चित्रपट संगीत हा आवडीचा विषय नाही असा भारतीय व्यक्ती विरळच असेल, बहुतेक आपण सर्वच सध्याच्या नाही म्हणता येत पण गाण्यांचे दिवाने आहोत, साधारणतः १९५० च्या दशकापासून पासून भारतीय सिनेसंगीत बहराला आलं असं मानलं जातं, १९५० पासून पुढची दशकं ही जसे नवनवीन स्टार्स देत गेली त्याचबरोबरीने नवनवीन गाणी, गायक आणि संगीतकारही मिळाले, १९५० च्या दशकात शंकर-जयकिशन, ओ.पी. नय्यर, सी. रामचंद्र, सलील चौधरी, हेमंत कुमार, एस. डी. बर्मन हे प्रसिद्ध होते, तर ६० च्या दशकांत नौशाद, रवी, रोशन, मदनमोहन त्याच बरोबर एक नवीन जोडी आली होती ती म्हणजे लक्ष्मीकांत-प्यारेलाल. तर ७० च्या दशकात आर. डी. बर्मन उर्फ पंचमदा यांनी हा काळ गाजवला, त्याच बरोबरीने खैय्याम, तर उत्तरार्धात अजून एक प्रसिद्ध जोडी आली कल्याणजी आनंदजी. ८० च्या दशकांत आधीचे ख्यातनाम तर होतेच त्याचबरोबर रवींद्र जैन, शिव-हरी हे अजून नवीन चेहरे होते. ८० च्या शेवटच्या काही वर्षांत हिंदी चित्रपट संगीताचा आपला चेहरा-मोहरा बदलत होता, नवीन संगीतकार येत होते, कयामत से कयामत तक मध्ये त्यावेळच्या तरुण लोकांचा भरणा होता, हिरो-हिरोईन, गायक-गायिका, संगीतकार नवखे होते, इथूनच ९० च्या सांगीतिक युगाची बीजं रुजली गेली.
९० च्या दशकात राम-लक्ष्मण होते, सात-समंदर, चीज बडी है मस्त वाले विजू शाह, राजेश रोशन होते पण ९० चा काळ ज्यांनी गाजवला ते म्हणजे अनु मलिक, जतिन-ललित आणि नदीम श्रवण यांनी. यांत नदीम श्रवण यांचं नाव सगळ्यात वर आहे. जसे तेंव्हा एस.पी.बालसुब्रह्मण्यम, सुरेश वाडकर, हरिहरन हे गायक पण नव्वदीचे गायक-गायिका ज्यांना म्हणतात ते कुमार सानु, उदित नारायण आणि अलका याज्ञीक या तिघांचीच नावं येतात. नदीम श्रवणचं संगीत व या तिघांचा स्वर आणि गीतकार समीर अंजान यांचे शब्द हे अफलातून मिश्रण होतं ते. ९० च्या दशकातल्या प्रेम-कहाण्या फुलल्या त्या यांच्याच गाण्यांमुळं... खरंतर १९९५-९६ पासून हिंदी सिनेसंगीत परत चेहरा बदलत होतं, कारण होतं ए. आर. रहमानचा रंगीला... तसा १९९२ ला च रोजा आला होता पण रंगीला हा तसा नवीन संगीत असलेला हिंदी सिनेमा होता असो. तर हा झाला इतिहास...
