रविवार, २३ मे, २०२१

मातृ दिनाच्या इतिहासाची कहाणी

          

                   प्रेम स्वरूप आई वात्सल्यसिंधु आई

                 बोलावू तुज आता मी कोणत्या उपायी


                   

                        कवी माधव जुलियन (स्रोत: साभार इंटरनेट)

     मराठीतले प्रसिद्ध कवी माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ माधव जूलियन यांचे शब्द, आणि भारतरत्न लतादीदी यांचा सुमधुर आवाज असलेलं हे गीत प्रसिद्ध आहे. आईचं महत्व खूप छानपणे कवि जुलियन यांनी या गाण्यात सांगितलं आहे. आपल्या सर्वांच्या जीवनात आईचं महत्व शब्दांत न सांगता येण्यासारखं आहे. जगात आपण केवळ आपणच आपल्या देशाला ‘माता’ म्हणतो. आई हा आपल्यासाठी पहिला गुरु आहे, पंढरीतल्या विठुरायालाही वारकरी माऊलीच म्हणतात. रोज आईच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करायला सांगणारी, तिन्ही देवांपेक्षाही श्रेष्ठ मानणारी आपली संस्कृती आईबद्दल बोलताना थकणार नाही. अशा थोर परंपरा जपणारी आपली महान संस्कृती. तर आईला समर्पित असणारा दिवस म्हणजे मातृदिन (mother's day)  पण हा मातृदिन आपल्या संस्कृतीचा भाग आहे का? तो कधी सुरू झाला? कसा सुरू झाला? ही सगळी माहिती जाणून घेऊयात.

  हा मातृदिन हा आपल्या भारतीय संस्कृतीचा भाग नाही. मग हा कसं काय आपण हा साजरा करतो? हा खरंतर पाश्चात्य संस्कृतीतून स्वीकारला आहे, हे आता आपल्याला माहीत आहेच. आपण दुसर्‍यांच खास करून पाश्चत्यांचं अनुकरण लगेच करतो, ते चांगलं की वाईट या वादात पडायचं कशाला? आपल्या संस्कृतीनुसार गुरुपौर्णिमेला आपला मातृदिन असतो. पण दुसर्‍याच्याकडे असलेलं काही चांगलं वाटलं तर ते स्विकारावं ही आपली एक पद्धत आहे. तर वर सांगितल्याप्रमाणं आई जन्म देते, आपल्याला घडवते, उत्तम संस्कार करते, आपल्यासाठी रात्रीचा दिवस करते. तिचे अनंत उपकार असतात आपल्यावर. यातून उतराई तर होता येत नाही पण तिचे आभार मानण्यासाठी हा दिवस निवडला गेला आहे. प्राचीन इतिहासात माता व मातृत्वाचा उत्सव ग्रीक व रोमन यांनी केल्याचे दाखले मिळतात. रिया व क्यबेल या मातृदेवतांच्याप्रीत्यर्थ ते ग्रीक-रोमन सण साजरे करत असत. मे महिन्याचा दुसरा रविवार हा मातृदिन मानला जातो. जगात मातृदिन सुरू करण्याचं श्रेय अमेरिकी महिला अ‍ॅना मारीया जार्विस (Anna maria Jarvis) यांना जातं. अॅना यांचा जन्म अमेरिकेच्या पश्चिमी व्हर्जिनिया मध्ये झाला होता. अ‍ॅनाची आई; तिचं नाव अॅन रीस जार्विस. त्या एक शांतता चळवळीतील कार्यकर्त्या होत्या. तो काळ अमेरिकेतील गृह युद्धाचा होता. जे सैनिक युद्धात जखमी होत, त्यांची सेवा शुश्रूषा करण्याचं काम या अॅन रीस जार्विस करायच्या. त्यांनी पुढे जाऊन मातृदिन कार्यकारी मंडळ सुरू केलं, ज्याद्वारे लोकांच्या आरोग्यासंबंधी तक्रारींचं निराकरण करता यावं.  तिथल्या चर्चमध्ये रविवारी काही अभ्यासवर्ग घ्यायची. बायबलबद्दल ते अभ्यासवर्ग चाललेले असायचे. आपल्या आईबरोबर छोटी अॅनाही त्या ठिकाणी जात असे. शिकवता शिकवता आईने एक इच्छा व्यक्त केल्याचं ऐकलं, आई म्हणाली की भविष्यात एक दिवस असा यावा की आई आणि मातृत्व यांना तो दिवस समर्पित असावा. अशी इच्छा व्यक्त करण्याचं काय तर अमेरिकेमध्ये त्याकाळात केवळ पुरुषांशी संबंधित दिवस साजरे केले जात असत. त्यावेळी अॅना यांचं वय १० ते १३ वर्षाच्या दरम्यान असेल. १९०५ मध्ये जेंव्हा त्यांच्या आईचं निधन झालं त्याच्या साधारणतः दोनेक वर्षांनंतर त्यांनी व त्यांच्या मित्रपरिवाराने या मातृदिनाची सरकार दरबारी नोंद व्हावी यासाठी अभियान चालवलं. १९०८ मध्ये पहिल्यांदा मातृदिन साजरा करण्यात आला. यावेळी अॅना यांचं मत असं होतं की आई गेल्यावर तिच्या आठवणीत आसवं गाळण्यापेक्षा जीवंत असताना तिच्या मुला-बाळांनी तिच्याप्रती प्रेम-कृतज्ञता व्यक्त करावी, तिचा मान-सन्मान करावा. जर असा सगळीकडे खास मातृदिन साजरा केला जाईल तर आई व बाकी कुटुंबामध्ये असणारा बंध अधिक घट्ट होईल.



                    अ‍ॅना मारीया जार्विस (स्रोत: साभार इंटरनेट)

            

    १९०८ मध्ये जेंव्हा अमेरिकी काँग्रेससमोर मातृदिनासंबंधी प्रस्ताव आला तर त्याची हेटाळणी करण्यात आली, याला बहुमातृदिन म्हणण्यात यावं अशी चेष्टा केली आणि हा प्रस्ताव फेटाळला गेला. पण अॅना यांनी आपलं अभियान चालूच ठेवलं. आणि अखेर सहा वर्षानी त्यांच्या अभियानाला यश आलं, ८ मे १९१४ या दिवशी अमेरिकी संसदेने मे महिन्याच्या दुसर्‍या रविवारी मातृदिन साजरा करण्याची घोषणा केली. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती वुड्रो विल्सन (Woodrow Wilson)  यांनी हा दिवस संपूर्ण देश स्तरावर साजरा करण्यात यावा असा आदेश दिला. आणि त्यानंतर आजतागायत ही परंपरा चालू आहे, आणि संपूर्ण जगभर मान्यता पावली आहे. पण उत्सव म्हणलं की तो साजरा करण्यासाठी सजावट आली, भेटवस्तू आल्या, नाही नाही हे आताचं फॅड नाहीए, हे जेंव्हा अॅना जार्विस हयात होत्या, तेंव्हाही चालू होतं. त्यांनी सुरू केलेल्या या उत्सवाला बाजरीकरणाचं स्वरूप प्राप्त झाल्याचं पाहून साहजिकच त्यांना वाईट वाटलं. आपल्या आईसोबत बसून वेळ घालवा, तुम्ही तुमच्या हाताने बनवलेल्या भेटवस्तू तिला द्या, बाजारातून आणलेल्या नकोत, हे लोकांना सांगून जनजागृती करण्यासाठीही त्यांनी खूप प्रयत्न केले. 

   आजही आपण तेच करत आहोत. बाहेरून काहीतरी आणून द्यायचं, जे छान पॅक केलेलं असतं. सोशलमीडियावर पोस्ट किंवा ते स्टेटस् म्हणून आईसोबत एक फोटो लावला की झाला का हो मातृदिन? आईला आपल्या लेकराच्या सगळ्याच कृतींबद्दल कौतूक वाटतं. ती काहीच तक्रार करत नाही. पण आपलं ते काम आहे की तिला खरंच कशाची गरज आहे हे आपण ओळखून घेतलं पाहिजे. तिच्या सोबत वेळ घालवला पाहिजे. वर्षांनुवर्षाच्या धावपळीत तिच्या ज्या इच्छा राहिल्या असतील त्या पूर्ण कशा करता येतील याकडे लक्ष द्यावं. आईला त्यासाठी पाठिंबा द्यायला हवा. पोटापाण्याच्या निमित्तानं जे पालकांपासून दूर आहेत त्यांना शक्य नाही होणार कदाचित पण जे जवळ आहेत त्यांनी हे करावं, जे करत असतील त्यांचं कौतूक करायला हवंच. आईबद्दल बोलू लिहू तेवढं कमीच आहे. जाता जाता शेवटी मातृदिनाच्या निमित्तानं या नारायण सुर्वेंच्या गाण्याच्या ओळी आठवल्या आणि डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या,

                          ‘हंबरून वासराले 

                           चाटती जवा गाय 

                          तवा मले तिच्यामंदी 

                           दिसती माझी माय’

             जगातल्या सर्व मातांना माझा साष्टांग दंडवत!.!.!


अनुभवत असलेली ९०'ज् ची जादू

 ​

    



  चित्रपट संगीत हा आवडीचा विषय नाही असा भारतीय व्यक्ती विरळच असेल, बहुतेक आपण सर्वच सध्याच्या नाही म्हणता येत पण गाण्यांचे दिवाने आहोत, साधारणतः १९५० च्या दशकापासून पासून भारतीय सिनेसंगीत बहराला आलं असं मानलं जातं, १९५० पासून पुढची दशकं ही जसे नवनवीन स्टार्स देत गेली त्याचबरोबरीने नवनवीन गाणी, गायक आणि संगीतकारही मिळाले, १९५० च्या दशकात शंकर-जयकिशन, ओ.पी. नय्यर, सी. रामचंद्र, सलील चौधरी, हेमंत कुमार, एस. डी. बर्मन हे प्रसिद्ध होते, तर ६० च्या दशकांत नौशाद, रवी, रोशन, मदनमोहन त्याच बरोबर एक नवीन जोडी आली होती ती म्हणजे लक्ष्मीकांत-प्यारेलाल. तर ७० च्या दशकात आर. डी. बर्मन उर्फ पंचमदा यांनी हा काळ गाजवला, त्याच बरोबरीने खैय्याम, तर उत्तरार्धात अजून एक प्रसिद्ध जोडी आली कल्याणजी आनंदजी. ८० च्या दशकांत आधीचे ख्यातनाम तर होतेच त्याचबरोबर रवींद्र जैन, शिव-हरी हे अजून नवीन चेहरे होते. ८० च्या शेवटच्या काही वर्षांत हिंदी चित्रपट संगीताचा आपला चेहरा-मोहरा बदलत होता, नवीन  संगीतकार येत होते, कयामत से कयामत तक मध्ये त्यावेळच्या तरुण लोकांचा भरणा होता, हिरो-हिरोईन, गायक-गायिका, संगीतकार नवखे होते, इथूनच ९० च्या सांगीतिक युगाची बीजं रुजली गेली.

     ९० च्या दशकात राम-लक्ष्मण होते, सात-समंदर, चीज बडी है मस्त वाले विजू शाह, राजेश रोशन होते पण ९० चा काळ ज्यांनी गाजवला ते म्हणजे अनु मलिक, जतिन-ललित आणि नदीम श्रवण यांनी. यांत नदीम श्रवण यांचं नाव सगळ्यात वर आहे. जसे तेंव्हा एस.पी.बालसुब्रह्मण्यम, सुरेश वाडकर, हरिहरन हे गायक पण नव्वदीचे गायक-गायिका ज्यांना म्हणतात ते कुमार सानु, उदित नारायण आणि अलका याज्ञीक या तिघांचीच नावं येतात. नदीम श्रवणचं संगीत व या तिघांचा स्वर आणि गीतकार समीर अंजान यांचे शब्द हे अफलातून मिश्रण होतं ते. ९० च्या दशकातल्या प्रेम-कहाण्या फुलल्या त्या यांच्याच गाण्यांमुळं... खरंतर १९९५-९६ पासून हिंदी सिनेसंगीत परत चेहरा बदलत होतं, कारण होतं ए. आर. रहमानचा रंगीला... तसा १९९२ ला च रोजा आला होता पण रंगीला हा तसा नवीन संगीत असलेला हिंदी सिनेमा होता असो. तर हा झाला इतिहास... 

      माझा जन्म १९९१ चा या काळात मी हे सगळं कसा काय अनुभवणार होतो म्हणा, जसं मला कळायला लागलं तसं मी ही गाणी ऐकायला लागलो, माझ्या घरात एकत्र कुटुंबात सगळ्यांना गाण्याची आवड, माझे चुलत भाऊ-सख्खा भाऊ एकाच वयाचे होते, ते या काळात नवतरुण होते,(मी त्यांच्यापेक्षा १५ वर्षांनी लहान..) त्यांच्याकडे गाण्यांच्या खूप कॅसेट्स होत्या, म्हणूनच अगदी ५० ते ९० ची सगळी गाणी मला ऐकायला मिळायची जोडीला रंगोली, सुरभी, आणि रेडिओ होताच...चुलत भावामुळे संगीताचे संस्कार माझ्यावर झाले आहेत. २००३ ला जेंव्हा मध्ये मी वयात येत असताना 'तेरे नाम' सिनेमा आला आणि मला सिनेसंगीत या विषयात आवड निर्माण होण्यास सुरुवात झाली.. गायक, संगीतकार, गीतकार आवर्जून पहायला लागलो, कॅसेट्सचा शेवटचा काळ होता, सीडीज-डीविडीज येत होत्या, मी कॅसेट्स वर ऐकत बसायचो ती तेंव्हाची नवीन गाणी...२००७-०८ मध्ये एफएम मिरची नुकतंच सुरू झालं, त्यावर ९०ज् नॉट आऊट नावाचा कार्यक्रम आहे त्यातही ही गाणी ऐकायचो. मला वाटतं ही गाणी ऐकण्याचा सुद्धा एक खास टाइम आहे, जुनी म्हणजे ५०ज्- ६०ज् गाणी ही रात्री झोपण्याआधी ऐकावीत, तर भल्या पहाटे ७-८ला उठल्यावर ७०-८० च्या दशकातली ऐकावीत आणि ही ९० ज् ची ऐकण्यासाठी दुपारचं जेवण केलं की संध्याकाळच्या चहाच्या दरम्यान जो वेळ असतो तेंव्हा ऐकावीत, माहोल बनतो यार खरंच... बिन पिये नशा होता हैं..... 

 तर या ९० च्या संगीताची मोहिनी माझ्यावर पडली ती २०१५ मध्ये 'दम लगा के हैशा' या सिनेमामुळे. ९०ज् मधले अनु मलिक-कुमार सानु ही सुपरहिट जोडी पुन्हा एकत्र आली होती. मला सानु लहान असताना फारसा आवडायचा नाही ते त्याच्या आवाजामुळे तेंव्हा मला उदित नारायण आवडायचा. पण मी 'दम लगाके' पासून सानुचा फॅन झालो होतो. चुलत भावा बरोबर ९०च्या संगीताची चर्चा व्हायची तेंव्हा तो 'आशिकीचा' उल्लेख करायचा... आशिकी म्हटलं की सानु आणि नदीम श्रवण...

      नदीम-श्रवण त्यांच्या चलतीच्या काळात हात घालतील त्यात यश येत होतं...जरी ते १९७५ पासून इंडस्ट्रीमध्ये काम करत असले तरी १९९० पासून त्यांचं नशीब उजळलं... आणि ते चमकले. त्यांच्या गाण्यात बासरी, सतार आणि ढोलक या वाद्यांचा फार खुबीने केलेला वापर त्यांच्या गाण्यांचं वैशिष्ट्य असायचं. त्यांनी केलेली बहुतेक गाणी फिल्मी गझल या जॉनर मधली असलेली आढळून येतात. सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून सलग तीन व एकूण चार फिल्मफेअर....२ स्टार स्क्रीन , झी सिने आणि लंडनचा खास असे बरेच पुरस्कार त्यांनी मिळवले...

 १९९७ मध्ये गुलशन कुमारच्या हत्येनंतर नदीम जो आधीच लंडनमध्ये होता तो परत आलाच नाही, तरीही त्यांनतर त्याने आणि मुंबईत राहून श्रवणने बरेच हिट सिनेमे दिले...२००६ मध्ये आलेला 'दोस्ती' हा त्यांचा एकत्र शेवटचा सिनेमा होता, खरंतर ही नव्वदची जादू तेंव्हाच संपली होती..२०१५ ते २०१७ या काळात नदीमने स्वतंत्रपणे काही सिनेमांना संगीत दिलं पण फार यश नाही मिळालं... २२ एप्रिल २०२१ ला कोरोनाने श्रवणकुमार राठोड यांचं कोरोनाने दुःखद निधन झालं आणि सर्वच सगीतप्रेमींनी हळहळ व्यक्त केली ...सगळा जुना काळ आठवला गेला..

 श्रवण जरी आता हयात नसले तरी त्यांची ती ९० चं दशक गाजवलेली या द्वयींची अजरामर गाणी जी आजही गावखेड्यात, निमशहरी भागांत, शेअर किंवा वडाप गाडीत किंवा ट्रॅक्टरमध्ये अजूनही सातत्यानं ऐकली जातात;

आपल्या मनावर कायम राज्य करत राहतील...

          साज की जरूरत हैं जैसे मौसिकी के लिए

          त्याचधरतीवर असंही म्हणलं पाहिजे की

  नदीम-श्रवण की जरूरत हैं हम संगीतप्रेमीओं के लिए

 


 

मातृ दिनाच्या इतिहासाची कहाणी

                              प्रेम स्वरूप आई वात्सल्यसिंधु आई                  बोलावू तुज आता मी कोणत्या उपायी                             ...