्राप्त आहेत. कलाक्षेत्रातल्या योगदानाबद्दल त्याचा पद्मश्री देऊन सन्मानही केला गेला. केवळ भुमिकांमध्येचं नाही वेगळी विचारसारणी असणं, वेगळी वाट चोखाळणं इतकंच काय तर त्याला झालेला आजार त्यातही वेगळेपण. पैसा, प्रसिद्धी असूनही त्याची जिद्द वैविध्यपूर्ण भूमिकांसाठीची होती. त्याचं म्हणणं होतं, “मला माझ्या मधलं रोमॅंटिक पात्र शोधायचं आहे, बाल चित्रपटात काम करायचं आहे, अॅक्शन, फॅंटसी, सांगीतिक, बायोपिक अशी बर्‍याच भूमिका करायच्या राहिल्या आहेत.”  असं वाटतं की असे अभिनेते दर नवीन भूमिकेसाठी नव्यानं जन्माला येतात, भूमिकेच्या कोंदणात बसण्यासाठी नव्यानं स्वतःला पैलू पाडतात. त्यानं सफाईदारपणे अभिनय केला पण वेगळेपण जपण्यासाठी मोठा संघर्ष चालू होता म्हणजे तो त्याचा सोबतीच बनला होता.
आता दोघंही नाही आहेत. पण तो कायम आपल्या हृदयात राहील आणि त्याचे हे शब्द ही,

दर्या भी मै, दरख्त भी मै, झेलम भी मै, चिनार भी मै, दैर हूं, हरम भी हूं, शिया भी हूं, सुन्नी भी हूं, मै हूं पंडित, मै था , मै हूं और मै ही रहूंगा….

शुक्रवार, ३ एप्रिल, २०२०

"राम" हैं

गीतकार: जावेद अख्तर (Javed Akhtar)
संगीत: ए. आर्. रहमान. (A.R. Rahman)

सीता:
पल पल है भारी वो विपदा है आई
मोहे बचाने अब आओ रघुराई
आओ रघुवीर आओ, रघुपति राम आओ
मोरे मन के स्वामी, मोरे श्रीराम आओ
राम-राम जपती हूँ, सुनलो मेरे राम आओ
राम-राम जपती हूँ, सुनलो मेरे रामजी…
कोरस:
बजे सत्य का डंका, जले पाप की लंका
इसी क्षण तुम आओ, मुक्त कराओ
सुन भी लो अब मेरी दुहाई
पल पल है भारी, वो विपदा है आई..
मोहे बचाने अब आओ रघुराई।।
राम को भूलो, यह देखो रावण आया है
फैली सारी सृष्टि पर जिसकी छाया है।
रावण:
क्यों जपती हो राम राम तुम?
क्यों लेती हो राम नाम तुम?
राम राम का रटन जो यह तुमने है लगाया
सीता…. सीता तुमने राम में ऐसा क्या गुण पाया?

                                              ( स्रोत : साभार इंटरनेट)

सीता:
गिन पाएगा उनके गुण कोई क्या,
इतने शब्द ही कहाँ हैं
पहुँचेगा उस शिखर पे कौन भला,
मेरे रामजी जहाँ हैं!
जग में सबसे उत्तम हैं, मर्यादा पुरुषोत्तम है
सबसे शक्तिशाली हैं, फिर भी रखते संयम है
पर उनके संयम की अब आने को है सीमा
रावण समय है…माँग ले क्षमा
कोरस:
बजे सत्य का डंका, जले पाप की लंका
आए राजा राम, करें हम प्रणाम
संग आया लक्ष्मण जैसा भाई
पल पल है भारी, वो विपदा है आई..
मोहे बचाने अब आओ रघुराई।।
रावण:
राम में शक्ति अगर है, राम में साहस है तो
क्यों नहीं आए अभी तक वो तुम्हारी रक्षा को?
जिनका वर्णन करने में थकती नहीं हो तुम यहाँ
यह बताओ वो तुम्हारे राम हैं इस पल कहाँ??
सीता:
राम हृदय में है मेरे, राम ही धड़कन में हैं
राम मेरी आत्मा में, राम ही जीवन में हैं….
राम हर पल में है मेरे, राम है हर स्वास में
राम हर आशा में मेरी, राम ही हर आस में

                                                (स्रोत : साभार इंटरनेट)

मोहन भार्गव:
राम ही तो करुणा में है, शांति में राम हैं
राम ही है एकता में, प्रगती में राम हैं
राम बस भक्तों नहीं, शत्रु के भी चिंतन में हैं
देख तज के पाप रावण, राम तेरे मन में हैं
राम तेरे मन में हैं, राम मेरे मन में हैं …(2)
राम तो घर घर में हैं, राम हर आँगन में हैं
मन से रावण जो निकाले, राम उसके मॅन में हैं …(2)
सीता:
पल पल है भारी, वो विपदा है आई
मोहे बचाने अब आओ रघुराई।।
कोरस:
सुनो राम जी आए, मोरे राम जी आए
राजा रामचंद्रा आए, श्री रामचंद्र आए
राम जी आए, मोरे राम जी आए..हो…(2)
        २ एप्रिल २०२०. चैत्र शुद्ध नवमी अर्थात रामनवमी. रामाचा जन्म इ.स.पूर्व ५११४ वर्षांपूर्वी झाला म्हणजे ही रामाची ७१३४ वी जयंती. आपल्या सिनेसृष्टीमध्ये आपल्या बहुतेक सर्व सण-उत्सवांवर आधारित गाणी आहेत. वर दिलेलं भलं मोठं गाणं जरी दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर 'स्वदेस' (Swades) या सिनेमात दाखवलं असलं तरी ते आजच्या दिवशी त्याचं स्मरण हटकून होतं कारण या गाण्यामध्ये रामाचा गुणगौरव करण्यात आला आहे. थोर व्यक्ती/महापुरुषांचे गुणगान त्यांच्या जयंती-पुण्यतिथीला करणे ही आपली प्रथाच आहे. राम हे तर देवस्वरुप आहेत म्हणून रामभक्ती हा भारतीय संस्कृतीचा भाग आहे. 'स्वदेस' या चित्रपटात मूळचा भारतात वाढलेला, सुट्टी घेऊन एका खेडेगावात आलेला, जगातलं उच्चतम तंत्रज्ञान असणाऱ्या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था 'नासा' (NASA) इथं काम करणारा युवक 'मोहन भार्गव'(शाहरुख खान) (Shahrukh Khan); 'नासा-खेडेगाव;दोन्ही एकदम भिन्न वातावरण आणि संस्कृती असणारी ठिकाणं; नासा मध्ये सतत वैज्ञानिक संशोधन करुन अल्पसंतुष्ट न राहता विश्वातल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा छंद पण गावात पोट भरण्याचं काम करावं आणि जे चालत आलंय ते करावं "ठेविले अनंते" प्रमाणं जगावं ही वृत्ती, कामावरून सुट्टी घेऊन आल्यानंतर गाव आणि अमेरिका यातला फरक बघून त्याचं मन व्यथित होतं आणि त्यातून तो गावासाठी काय करतो हे दाखवलं आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे.
         सदर गाणं दसऱ्याच्या रामलीलेच्या प्रसंगी घेण्यात आलं आहे. उत्तर भारतात दसऱ्याच्या दिवशी रामलीला सादर होणं आणि रावण दहन याला मोठी परंपरा आहे. सणवार-उत्सव व जोडून येणाऱ्या रुढी-प्रथा पाळणं आपल्याकडं हौसेनं केलं जातं, मग त्या मागची भावना-विचार-हेतू पुढच्या पिढ्यांना समजेल वा न समजेल यांवर लक्ष दिलं जात नाही. मोहनच्या या गावातही अशीच परिस्थिती. रामलीलेतल्या भजनात कोरस म्हणावा आणि घरी जाऊन झोपावं, उद्या पुन्हा ये रे माझ्या मागल्या! अरे म्हणजे आम्ही आमचे सण साजरे करायचे नाहीत का, प्रथा- परंपरा पाळायच्या नाहीत का? "आमचेच" सण बरे दिसतात? तसं नाही. काय आहे की हा सिनेमा मोहन भार्गवच्या नजरेतून आपल्याला दिसतो. आपल्या मानलेल्या आईच्या ओढीनं अनोळखी गावात मोहन आला,  त्याच्या नजरेला अमेरिका आणि गाव यातली तफावत चांगलीच लक्षात येत जाते की गावात १८ पगड जाती म्हणून अस्पृश्यता जातीवाद बोकाळला आहे. ६० वर्षे झाली देश स्वतंत्र होऊन तरी मुलींना शाळेत पाठवलं जात नाही,अस्पृश्यांच्या मूला-मुलींना शाळेकडं बघायचीही सोय नाही. गावात अजूनही वीज नाही. ज्या उत्साहात गाव आपले सणवार -परंपरा-उत्सव साजरे करतं तो उत्साह मूलभूत सोयी-सुविधा, विकास करण्यासाठी कणभरही दिसत नाही. म्हणून या गाण्यातही मोहन अस्वस्थ होताना दिसतो. राम हे सीतेचे पती आहेत म्हणून तिने गुणगान करायचं आणि बाकीच्यांनी तल्लीन होऊन त्यावर माना डोलवायच्या! म्हणून बेचैन झालेल्या मोहनच्या रुपात आधुनिकतेनं परंपरावादाला दिलेलं हे उत्तर आहे,
*राम ही तो करुणा मे हैं-
दया हे उत्तम पुरुषाचं लक्षण आहे. दया बाळगा, पोरी-बाळी आणि जे दलित लोक आहेत त्यांची दया येऊ द्या, त्यांना त्यांचे अधिकार द्या. राम तिथं आहेत.
*शांती में राम हैं-
आपल्या या उच-नीचतेमुळं खोट्या अहंकारामुळं भांडण-तंटे होतात. हे सोडा. वैयक्तिक-सामाजिक शांती प्रस्थापित करा.
राम तिथं आहेत.
ही वरची व पुढच्या ओळी एकमेकांशी जोडल्या आहेत.
*राम ही है एकता में-
भांडण-वाद नव्हते, सुसूत्रता होती, एकता होती म्हणून राम-वानरसेना रावण व राक्षस मारुन सीतेला आणू शकले. एकीचं बळ मोठं म्हणून सामाजिक ऐक्य पाहिजे. राम तिथं आहेत.
*प्रगती मे राम है-
शांती आहे. ऐक्य आहे. तर संकटांना समाज एकत्र सामोरा जाऊ शकतो, परस्परांना मदत करून पुन्हा उभा राहू शकतो, आणि प्रगती करु शकतो. राम तिथं आहेत.
*राम बस भक्तों नहीं, शत्रु के भी चिंतन में हैं-
भक्त तर देवाचं स्मरण करतच असतात पण रावण सीतेचं मन बदलावायचा प्रयत्न करताना स्वतःच रामाचा जप करतो. रावणाला सावधान करताना कुंभकर्णही रामाचं गुणवर्णन केल्याचं ऐकलं आहे, शत्रूगटातला तिसरा भाऊ बिभीषण तर सततच राम-नाम जपत होताच. बघा शत्रूच्या विचारात, राम तिथंही आहेत.
*देख तज के पाप रावण, राम तेरे मन में हैं
  राम तेरे मन में हैं, राम मेरे मन में हैं-
खोटा अहंकार, अस्पृश्यता, जातीवाद, वैयक्तिक-सामाजिक प्रगतीसाठी न झटणे, मूलभूत प्रश्नांचा विचार न करणे "असेल माझा हरी/ ठेविले अनंते..." ही वृत्ती पापी आहे, रावणासारखी आहे. तिला सोडा. मग राम तिथं आहेत. राम मनामनांत आहेत. राम सर्वव्यापी आहेत
*राम तो घर घर में हैं, राम हर आँगन में हैं-
प्रत्येक घरात लोक शांती, समाधान, आनंदात राहत आहेत. घरात वातावरण चैतन्यमय आहे. घरातल्या बालगोपालांचं आणि अंगणातल्या तुळस व अन्य झाडांची म्हणजे पर्यायाने निसर्गाची निगा राखली जात आहे. घरात व अंगणात अंतर्बाह्य जिवंतपणा आहे. तिथं राम आहेत.
*मन से रावण जो निकाले, राम उसके मन में हैं-
वैयक्तिक- सामाजिक दोष- दुर्गुण जे रावणासारखे आहेत ते काढून टाका, मग तुमच्यातच राम आहेत.
या गाण्यामध्ये बाकी आध्यात्म आपण ऐकत आलो आहोत, पण या ओळींमध्ये एक वेगळं तत्वज्ञान आहे. तेच समजून घेणं गरजेचं आहे.
         रामलीलेमध्ये हा प्रसंग बघून थोडा अस्वस्थ झालेला मोहन गावकरी लोकांच्या श्रद्धेला नावं ठेवणं, त्यांचा अकारण विरोध करणं, अपमान करणं असे उद्योग करत नाही तर आधी परंपरा पालन पूर्ण होऊ देतो मग त्यांचीच री ओढतो व त्याच्या अनुभवाला आलेलं तत्वज्ञान सगळ्यांसमोर सांगतो. बर हे फक्त त्याच दिवसापुरतं मर्यादित न ठेवता गावासाठी सर्वांना एकत्र आणून त्यांच्याच मदतीनं गावात विजेचा छोटा प्रकल्प उभा करतो, त्यांनतर तो भारतातच स्थायिक होतो, हे सिनेमा पाहिलेल्यांना माहीत आहे. खरं तर हा उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या समाजसेवक, बुद्धिजीवी लोकांसाठी छान उदाहरण आहे की प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करावं.  
          म्हणूनच हे तत्वज्ञान समजून घेऊन ते अंगी बाणवलं जावं. कारण रामराज्य आपोआप येत नाही, त्यासाठी प्रत्येकवेळी राम येण्याचीही वाट पाहत बसू नये, आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. म्हणून जोवर आपल्यात राम आहे तोवर हाच ध्यास धरूया, त्याचसाठी झटूया!
तूर्तास राम राम!.!.! 🙏🏼🙏🏼🙏🏼.

मातृ दिनाच्या इतिहासाची कहाणी

                              प्रेम स्वरूप आई वात्सल्यसिंधु आई                  बोलावू तुज आता मी कोणत्या उपायी                             ...