माझा जन्म १९९१ चा या काळात मी हे सगळं कसा काय अनुभवणार होतो म्हणा, जसं मला कळायला लागलं तसं मी ही गाणी ऐकायला लागलो, माझ्या घरात एकत्र कुटुंबात सगळ्यांना गाण्याची आवड, माझे चुलत भाऊ-सख्खा भाऊ एकाच वयाचे होते, ते या काळात नवतरुण होते,(मी त्यांच्यापेक्षा १५ वर्षांनी लहान..) त्यांच्याकडे गाण्यांच्या खूप कॅसेट्स होत्या, म्हणूनच अगदी ५० ते ९० ची सगळी गाणी मला ऐकायला मिळायची जोडीला रंगोली, सुरभी, आणि रेडिओ होताच...चुलत भावामुळे संगीताचे संस्कार माझ्यावर झाले आहेत. २००३ ला जेंव्हा मध्ये मी वयात येत असताना 'तेरे नाम' सिनेमा आला आणि मला सिनेसंगीत या विषयात आवड निर्माण होण्यास सुरुवात झाली.. गायक, संगीतकार, गीतकार आवर्जून पहायला लागलो, कॅसेट्सचा शेवटचा काळ होता, सीडीज-डीविडीज येत होत्या, मी कॅसेट्स वर ऐकत बसायचो ती तेंव्हाची नवीन गाणी...२००७-०८ मध्ये एफएम मिरची नुकतंच सुरू झालं, त्यावर ९०ज् नॉट आऊट नावाचा कार्यक्रम आहे त्यातही ही गाणी ऐकायचो. मला वाटतं ही गाणी ऐकण्याचा सुद्धा एक खास टाइम आहे, जुनी म्हणजे ५०ज्- ६०ज् गाणी ही रात्री झोपण्याआधी ऐकावीत, तर भल्या पहाटे ७-८ला उठल्यावर ७०-८० च्या दशकातली ऐकावीत आणि ही ९० ज् ची ऐकण्यासाठी दुपारचं जेवण केलं की संध्याकाळच्या चहाच्या दरम्यान जो वेळ असतो तेंव्हा ऐकावीत, माहोल बनतो यार खरंच... बिन पिये नशा होता हैं.....
तर या ९० च्या संगीताची मोहिनी माझ्यावर पडली ती २०१५ मध्ये 'दम लगा के हैशा' या सिनेमामुळे. ९०ज् मधले अनु मलिक-कुमार सानु ही सुपरहिट जोडी पुन्हा एकत्र आली होती. मला सानु लहान असताना फारसा आवडायचा नाही ते त्याच्या आवाजामुळे तेंव्हा मला उदित नारायण आवडायचा. पण मी 'दम लगाके' पासून सानुचा फॅन झालो होतो. चुलत भावा बरोबर ९०च्या संगीताची चर्चा व्हायची तेंव्हा तो 'आशिकीचा' उल्लेख करायचा... आशिकी म्हटलं की सानु आणि नदीम श्रवण...
नदीम-श्रवण त्यांच्या चलतीच्या काळात हात घालतील त्यात यश येत होतं...जरी ते १९७५ पासून इंडस्ट्रीमध्ये काम करत असले तरी १९९० पासून त्यांचं नशीब उजळलं... आणि ते चमकले. त्यांच्या गाण्यात बासरी, सतार आणि ढोलक या वाद्यांचा फार खुबीने केलेला वापर त्यांच्या गाण्यांचं वैशिष्ट्य असायचं. त्यांनी केलेली बहुतेक गाणी फिल्मी गझल या जॉनर मधली असलेली आढळून येतात. सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून सलग तीन व एकूण चार फिल्मफेअर....२ स्टार स्क्रीन , झी सिने आणि लंडनचा खास असे बरेच पुरस्कार त्यांनी मिळवले...
१९९७ मध्ये गुलशन कुमारच्या हत्येनंतर नदीम जो आधीच लंडनमध्ये होता तो परत आलाच नाही, तरीही त्यांनतर त्याने आणि मुंबईत राहून श्रवणने बरेच हिट सिनेमे दिले...२००६ मध्ये आलेला 'दोस्ती' हा त्यांचा एकत्र शेवटचा सिनेमा होता, खरंतर ही नव्वदची जादू तेंव्हाच संपली होती..२०१५ ते २०१७ या काळात नदीमने स्वतंत्रपणे काही सिनेमांना संगीत दिलं पण फार यश नाही मिळालं... २२ एप्रिल २०२१ ला कोरोनाने श्रवणकुमार राठोड यांचं कोरोनाने दुःखद निधन झालं आणि सर्वच सगीतप्रेमींनी हळहळ व्यक्त केली ...सगळा जुना काळ आठवला गेला..
श्रवण जरी आता हयात नसले तरी त्यांची ती ९० चं दशक गाजवलेली या द्वयींची अजरामर गाणी जी आजही गावखेड्यात, निमशहरी भागांत, शेअर किंवा वडाप गाडीत किंवा ट्रॅक्टरमध्ये अजूनही सातत्यानं ऐकली जातात;
आपल्या मनावर कायम राज्य करत राहतील...
साज की जरूरत हैं जैसे मौसिकी के लिए
त्याचधरतीवर असंही म्हणलं पाहिजे की
नदीम-श्रवण की जरूरत हैं हम संगीतप्रेमीओं के लिए


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा