रविवार, २३ मे, २०२१

मातृ दिनाच्या इतिहासाची कहाणी

          

                   प्रेम स्वरूप आई वात्सल्यसिंधु आई

                 बोलावू तुज आता मी कोणत्या उपायी


                   

                        कवी माधव जुलियन (स्रोत: साभार इंटरनेट)

     मराठीतले प्रसिद्ध कवी माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ माधव जूलियन यांचे शब्द, आणि भारतरत्न लतादीदी यांचा सुमधुर आवाज असलेलं हे गीत प्रसिद्ध आहे. आईचं महत्व खूप छानपणे कवि जुलियन यांनी या गाण्यात सांगितलं आहे. आपल्या सर्वांच्या जीवनात आईचं महत्व शब्दांत न सांगता येण्यासारखं आहे. जगात आपण केवळ आपणच आपल्या देशाला ‘माता’ म्हणतो. आई हा आपल्यासाठी पहिला गुरु आहे, पंढरीतल्या विठुरायालाही वारकरी माऊलीच म्हणतात. रोज आईच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करायला सांगणारी, तिन्ही देवांपेक्षाही श्रेष्ठ मानणारी आपली संस्कृती आईबद्दल बोलताना थकणार नाही. अशा थोर परंपरा जपणारी आपली महान संस्कृती. तर आईला समर्पित असणारा दिवस म्हणजे मातृदिन (mother's day)  पण हा मातृदिन आपल्या संस्कृतीचा भाग आहे का? तो कधी सुरू झाला? कसा सुरू झाला? ही सगळी माहिती जाणून घेऊयात.

  हा मातृदिन हा आपल्या भारतीय संस्कृतीचा भाग नाही. मग हा कसं काय आपण हा साजरा करतो? हा खरंतर पाश्चात्य संस्कृतीतून स्वीकारला आहे, हे आता आपल्याला माहीत आहेच. आपण दुसर्‍यांच खास करून पाश्चत्यांचं अनुकरण लगेच करतो, ते चांगलं की वाईट या वादात पडायचं कशाला? आपल्या संस्कृतीनुसार गुरुपौर्णिमेला आपला मातृदिन असतो. पण दुसर्‍याच्याकडे असलेलं काही चांगलं वाटलं तर ते स्विकारावं ही आपली एक पद्धत आहे. तर वर सांगितल्याप्रमाणं आई जन्म देते, आपल्याला घडवते, उत्तम संस्कार करते, आपल्यासाठी रात्रीचा दिवस करते. तिचे अनंत उपकार असतात आपल्यावर. यातून उतराई तर होता येत नाही पण तिचे आभार मानण्यासाठी हा दिवस निवडला गेला आहे. प्राचीन इतिहासात माता व मातृत्वाचा उत्सव ग्रीक व रोमन यांनी केल्याचे दाखले मिळतात. रिया व क्यबेल या मातृदेवतांच्याप्रीत्यर्थ ते ग्रीक-रोमन सण साजरे करत असत. मे महिन्याचा दुसरा रविवार हा मातृदिन मानला जातो. जगात मातृदिन सुरू करण्याचं श्रेय अमेरिकी महिला अ‍ॅना मारीया जार्विस (Anna maria Jarvis) यांना जातं. अॅना यांचा जन्म अमेरिकेच्या पश्चिमी व्हर्जिनिया मध्ये झाला होता. अ‍ॅनाची आई; तिचं नाव अॅन रीस जार्विस. त्या एक शांतता चळवळीतील कार्यकर्त्या होत्या. तो काळ अमेरिकेतील गृह युद्धाचा होता. जे सैनिक युद्धात जखमी होत, त्यांची सेवा शुश्रूषा करण्याचं काम या अॅन रीस जार्विस करायच्या. त्यांनी पुढे जाऊन मातृदिन कार्यकारी मंडळ सुरू केलं, ज्याद्वारे लोकांच्या आरोग्यासंबंधी तक्रारींचं निराकरण करता यावं.  तिथल्या चर्चमध्ये रविवारी काही अभ्यासवर्ग घ्यायची. बायबलबद्दल ते अभ्यासवर्ग चाललेले असायचे. आपल्या आईबरोबर छोटी अॅनाही त्या ठिकाणी जात असे. शिकवता शिकवता आईने एक इच्छा व्यक्त केल्याचं ऐकलं, आई म्हणाली की भविष्यात एक दिवस असा यावा की आई आणि मातृत्व यांना तो दिवस समर्पित असावा. अशी इच्छा व्यक्त करण्याचं काय तर अमेरिकेमध्ये त्याकाळात केवळ पुरुषांशी संबंधित दिवस साजरे केले जात असत. त्यावेळी अॅना यांचं वय १० ते १३ वर्षाच्या दरम्यान असेल. १९०५ मध्ये जेंव्हा त्यांच्या आईचं निधन झालं त्याच्या साधारणतः दोनेक वर्षांनंतर त्यांनी व त्यांच्या मित्रपरिवाराने या मातृदिनाची सरकार दरबारी नोंद व्हावी यासाठी अभियान चालवलं. १९०८ मध्ये पहिल्यांदा मातृदिन साजरा करण्यात आला. यावेळी अॅना यांचं मत असं होतं की आई गेल्यावर तिच्या आठवणीत आसवं गाळण्यापेक्षा जीवंत असताना तिच्या मुला-बाळांनी तिच्याप्रती प्रेम-कृतज्ञता व्यक्त करावी, तिचा मान-सन्मान करावा. जर असा सगळीकडे खास मातृदिन साजरा केला जाईल तर आई व बाकी कुटुंबामध्ये असणारा बंध अधिक घट्ट होईल.



                    अ‍ॅना मारीया जार्विस (स्रोत: साभार इंटरनेट)

            

    १९०८ मध्ये जेंव्हा अमेरिकी काँग्रेससमोर मातृदिनासंबंधी प्रस्ताव आला तर त्याची हेटाळणी करण्यात आली, याला बहुमातृदिन म्हणण्यात यावं अशी चेष्टा केली आणि हा प्रस्ताव फेटाळला गेला. पण अॅना यांनी आपलं अभियान चालूच ठेवलं. आणि अखेर सहा वर्षानी त्यांच्या अभियानाला यश आलं, ८ मे १९१४ या दिवशी अमेरिकी संसदेने मे महिन्याच्या दुसर्‍या रविवारी मातृदिन साजरा करण्याची घोषणा केली. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती वुड्रो विल्सन (Woodrow Wilson)  यांनी हा दिवस संपूर्ण देश स्तरावर साजरा करण्यात यावा असा आदेश दिला. आणि त्यानंतर आजतागायत ही परंपरा चालू आहे, आणि संपूर्ण जगभर मान्यता पावली आहे. पण उत्सव म्हणलं की तो साजरा करण्यासाठी सजावट आली, भेटवस्तू आल्या, नाही नाही हे आताचं फॅड नाहीए, हे जेंव्हा अॅना जार्विस हयात होत्या, तेंव्हाही चालू होतं. त्यांनी सुरू केलेल्या या उत्सवाला बाजरीकरणाचं स्वरूप प्राप्त झाल्याचं पाहून साहजिकच त्यांना वाईट वाटलं. आपल्या आईसोबत बसून वेळ घालवा, तुम्ही तुमच्या हाताने बनवलेल्या भेटवस्तू तिला द्या, बाजारातून आणलेल्या नकोत, हे लोकांना सांगून जनजागृती करण्यासाठीही त्यांनी खूप प्रयत्न केले. 

   आजही आपण तेच करत आहोत. बाहेरून काहीतरी आणून द्यायचं, जे छान पॅक केलेलं असतं. सोशलमीडियावर पोस्ट किंवा ते स्टेटस् म्हणून आईसोबत एक फोटो लावला की झाला का हो मातृदिन? आईला आपल्या लेकराच्या सगळ्याच कृतींबद्दल कौतूक वाटतं. ती काहीच तक्रार करत नाही. पण आपलं ते काम आहे की तिला खरंच कशाची गरज आहे हे आपण ओळखून घेतलं पाहिजे. तिच्या सोबत वेळ घालवला पाहिजे. वर्षांनुवर्षाच्या धावपळीत तिच्या ज्या इच्छा राहिल्या असतील त्या पूर्ण कशा करता येतील याकडे लक्ष द्यावं. आईला त्यासाठी पाठिंबा द्यायला हवा. पोटापाण्याच्या निमित्तानं जे पालकांपासून दूर आहेत त्यांना शक्य नाही होणार कदाचित पण जे जवळ आहेत त्यांनी हे करावं, जे करत असतील त्यांचं कौतूक करायला हवंच. आईबद्दल बोलू लिहू तेवढं कमीच आहे. जाता जाता शेवटी मातृदिनाच्या निमित्तानं या नारायण सुर्वेंच्या गाण्याच्या ओळी आठवल्या आणि डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या,

                          ‘हंबरून वासराले 

                           चाटती जवा गाय 

                          तवा मले तिच्यामंदी 

                           दिसती माझी माय’

             जगातल्या सर्व मातांना माझा साष्टांग दंडवत!.!.!


अनुभवत असलेली ९०'ज् ची जादू

 ​

    



  चित्रपट संगीत हा आवडीचा विषय नाही असा भारतीय व्यक्ती विरळच असेल, बहुतेक आपण सर्वच सध्याच्या नाही म्हणता येत पण गाण्यांचे दिवाने आहोत, साधारणतः १९५० च्या दशकापासून पासून भारतीय सिनेसंगीत बहराला आलं असं मानलं जातं, १९५० पासून पुढची दशकं ही जसे नवनवीन स्टार्स देत गेली त्याचबरोबरीने नवनवीन गाणी, गायक आणि संगीतकारही मिळाले, १९५० च्या दशकात शंकर-जयकिशन, ओ.पी. नय्यर, सी. रामचंद्र, सलील चौधरी, हेमंत कुमार, एस. डी. बर्मन हे प्रसिद्ध होते, तर ६० च्या दशकांत नौशाद, रवी, रोशन, मदनमोहन त्याच बरोबर एक नवीन जोडी आली होती ती म्हणजे लक्ष्मीकांत-प्यारेलाल. तर ७० च्या दशकात आर. डी. बर्मन उर्फ पंचमदा यांनी हा काळ गाजवला, त्याच बरोबरीने खैय्याम, तर उत्तरार्धात अजून एक प्रसिद्ध जोडी आली कल्याणजी आनंदजी. ८० च्या दशकांत आधीचे ख्यातनाम तर होतेच त्याचबरोबर रवींद्र जैन, शिव-हरी हे अजून नवीन चेहरे होते. ८० च्या शेवटच्या काही वर्षांत हिंदी चित्रपट संगीताचा आपला चेहरा-मोहरा बदलत होता, नवीन  संगीतकार येत होते, कयामत से कयामत तक मध्ये त्यावेळच्या तरुण लोकांचा भरणा होता, हिरो-हिरोईन, गायक-गायिका, संगीतकार नवखे होते, इथूनच ९० च्या सांगीतिक युगाची बीजं रुजली गेली.

     ९० च्या दशकात राम-लक्ष्मण होते, सात-समंदर, चीज बडी है मस्त वाले विजू शाह, राजेश रोशन होते पण ९० चा काळ ज्यांनी गाजवला ते म्हणजे अनु मलिक, जतिन-ललित आणि नदीम श्रवण यांनी. यांत नदीम श्रवण यांचं नाव सगळ्यात वर आहे. जसे तेंव्हा एस.पी.बालसुब्रह्मण्यम, सुरेश वाडकर, हरिहरन हे गायक पण नव्वदीचे गायक-गायिका ज्यांना म्हणतात ते कुमार सानु, उदित नारायण आणि अलका याज्ञीक या तिघांचीच नावं येतात. नदीम श्रवणचं संगीत व या तिघांचा स्वर आणि गीतकार समीर अंजान यांचे शब्द हे अफलातून मिश्रण होतं ते. ९० च्या दशकातल्या प्रेम-कहाण्या फुलल्या त्या यांच्याच गाण्यांमुळं... खरंतर १९९५-९६ पासून हिंदी सिनेसंगीत परत चेहरा बदलत होतं, कारण होतं ए. आर. रहमानचा रंगीला... तसा १९९२ ला च रोजा आला होता पण रंगीला हा तसा नवीन संगीत असलेला हिंदी सिनेमा होता असो. तर हा झाला इतिहास... 

      माझा जन्म १९९१ चा या काळात मी हे सगळं कसा काय अनुभवणार होतो म्हणा, जसं मला कळायला लागलं तसं मी ही गाणी ऐकायला लागलो, माझ्या घरात एकत्र कुटुंबात सगळ्यांना गाण्याची आवड, माझे चुलत भाऊ-सख्खा भाऊ एकाच वयाचे होते, ते या काळात नवतरुण होते,(मी त्यांच्यापेक्षा १५ वर्षांनी लहान..) त्यांच्याकडे गाण्यांच्या खूप कॅसेट्स होत्या, म्हणूनच अगदी ५० ते ९० ची सगळी गाणी मला ऐकायला मिळायची जोडीला रंगोली, सुरभी, आणि रेडिओ होताच...चुलत भावामुळे संगीताचे संस्कार माझ्यावर झाले आहेत. २००३ ला जेंव्हा मध्ये मी वयात येत असताना 'तेरे नाम' सिनेमा आला आणि मला सिनेसंगीत या विषयात आवड निर्माण होण्यास सुरुवात झाली.. गायक, संगीतकार, गीतकार आवर्जून पहायला लागलो, कॅसेट्सचा शेवटचा काळ होता, सीडीज-डीविडीज येत होत्या, मी कॅसेट्स वर ऐकत बसायचो ती तेंव्हाची नवीन गाणी...२००७-०८ मध्ये एफएम मिरची नुकतंच सुरू झालं, त्यावर ९०ज् नॉट आऊट नावाचा कार्यक्रम आहे त्यातही ही गाणी ऐकायचो. मला वाटतं ही गाणी ऐकण्याचा सुद्धा एक खास टाइम आहे, जुनी म्हणजे ५०ज्- ६०ज् गाणी ही रात्री झोपण्याआधी ऐकावीत, तर भल्या पहाटे ७-८ला उठल्यावर ७०-८० च्या दशकातली ऐकावीत आणि ही ९० ज् ची ऐकण्यासाठी दुपारचं जेवण केलं की संध्याकाळच्या चहाच्या दरम्यान जो वेळ असतो तेंव्हा ऐकावीत, माहोल बनतो यार खरंच... बिन पिये नशा होता हैं..... 

 तर या ९० च्या संगीताची मोहिनी माझ्यावर पडली ती २०१५ मध्ये 'दम लगा के हैशा' या सिनेमामुळे. ९०ज् मधले अनु मलिक-कुमार सानु ही सुपरहिट जोडी पुन्हा एकत्र आली होती. मला सानु लहान असताना फारसा आवडायचा नाही ते त्याच्या आवाजामुळे तेंव्हा मला उदित नारायण आवडायचा. पण मी 'दम लगाके' पासून सानुचा फॅन झालो होतो. चुलत भावा बरोबर ९०च्या संगीताची चर्चा व्हायची तेंव्हा तो 'आशिकीचा' उल्लेख करायचा... आशिकी म्हटलं की सानु आणि नदीम श्रवण...

      नदीम-श्रवण त्यांच्या चलतीच्या काळात हात घालतील त्यात यश येत होतं...जरी ते १९७५ पासून इंडस्ट्रीमध्ये काम करत असले तरी १९९० पासून त्यांचं नशीब उजळलं... आणि ते चमकले. त्यांच्या गाण्यात बासरी, सतार आणि ढोलक या वाद्यांचा फार खुबीने केलेला वापर त्यांच्या गाण्यांचं वैशिष्ट्य असायचं. त्यांनी केलेली बहुतेक गाणी फिल्मी गझल या जॉनर मधली असलेली आढळून येतात. सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून सलग तीन व एकूण चार फिल्मफेअर....२ स्टार स्क्रीन , झी सिने आणि लंडनचा खास असे बरेच पुरस्कार त्यांनी मिळवले...

 १९९७ मध्ये गुलशन कुमारच्या हत्येनंतर नदीम जो आधीच लंडनमध्ये होता तो परत आलाच नाही, तरीही त्यांनतर त्याने आणि मुंबईत राहून श्रवणने बरेच हिट सिनेमे दिले...२००६ मध्ये आलेला 'दोस्ती' हा त्यांचा एकत्र शेवटचा सिनेमा होता, खरंतर ही नव्वदची जादू तेंव्हाच संपली होती..२०१५ ते २०१७ या काळात नदीमने स्वतंत्रपणे काही सिनेमांना संगीत दिलं पण फार यश नाही मिळालं... २२ एप्रिल २०२१ ला कोरोनाने श्रवणकुमार राठोड यांचं कोरोनाने दुःखद निधन झालं आणि सर्वच सगीतप्रेमींनी हळहळ व्यक्त केली ...सगळा जुना काळ आठवला गेला..

 श्रवण जरी आता हयात नसले तरी त्यांची ती ९० चं दशक गाजवलेली या द्वयींची अजरामर गाणी जी आजही गावखेड्यात, निमशहरी भागांत, शेअर किंवा वडाप गाडीत किंवा ट्रॅक्टरमध्ये अजूनही सातत्यानं ऐकली जातात;

आपल्या मनावर कायम राज्य करत राहतील...

          साज की जरूरत हैं जैसे मौसिकी के लिए

          त्याचधरतीवर असंही म्हणलं पाहिजे की

  नदीम-श्रवण की जरूरत हैं हम संगीतप्रेमीओं के लिए

 


 

बुधवार, ७ एप्रिल, २०२१

रोगाशी लढायचं आहे रोग्याशी नाही.

    गेल्या वर्षीचा ८०% काळ आपण टाळेबंदीत काढला, कोरोनाचा कहर पाहिला, सध्या परत तीच परिस्थिती ओढवली आहे, पुन्हा लॉकडाऊनची टांगती तलवार आहेच. पण या सगळ्यात आपल्याला आठवत असेल तर कोरोनाची साथ सुरू झाल्यावर ती खोकल्याची नंतर ही मास्क घाला वगैरे, विलगीकरणासंदर्भातली आणि नंतर बच्चन यांच्या आवाजातली अशा वेगवेगळ्या कॉलर ट्यून आठवत आहेत का? मला नाही वाटत की त्या विसरल्या असतील कारण हे कोरोना संकट, ते सगळे निर्बंध, या सूचना तेंव्हा आपल्यासाठी नवीन होत्या, म्हणून ते पक्कं डोक्यात बसलं आहे. त्यातली ही "आपल्याला रोगाशी लढायचं आहे रोग्याशी नाही." ही जरा खास आहे कशामुळे काय ते जरा पाहूयात.....

      कोविड १९ ची साथ पसरली आणि सर्वांचं आयुष्य बदलून गेलं आहे, कोविडचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपल्या सर्वांना अंतर ठेवून वावरायला सांगण्यात आलं होतं, आता परत तेच सांगत आहेत पण आता ती गोष्ट होत नाही जी आधी झालेली आहे, की ज्यांना कोविड झाला त्यांना  संस्थात्मक विलगीकरणात (istitutional quarantine) ठेवण्यात आलं होतं. कोविड बरा झाल्यानंतर या लोकांना घरी आल्यावरही त्यांच्या संपर्कात कुणी येत नव्हतं, शिवत नव्हतं. आपल्याला कोविड होईल या भीतीने आजूबाजूचे लोक जवळ येत नव्हते. हे इतक्या थराला जात होतं की पूर्वी कुष्ठरोग्यांना जशी वागणूक दिली जायची तीच वागणूक बऱ्या होणाऱ्या व्यक्तींना दिली जात होती. ही परिस्थिती फक्त गरीब किंवा निम्न - अति निम्न मध्यमवर्गीय वस्त्यांमध्ये नव्हती तर उच्चभ्रू सोसायट्यांमध्येही असाच अडाणीपणाचा एपिसोड चालू होता, बरं त्यावेळी अज्ञान होतं, भीती होती म्हणून ठीक पण याचा परिणाम असा होत होता की त्या रुग्णांना या मिळणाऱ्या वागणुकीमुळं नकारात्मकता येत होती, खूप वाईट अनुभव येत होते. लोकांचे डोळे उघडावे म्हणून ही कॉलर ट्यून सुरू करण्यात आली.....मग हळूहळू हे वागणं कमी होत गेलं...

        आपल्या देशामध्ये समाजसुधारणेचं खूप मोठं काम झालं आहे. महात्मा फुले, राजाराम मोहन रॉय, स्वामी दयानंद सरस्वती, न्या. रानडे, आगरकर, कर्वे, विठ्ठल रामजी शिंदे, राजर्षी शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, गाडगेबाबा इ. ही समाज सुधारकांची नावं इतिहासात अजरामर झालेली आहे. यांनी आपलं आयुष्य समाजाच्या सुधारणे बरोबरच विकासासाठी, स्थिरता देण्यासाठी खर्ची घातलं. ते कायम आपल्याला वंदनीय आहेत. आजच्या काळातही आपण त्यांच्याच विचारांवर चालण्याचं काम करतो. 

           इथं कोविड सोडून इतिहासात जायचं काय कारण आहे? असं वाटलं असेल ना? कारण सध्या कोविड सोडला तर बऱ्याच बाबतीत रोगाशी न लढता रोग्याशी लढत असलेली उदाहरणं पाहायला मिळत आहेत. या समाजसुधारकांचे इथं नक्की काय म्हणावं हा शब्दच सुचत नाही कारण त्यांना अनुयायी म्हणलं तर समाजसुधारकांचे विचार त्यांनी कितीसे समजून घेतले आहेत याची शंका येते... भक्त म्हणावं तर त्यांनी समाजसुधारकांनी सांगितलेल्या मार्गाच्या  विरुद्ध मार्गावर ही लोकं चालत असतात. स्वतःला 'पुरोगामी' म्हणवून घेतात, हे लोक. 'स्वातंत्र्य' 'समता' व 'बंधुता' 'एकता' 'अखंडता' या शब्दांचा कायम वापर करतात, कारण या शब्दांना राज्यघटनेत स्थान आहे. पण या शब्दांप्रमाणे वागतात का? आपल्याला बऱ्याच वेळा सोशल मीडिया बातम्या, वर्तमानपत्रांमधून हे पहायला मिळतं... एकी नांदेल असं यांचं वागणं नसतं, कायम दुफळी माजेल, कोणत्याही समाजविघातक घटनेत हे लोक फोडणी टाकतात, ती अधिक पेटली जाईल याची काळजी घेतात. हे लोक सक्रिय राजकारणी नाहीत; पत्रकार, साहित्यिक, प्राध्यापक, कलाकार म्हणजे एकूणच सामाजिक भान असणारी बुद्धीजीवी मंडळी आहेत. इथं राजकारणी लोकांना का नाही टार्गेट केलं आहे? कारण राजकारणात नीतीला नितीमत्तेपेक्षा जास्त महत्व आहे. पण वर उल्लेख केलेले लोक हे मूल्ये, नीतीमत्ता, आदर्शांचा  यांचा बोलण्यात वापर करतात.. पण खरंतर सक्रिय राजकारणी लोकांपेक्षा हे मोठे लबाड, कावेबाज असतात. राजकारणी ढोंग करतात असं म्हणलं तर हे त्यांच्याहून मोठे ढोंगी आहेत, राजकारणात मतं, मूल्ये, आदर्शांवर कायम ठाम असून चालत नाही वेळ येईल तसा त्याच्यात बदल हा करावाच लागतो, म्हणून राजकारणी आपापल्या जागी बरोबर आहेत असं म्हणलं पााहिजे. कोणत्या गुन्ह्यात जर ते दोषी असतील तर तो भाग वेगळा....कारण त्याची शहानिशा करायला, शिक्षा करायला कोर्ट आहे.  तर या पुरोगामी लोकांना जातपात रहित समाज हवा आहे तर जाती-जातीत  मुख्यत्वे क्षत्रिय विरुद्ध दलित किंवा ओबीसी असे वाद पेटत रहावेत,  ब्राह्मण - ब्राह्मणेत्तर  चळवळ याला इतिहास आहे. पण ही चळवळ सुद्धा समतेसाठी, शोषित लोकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी होती. अजूनही उत्तर भारतात या चळवळीची जास्त गरज आहे तिथला जातीयवाद नाही संपला....कारण महाराष्ट्रापासून खाली दक्षिण भारतीय ब्राह्मण इतके सरंजामशहा आता नाहीत, तरीही सर्व समाजाचं प्रबोधन करण्यापेक्षा 'ब्राह्मण भगाव देश बचाव' '१९४८ परत केलं जाईल' अशा धमक्या दिल्या जातात, 'मनुवाद' अजून काय तर 'संघवाद' से आझादी....कुणीही यांना प्रश्न विचारावा की देश वाचवण्यासाठी ब्राह्मणांना पळवून लावलंत का? गेले का सगळे ब्राह्मण पळून? नाही गेले तर कधी लावायचं? घटनेनं सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य दिलं असताना ही अजून कसली आझादी? बरं आझादी कधी आणि कशी मिळावयाची की जन्मभर फक्त ते डफ बडवत बसायचे आहेत? ही सामाजिक चळवळ कधी पर्यंत चालू राहणार याला यश मिळतंय का? मिळत नाही तर का मिळत नाही?  बरं हे सगळं विष कोणाच्या मनात कालवलं जातं  तर बहुजन तरुणांच्या मनात...म्हणजे हातघाईचे प्रसंग आले की हे म्होरके निवांत बसतात..आणि शेकलं जातं तरुण पोरांच्या अंगावर....दिल्लीत शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेली लाल किल्ला दंगल आठवा. या पुरोगामी लोकांच्या नादाला लागलेले किती दलित व अहिंदू तरुण- तरुणी उच्च शिक्षण घेऊन परदेशात गेले किंवा भारतात कुठल्या कुठल्या क्षेत्रात कार्यरत आहेत? आणि जे ओबीसी, एससी-एसटी तरुण-तरुणी सरकारी आणि खाजगी क्षेत्रातल्या मोठमोठ्या हुद्यांवर आहेत, ते यांच्या नादाला न लागता स्वतः कष्ट करून पुढं आलेले आहेत. सत्ताधारी पक्षाच्या निर्णयांना नावं ठेवा, त्याला विरोध करा, राजकीय भाग आहे तो पण त्याचा आधार घेऊन केवळ हिंदू धर्मालाच लक्ष्य केलं जातं...सत्ताधारी पक्ष म्हणजे संपूर्ण हिंदू समाज नव्हे....हिंदूंमध्ये कुप्रथा, वाईट चालीरीती आजही आहेत पण यासाठी अख्खा धर्मच वाईट, काहीच चांगलं त्यामध्ये नसेल का? बरं बाकी धर्मांबद्दल काही बोलायचं नाही कारण त्यांना घटनेनं स्वातंत्र्य दिलं आहे, त्यामुळं बाकी धर्म आपल्या कुप्रथा वगैरे जपत असतात, त्यावेळी हे बुद्धीजीवी चिडीचूप असतात.यांना ज्याप्रमाणे 'दाभोलकर आठवतात तर दाभोलकरांचे प्रेरणास्थान असणारे व ज्यांच्या नावावरून दाभोलकरांनी आपल्या मुलाचं नाव ठेवलं ते 'हमीद दलवाई' का नाही आठवत? त्याच दाभोलकर-पानसरेंचे खुनी सापडले जावेत, त्यांना शिक्षा व्हावी यासाठी किती मोठं आंदोलन उभं राहायला हवं होतं पण या ढोंग्यांनी काहीही केलं नाही...खरा इतिहास पाहिजे म्हणून इतिहास पुन्हा लिहिला पाहिजे म्हणायचं आणि मुद्दाम अशा घटना लिहायच्या ज्यामध्ये आक्रमाकांना चांगलं दाखवायचं की वाचणाऱ्याला प्रश्न पडला पाहिजे की हे आक्रमक इतके चांगले होते तर शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण कशासाठी केलं? इंग्रजांचा सुधारणावादी दृष्टिकोन समोर ठेवायचा की वाटलं पाहिजे...सगळे स्वातंत्र्यसैनिक उगीच चांगल्या राजवटीच्या विरोधात होते. यांच्या मते हिंदू समाज हिंदुत्वाच्या रोगी मानसिकतेत अडकला आहे, तर त्याला यातून बाहेर काढण्यासाठी प्रबोधनाचं औषध द्यायला हवं ना..ते हे ढोंगी पुरोगामी देतात का? नाही....या उलट हिंदू धर्माची टिंगलटवाळी बदनामी करण्यात धन्यता मानतात. हे सगळं वागणं इतक्या थराला गेलेलं आपण कायम पाहतो की भारतीय शासन व्यवस्थेच्या विरुद्ध हे पुरोगामी- उदारमतवादी (लिबरल) बोलून जातात...राजद्रोह करतात...पुलवामा हल्यानंतर "how is the josh?" ट्विट केलं जातं...बरं नुकत्याच झालेल्या छत्तीसगड मधल्या नक्षली हल्ल्याबाबत काहीच बोललं जातं नाही...हे सगळं हे लोक ढोंगी आहेत हे दाखवतं....हे भारतात आपली समांतर व्यवस्था प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असतात, देशातलं वातावरण यांनी गढूळ केलं की याचा फायदा आपल्या शत्रू राष्ट्रांना होतो...कदाचित ही शत्रू राष्ट्रे यांना त्याबद्दल आर्थिक मदतही करत असतील.

    


( पुरोगाम्यांना जर अल्पसंख्यांंक समाजाबद्दल इतकी काळजी आहे, तर त्यांनी मागच्या वर्षी कोरोनाबद्दल गांभीर्य बाळगणं असेल किंवा सध्या लसीकरणाबद्दल या समाजात जागृती का निर्माण नाही केली?...जर केली असती तर अशा बातम्या का आल्या असत्या? ढोंग कायम उघडं पडतंय..)

      आता सांगा खरे रोगी कोण? आपापल्या धर्माचं पालन करणारे सगळे थोडे शहाणे- थोडे मूर्ख असे आपण अर्धवट भारतीय की स्वतःला शहाणे समजणारे आणि सामाजिक शांतता प्रस्थापित करतो असं दाखवणारे आणि वास्तवात समाज फोडणारे आणि देशविघातक कामं करणारे हे बुद्धीजीवी, पुरोगामी, उदारमतवादी? या पुरोगामी लोकांना "शहाण्याला शब्दांचा मार" असं सांगून ते ऐकणाऱ्यांपैकी नाहीत..म्हणून या रोग्यांना ते जेंव्हा जेंव्हा सापडतील तेंव्हा कायद्याच्याच औषधाचा डोस देणं योग्य आहे...कारण देशाचं भलं होण्यापेक्षा नुकसानच अधिक होत आहे.


गुरुवार, २६ नोव्हेंबर, २०२०

काय सांगते संविधानाची उद्देशिका? - भाग २

                       
                           ( स्त्रोत : साभार इंटरनेट )

 भाग १ च्या पुढे.....

स्वातंत्र्य- स्वातंत्र्य (liberty) म्हणजे व्यक्तीच्या कृतीवर बंधन न घालणे व त्याचबरोबर वैयक्तिक प्रगतीच्या संधीची उपलब्धता करून देणे. सर्व भारतीय नागरिकांना त्यांच्या मूलभूत हक्कांद्वारे विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा, विश्वास व प्रार्थना या गोष्टींचे देण्यात आलेले स्वातंत्र्य याचे रक्षण उद्देशिका करते. ज्याला जे वाटेल ते करण्याचा परवाना म्हणजे स्वातंत्र्य नव्हे, आपल्याला याचा उपभोग संविधानाच्या चौकटीत राहूनच घेता येतो.  स्वातंत्र्य या संकल्पनेचा उद्देशिकेमध्ये सखोल विचार करून समावेश करण्यात आला आहे, मूलभूत हक्क हे परिपूर्ण नसले तरी योग्य आहेत.

समानता/समता- समाजातल्या कोणत्याही ठराविक वर्गाला विशेषाधिकार नसणे म्हणजे समता (equality), कोणत्याही भेदभावाशिवाय पुरेश्या संधी सर्वांना उपलब्ध करून देणे. सर्व भारतीय नागरिकांना दर्जा आणि संधीची समानता उद्देशिकेद्वारे प्रदान केली गेली आहे. या तरतूदीमध्ये समानतेचे ३  प्रकार समाविष्ट आहेत, - नागरी, राजकीय आणि आर्थिक.
- कायद्यापुढे सर्व समान (कलम १४)
- जाती, धर्म, वर्ण, लिंग किंवा जन्म स्थळ यापैकी कोणत्याही बाबींवरून होणाऱ्या भेदभावावर प्रतिबंध. (कलम १५)
- रोजगाराच्या संधीची समानता (कलम १६)
- अस्पृश्यतेचे उन्मूलन/अस्पृश्यता नष्ट करणे (कलम १७)
- किताब/उपाधी नष्ट करणे (कलम १८)- रावबहाद्दूर, राय साहब इ. अशा सर्व उपाध्या- पदव्या यांचा वापर न करणे, केवळ सैन्यदल व शैक्षणिक पात्रता सांगणाऱ्या पदव्या वापरात असाव्यात.
वरील मुद्दे सामाजिक एकतेबद्दल माहिती देतात.
*कलम ३२५ प्रमाणं कोणतीही व्यक्ती तिच्या जात, धर्म, पंथ, वर्ण व लिंग या गोष्टींमुळे निवडणूक-मतदान प्रक्रियेपासून वंचित राहू शकत नाही.
*कलम ३२६ सांगतं की लोकसभा आणि विधानसभा यांच्या निवडणुका या प्रौढ मताधिकाराप्रमाणे व्हाव्यात.
ही झाली राजकीय समता.
राज्याची मार्गदर्शक तत्वे कलम ३९ नुसार नागरिक म्हणजे  सर्व पुरुषांना स्त्रियाही राज्यसरकार जीवनोपयोगी सर्व साधने
उपलब्ध करून देईल व समान कामासाठी समान वेतन देईल.
म्हणजे हा विषय आर्थिक समतेचा आहे.

बंधुता - (fraternity) आपण नागरिकतेच्या रकान्यात फक्त भारतीय लिहितो, म्हणजे एकेरी नागरिकत्व यातूनच राज्यघटना बंधुभावाला उत्तेजन देते. मूलभूत कर्तव्ये (कलम ५१-अ) सांगतात की प्रत्येक भारतीय नागरिकाचं हे कर्तव्य आहे की जरी भाषा, धर्म, प्रदेश यांमध्ये जरी विविधता असली तरी सर्व भारतीय लोकांमध्ये सुसंवाद आणि बंधूभाव याचा प्रचार करणे.
उद्देशिका म्हणते की बंधुता या संकल्पनेत दोन गोष्टी समाविष्ट होतात, पहिली म्हणजे व्यक्तीची प्रतिष्ठा आणि देशाची एकात्मता किंवा अखंडता आणि दुसरी एकता. 'एकात्मता' हा शब्द ४२व्या घटना दुरुस्ती (१९७६) नुसार अंतर्भूत करण्यात आला.
के. एम्. मुन्शी (संविधानसभेच्या मसुदा समितीचे सदस्य) म्हणत की 'व्यक्तीची प्रतिष्ठा' हे सुचवते की राज्यघटना ही फक्त लोकशाहीची चौकट सांभाळणं व भौतिक जगातली उत्तमता ठरवणं इतकंच काम करत नाही तर व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं माहात्म्य ही ओळखून आहे. 
'देशाची एकता आणि अखंडता' ही संकल्पना एकीकरणाच्या प्रादेशिक आणि मानसिक दृष्टीकोन यांकडे निर्देश करते. राज्यघटना कलम १ मध्ये सांगितलं आहे की 'भारत हे राष्ट्र म्हणजे  राज्यांचा संघ आहे', यातून कोणतेही राज्य बाहेर पडू शकत नाही. यावरून अखंडता कशी अबाधित आहे हे लक्षात येऊ शकतं व पर्यायाने सांप्रदायिकता, प्रदेशवाद, जातीवाद, भाषावाद आणि फुटीरतावादावर विजय मिळवता यावा हा उद्देश आहे.
       ही उद्देशिका आणि त्यातले हे शब्द जे आपण समजून घेतले, आता घटना समितीचे जे विविध सदस्य होते त्यांनी या उद्देशिकेचं खूप कौतुक केलं आहे. त्यांच्याबद्दलची जी मतं मांडली ती थोडक्यात समजून घेऊ की, ही उद्देशिका आपल्याला राजकीय, धार्मिक व नैतिक मूल्यं याबद्दल माहिती देते. आम्ही घटनकारांनी जे विचार केले होते; सशक्त,सार्वभौम, लोकशाही देशाचं स्वप्न पाहिलं होतं तेच विचार या उद्देशिकेत आहेत. ती आपल्या देशाची खरी कुंडली आहे. ती संविधानाची चावी आहे. तो एक रत्न हार आहे. हिदायतूल्लाह या सर्वोच्च न्यायालयाच्या माजी सरन्यायाधीशांनी असं म्हटलं की ही उद्देशिका म्हणजे अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा जसा आहे तशीच आहे. पण त्यातल्या मूल्यांमुळे ती जाहिरनाम्यापेक्षा ही वरचढ आहे. तो संविधानाचा आत्मा आहे.
      आपण जिच्याबद्दल इतकं बोलतोय ती उद्देशिका, त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्यात असा निकाल दिला की उद्देशिका हा संविधानाचा भाग नाही(बेरुबारी १९६०) कारण यातल्या शब्दांचे एकाहून अधिक अर्थ निघतात व जेंव्हा गरज पडेल तेंव्हा या उद्देशिकेच्या शब्दांचे योग्य अर्थ समजून घेण्यासाठी तज्ज्ञांची मदत घ्यावी. पुढे केशवानंद भारती यांच्या खटल्यात कोर्टाने आपलं मत बदललं आणि सांगितलं उद्देशिकेला खूप महत्व आहे व तो संविधानाचा अविभाज्य भाग आहे. या उद्देशिकेची सुद्धा दुरुस्ती केली आहे. १९७६ मध्ये झालेली ४२ वी घटना दुरुस्ती (42nd Constitutional amendment) ही प्रसिद्ध आहे. त्यात समाजवादी, धर्मनिरपेक्ष व एकात्मता असे शब्द समाविष्ट केले गेले. संविधानात कलम क्र. ३६८ नुसार घटना दुरुस्ती केली जाते. संविधान बदललं जाईल या अपप्रचाराला बळी पडता कामा नये, कारण जशी उद्देशिकेत केली तशीच राज्यघटनेतही दुरुस्ती होऊ शकते. व ती ग्राह्य धरायची की नाही यांवरही निर्णय होऊ शकतो. संविधानाची मूलभूत चौकट कधीच बदलली जाऊ शकत नाही…
      म्हणूनच संविधान सर्वोपरी!.!.! जय संविधान!.!.!

बुधवार, ११ नोव्हेंबर, २०२०

हे बदललं कोरोनामुळे पण...पण काय? भाग - १


    २०२० या सालातले पहिले २ महीनेच काय ते चांगले गेले असतील, आपण गेले काही महीने लॉकडाऊनमध्येच काढले. कोरोनानं (Corona) सगळ्यांना हैराण करून टाकलं आहे. आपली जीवनशैली पुर्णपणे बदलून गेलेली आहे. आता जरी सगळं अनलॉक होत असलं तरी परिस्थिती अजूनही गंभीर आहे. सोशल डिस्टन्सिंग (Social Distancing) ही फार महत्वाची गोष्ट आहे हे सारखं बिबवण्याचं काम खुद्द बच्चन साहेबही करत आहेत. एकमेकांपासून दूर राहणं हे आरोग्याच्या कारणास्तव खूपच आवश्यक झालेलं आहे, सोशल डिस्टन्सिंग कायदाच झाला आहे. तो आपण पाळत नाही ही गोष्ट वेगळी. पण या अशा काळातही काही माणसं ही परस्परांच्या कायमची जवळ आलेली आहेत. त्यांनी आयुष्यभर एकत्र राहण्याच्या, सुख दुःखात भागीदार होण्याच्या आणाभाका घेतल्या आहेत. तसा आपल्याकडे वर्षातले चातुर्मास आणि पौष (हे मराठी महीने आता लक्षात असण्याचं आता काही कारण नाही, या गोष्टींकडे लक्ष दिलं की सनातनी/प्रतिगामी हा टॅग बसू शकतो.) सोडले तर बाकीचे दिवस लगीनसराईचा मौसम असतो, पण यावर्षी या काळातही जोडप्यांचे विवाह झाले. त्यांना आशिर्वाद देण्यासाठी दोन्ही बाजूची मोठी माणसं हजर राहू शकली नाहीत. घरात लग्न आहे म्हणजे नुसती धांदल, गडबड ज्याला लगीनघाई असं गोंडस नाव आहे, ती नव्हती. लगीनघर लांबूनही लक्षात येऊ शकतं पण ती बहु गलबला करणारी पाहुणे मंडळी जमू शकली नव्हती. आता तीच नाहीत मग त्यांचं आगत-स्वागत पाहुणचार करण्याचीही संधी नाही. पंगती नाहीत म्हणून त्यातला आग्रह नाही. वरात नाही, वरातीतला नाच नाही. ही नाही ची तशी यादी मोठी आहे. म्हटलं ना गोष्टी बदलल्या आहेत, बदलाव्या लागल्या आहेत. पण तो बदलही सकारात्मक होता, आनंददायी होता. आमचा एक मित्र श्रेयस लोखंडे; पेशानं फोटोग्राफर आहे, त्यानं नामी शक्कल लढवून यावर मात केली. पठठ्यानं स्पेशल लॉकडाऊन विवाह सोहळ्याला वधू-वराच्या सर्व पै-पाहुण्यांना उपस्थित राहण्याची सोय केली, त्यानं त्या लग्नाचं यू ट्यूब लाईव (Youtube live) प्रक्षेपण केलं. सर्वांनी जोडप्याच्या डोक्यावर आभासी/वर्चुअल अक्षता टाकल्या व आशिर्वाद मात्र खरेखुरे दिले. वृत्तपत्रांनी या प्रक्षेपणाची दखल घेतली यासाठी श्रेयसचं कौतूक झालं. एक नवीन पद्धत पडली, वेळ काळाप्रमाणे असे बदल हे होत असतात.
   

  
                                                   स्रोत : साभार इंटरनेट
  
   पण पण काय?... हा पण फार महत्वाचा आहे, काय आहे लग्न म्हणजे हम आपके हैं कौन/ हम हम साथ साथ हैं सारखंसगळं गुडी गुडी होत असतं असं लहानपणी वाटायचं पण या प्रकरणाच्या सुरूवातीला, याच्यादरम्यान किंवा ऐन समारंभात फोटोसेशनसाठी हसरे चेहरे ठेवले जातात खरे पण पडद्यामागं बरीच उलथापालथ सुरू असते. नक्की काय होतं हे समजून घेण्यासाठी अ पासून सुरू करू. लग्न ठरणं हे नशीब आणि काय ते योग वगैरे असतं हे खरतर या वाक्यापासून हे सुरू होतं, 'प्रेम-विवाह' (Love marriage) या बद्दल वेगळा लेख लिहावा लागेल. तो यातला विषय नाही तर 'लग्न ठरवणं' या विषयात सुरुवातीपासूनच एकांकिका किंवा २ ते ३ अंकांपेक्षा जास्त नाटकं चालतात. श्रीमंत-अतिश्रीमंत यांची बातच वेगळी.. हा विषय सर्वसाधारणपणे मध्यमवर्गीय लोकांचा आहे त्यांच्यातल्या उच्च आणि निम्न ही वर्गवारी लक्षात घेऊन मांडण्याचा प्रयत्न आहे. ज्या लोकांना एकत्र राहून संसार करायचा आहे, त्यांनी एकमेकांना समजून घेण्यासाठी ठराविक वेळ घेणं आणि तो ही लग्नाआधी. टीव्हीवर “स्वभाव जुळतात की नाही हे कसं कळेल” अशी जाहिरात केली जाते, पण जुळवून कुठं आणि कसं घ्यायचं याची मुलगा आणि मुलगी यांना कितपत कल्पना आहे? एकतर या मध्यमवर्गातले तरुण-तरुणी पदवी-पदव्युत्तर शिक्षणाच्या निमित्तानं परदेशी किंवा निदान पुणे-मुंबई सारख्या मोठ्या शहरांत जातात. फक्त महाराष्ट्राचा विचार करता कोकणपट्टा, पश्चिम-उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागांतून पुण्या-मुंबईत आलेली ही तरुण मंडळी लग्नाआधी फक्त मुलगा आणि मुलगी भेटणार असं म्हंटलं तर ही असली थेरं, तिकडं पुण्या-मुंबईत भेटणार असाल तर करायची इथं नाही अशी सुरुवात होते आणि तिथल्या बोलीभाषेतल्या अस्सल शिव्या देऊन शेवट होतो. हे असं आता अजिबात होत नाही हे कुणी म्हणालं तर खूप चांगलं वाटेल. शादी मे जरूर आनाच्या (Shadi mein jarur aana) राजकुमारराव आणि कीर्ती खरबंदा सारखं थोड्या प्रमाणात काही मुलं-मुली असं करत असावेत. 



                                            स्रोत : साभार इंटरनेट

  पण काय करायचं भेटून त्यानं काय होणार? लग्नाआधी मुलगा-मुलगी किती वेळा भेटतात? काय काय बोलतात? आपले सद्गुण-दुर्गुण याबद्दल किती आणि कसं बोलतात हे फार महत्वाचं आहे. आपले गुण म्हणजे चांगले गुण काय आणि दोष काय याबद्दल त्यांना स्वतःला कितपत माहिती आहे? होणार्‍या बायकोकडून-नवर्‍याकडून काय काय अपेक्षा आहेत? बरं या अपेक्षा वास्तवात पूर्ण होणार्‍या आहेत का? त्या दोघांनी याचा नीट विचार केला आहे का? कारण एकमेकांना समजून घेणं म्हणजे काय व ते कसं घ्यावं? याची संबंधित मुलगा व मुलगी यांना कितपत माहिती आहे? हे एकमेकांना भेटण्याआधी याची नीट माहिती घेतली पाहिजे. मुळात वास्तव काय आहे की कोकण, पश्चिम व उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागात राहणार्‍या मुलींना मुलगा मोठ्या शहरातला पाहिजे, त्याचं तिशीच्या वयात पुण्या-मुंबईत घर पाहिजे, गलेलठ्ठ पगार पाहिजे, भरीस भर आई-वडील मूळ गावातून इथं यावेत की नाही हा अजून भाग वेगळाच आहे. तसंच मुलांचं म्हणाल तर इथे बघितलेली अस्सल शहरी प्रेक्षणीय स्थळं याच्याशी मुळगावातल्या स्थळाची तूलना होते. बरं लग्नानंतर बायकोला गृहीत धरणं, आपलं म्हणणं तिने कायमच ऐकलं पाहिजे... वगैरे वगैरे.. अशी पुरषी मानसिकता, आर्थिक-व्यावहारिक बाबी बघण्याबरोबरच दोघांनी एकमेकांचे भावनिक दृष्टिकोनही कसे आहेत त्याचबरोबर आपापल्या पूर्वआयुष्याबद्दल माहिती करून घेणं गरजेचं आहे. कारण आजकाल अफेअर (affair) असणं ही बाब साधारण झाली आहे, आजवर किती झाली आहेत? मग ब्रेक-अप का झाले वगैरे.. त्याबरोबरच व्यसनाधिनता ही आहे, त्या बद्दलही बोललं गेलं पाहिजे.
   आधीच्या जमान्यात कशी स्वयंवरं होत होती, आपला नवरा निवडण्याचं स्वातंत्र्य महिलांना होतं पण नंतर परिस्थिती बदलली...पण....पण काय? आता पुन्हा ती बदलायला पाहिजे. दोघांनाही ते स्वातंत्र्य असायला हवं...त्यासाठी एकमेकांना जाणून आणि पारखून घेतलं पाहिजे. पण जाणून घेणे आणि पारखून घेणे या दोन्ही गोष्टी मोठ्यांनी त्या दोघांना शिकवल्या पाहिजेत. अफेअर मध्ये, व्यसनं करताना जशी सहजता असते, अगदी तीच सहजता लग्नाआधी पासून असली ना तर नंतर नातं ओढून-ताणून टिकवण्याची गरज पडत नाही. या सर्व नमूद केलेल्या गोष्टी खाजगी आहेत, यांवर हवा तसा निर्णय ज्याचा त्याने घ्यावा पण लिहिण्याचा अट्टहास एवढ्याचसाठी केला आहे की दोघांचं आयुष्य सुखी-आनंदी झालं पाहिजे आणि ते करणं हे त्या दोघांच्याच हातात आहे.


क्रमशः......

गुरुवार, ३० एप्रिल, २०२०

Irrfan- संघर्षाचा सोबती.

     

                                स्रोत : साभार इंटरनेट
   
   आजच्या घडीला संपूर्ण जगावर कोरोना (Covid 19) नावाचं भयानक संकट आहे, त्यातून सुटका व्हावी यासाठी जगाचा जोरदार संघर्ष सुरू आहे. पण दि. २९/०४/२०२० या दिवशी एक संघर्ष थांबला, तो कायमचाच. इरफान खानला (Irrfan Khan) २ वर्षापूर्वी neuroendocrine च्या कर्करोगानं ग्रासलं पण त्यातून तो बरा झाला होता. शेवटच्या सिनेमा अंग्रेजी मीडियमच्या प्रमोशनवेळी त्याची तब्येत पुन्हा बिघडली आणि दवाखान्यातून प्रेक्षकांसाठी एक संदेश पाठवला, त्यात त्याचं शेवटचं वाक्य होतं “And yes wait for me.” असं वाट बघायला लावून इरफान जो गेला तो गेलाच. इरफान आणि संघर्ष यांचं जवळचं आणि घट्ट नातं, तसं मायानगरी मुंबईमध्ये सिनेसृष्टीत करियर करण्यासाठी येणार्‍या जवळपास प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो, पण ‘साहबजादे इरफान अलि खान’ साहेबांची बात काही औरच होती. यासाठी संघर्ष व त्यांची मैत्री कशी झाली हे ही फिल्मी स्टाइलनं फ्लॅशबॅक मध्ये नको का बघायला!
     इरफानचं बालपण गुलाबी शहर जयपूरला गेलं, टोंक या गावी त्याच्या मावशीच्या घराजवळ एक सिनेमागृह होतं, म्हणजे घराची आणि सिनेमागृहाची भिंतच एक म्हणून कधीही सिनेमा पाहायला तो आणि त्याची भावंडं जायची बहुतेक तिथं त्याची सिनेमाशी ओळख झाली. दुपारच्या वेळी ही लहान मुलं खेळताना नाटक करण्याचा प्रयत्न करत, कदाचित तेंव्हापासूनच त्याला अभिनयाची आवड निर्माण झाली असावी. पण त्याला क्रिकेटपटू व्हायचं होतं त्याची निवडही प्रथम श्रेणी क्रिकेट साठी झाली होती, पण तो तिथं जाऊ नाही शकला. त्याच्या एका जवळच्या व्यक्तीनं एकदा राजेश विवेक(लगान मधला ‘साधू’) बद्दल कौतूक करताना इरफानला सांगितलं की तो एक उत्तम कलाकार आहे आणि तो Natinal school of drama मध्ये शिकला आहे. यामूळं प्रभावित झालेल्या इरफाननं मनाशी ठरवलं होतं की आपणही तिथंच जायचं पण त्याच्या कुटुंबात त्याला अभिनय क्षेत्रात करियर साठी परवानगी मिळणार नाही कारण परिवारात हे हलक्या दर्जाचं काम मानलं होतं म्हणून त्यानं थाप मारली की एम.ए नंतरचं पुढचं शिक्षण घ्यायला दिल्लीला जावं लागणार आहे, त्यानंतर तो जयपूर विद्यापीठात प्रोफेसर होईल. इकडे NSD मध्ये प्रवेश मिळवायचा झाला तर कमीतकमी १० नाटकांमध्ये काम केलं असलं पाहिजे असा नियम होता पण त्याला तर कसलाच अनुभव नव्हता म्हणून त्यानं इथंही थाप मारली आणि १९८४ साली NSD मध्ये प्रवेश मिळवला. इथच संघर्ष त्याला पहिल्यांदा भेटला कारण तेंव्हाच त्याचे वडील वारले होते. आता घरात मोठा मुलगा-कर्ता पुरुष तोच होता आणि घरातून आता पैसा मिळणार नव्हता. यावर मात करून त्यानं शिष्यवृत्ती मिळवली आणि शिक्षण पूर्ण केलं. आणि त्याच्या कष्टाचं फलित म्हणून त्याला मीरा नायर यांच्या सिनेमात पहीला ब्रेक मिळाला. नाव होतं ‘सलाम बॉम्बे’ (Salam Bombay). पण त्याच्या कामावर कात्री लागली, म्हणून हताश होऊन तो टेलिविजनकडे वळला. त्याला सुरूवातीला एका रुसी कलाकृतीवर आधारित एका नाटकात (लाल घांस पर नीले घोडे) लेनिनची भूमिका मिळाली, ९०च्या दशकांत त्याला भारत एक खोज, चाणक्य, सारा जहा हमारा, बनेगी अपनी बात, चंद्रकांता सारख्या मालिका मिळाल्या, यामुळे कमाई तर होत होती, पण चंदेरी पडद्यावर काम करण्याची इच्छा असणार्‍या त्याचं छोट्या पडद्यावर मन रमत नव्हतं. त्याला एकसूरी भूमिका करायच्या नव्हत्या, त्याला कोणत्याही साच्या मध्ये अडकायचं नव्हतं. ज्या सिनेसृष्टी यश आणि कमाई हे मूलभूत तत्वज्ञान आहे, पण त्याच्या आतली जी जिद्द होती ती केवळ यश या संकल्पनेसाठी साठी भुकेली नव्हती, स्वतःच्या पद्धतीनं, स्वतःच्या दृष्टिकोनातून यश मिळवण्याची होती. या फिल्मीदुनियेत असं वेगवेगळ्या भूमिका मिळण्याची इच्छा धरणं आणि यासाठी वेगळा विश्वास बाळगणं म्हणजे त्या काळात बेईमानीच्या गोष्टी होत्या. त्यात त्याचं व्यक्तिमत्व आधीच मितभाषी, लाजरं; कुणाकडे आपले फोटो दाखवायला जाणं व सिनेमात रोल मिळण्यासाठी त्या व्यक्तिला impress करणं त्याला जमत नव्हतं. कदाचित करण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा नकारात्मक परिणाम व्हायचा, यामुळंच त्याचा संघर्ष जोरदार बनत होता. १९८८-२००० पर्यन्त तो सिनेमा-टीव्ही दोन्हीकडे मिळेल तशा भूमिका करत राहिला पण त्याला ओळख मिळायची होती. २००१ मध्ये त्याला आसिफ कपाडीयांच्या ‘वॉरियर’ (Warrior) मध्ये मुख्य भूमिका मिळाली. या सिनेमाला मानाचा बाफ्टा पुरस्कार मिळाला पण सिनेमा जरी ब्रिटिश असला तरी  ब्रिटिश वंशाचे मंडळी नाहीत म्हणून ऑस्करसाठी ब्रिटनकडून अधिकृतरित्या पाठवण्यात आला नाही. त्याचा जवळचा मित्र- NSDचा सहपाठी तिग्मांशू धूलिया दिग्दर्शित ‘हासिल’ २००३ साली आला. त्यातल्या ‘रणविजय सिंह’ या भूमिकेसाठी त्याला पहिला-वहिला फिल्मफेअर पुरस्कार (Filmfare award) मिळाला. त्याला ‘हासिल’मूळं राष्ट्रीय स्तरावर आणि ‘वॉरियर’मूळं आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली. २००३ मध्येच शेक्सपियरचा कट्टर चाहता संगीतकार- दिग्दर्शक विशाल भारद्वाज यानं ‘मॅकबेथ’वर आधारित ‘मकबूल’ हा सिनेमा बनवला, यातल्या इरफानच्या ‘मियाँ मकबूल’ या भूमिकेचं कौतूक झालं, हा सिनेमा कान्स, टोरण्टो इथल्या मानाच्या चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला.
     इरफान जरी शांत, लाजाळू स्वभावाचा असला तरी रोखठोक होता. या त्याच्या रोखठोकपणामुळं तो आणि तथाकथित कट्टर धर्मवादी आमने-सामने आले होते. एकदा जयपूरमधल्या कार्यक्रमामध्ये त्यानं आपलं मत प्रकट केलं होतं की आताच्या परंपरांमध्ये कुर्बानीचा अर्थच समजून घेतला जात नाही. बाजारातून एक बोकड आणणं आणि दुसर्‍या दिवशी त्याचा बळी देणं ही कुर्बानी असू शकत नाही. नंतर एका टीव्ही कार्यक्रमामध्ये त्यानं तथाकथित धर्ममार्तंडांना रमजान व मुहर्रमच्या वेळी पाळल्या जाणार्‍या प्रथा तपासून पाहण्याचा सल्ला दिला. पुढे तो म्हणाला होता की रमजानमध्ये रोजे पाळण्यापेक्षा त्या काळात आत्मपरिक्षण करावं. तो म्हणायचा, “लहानग्यांच्या निष्पापपणावर ज्याप्रमाणं माया-प्रेम येतं तसं माझं देवाबरोबरचं नातं होतं पण नंतर ते हळूहळू संपत गेलं. रुढींवरून माझं मन उडून गेलं, कारण ती एक सौदेबाजी असते की तुम्ही अमूक केलं तर तुम्हाला अमुक मिळेल. परंपरेच्या मार्गावर चालायच्या भानगडीत मी पडलोच नाही.” या त्याच्या परखड स्वभावामुळं त्याचा कट्टरतावाद्यांशी संघर्ष झाला होता.
    २०१८ च्या मार्चमध्ये इरफाननं ट्विटरद्वारे कळवलं की त्याला Neuroendocrine tumor आहे. तो लंडनमध्ये यासाठी उपचार घेत होता. त्यानं एक वर्ष उपचार घेतले. २०१९ च्या फेब्रुवरी महिन्यात तो भारतात परतला. म्हणजे संघर्षाचा हा अजून एक अध्याय होता, पण तो अचानक होता आणि वेदनादायी सुद्धा. त्यानं आजाराचं निदान झाल्यानंतर एक पत्र लिहिलं होतं ते कधीही वाचलं नक्कीच डोळ्यांच्या कडा पाणावतील.
    त्याची NSDची अजून एक सहाध्यायी आणि त्याची पत्नी सुतपा; तिनं एका मुलाखतीत सांगितलं, “NSD मध्ये शिकत असताना कायम त्याच्या हातात संहिता असायच्या, माझ्या घरी जेंव्हा सगळे मित्र-मैत्रिणी यायच्या तेंव्हा बाकी सगळे दंगा-मस्ती करण्यात रमलेले पण इरफान माझ्या भावाचं पुस्तकांचं कपाट होतं त्यातली पुस्तकं वाचण्यात मग्न झालेला असायचा. याबाबतीतली त्याची कायमच भूक अशा पद्धतीची होती की कमी वेळात त्याला खूप काही करता येईल.” हा त्याचा वेळेशी असलेला संघर्ष होता, कदाचित त्याच्याकडे असलेल्या कमी काळाची त्याला कल्पना असल्याप्रमाणं?
     
       

                                     (स्रोत : साभार india.in.pixel)
  
     सलाम बॉम्बेमधला लेखक, मकबूलचा मियाँ मकबूल, पिकुचा राणा चौधरी, लाइफ इन ए मेट्रोचा मॉन्टी, डी-डे चा शाहवली खान, रोगमधला पोलिस ऑफिसर, लंचबॉक्सचा साजन फर्नांदेस  या आणि अशा अजून भूमिका या बॉलीवुड सिनेमांत आणि जुरासिक वर्ल्ड, लाइफ ऑफ पाई, स्लमडॉग मिलिनेअर, द माइटी हार्ट, इन्फेर्नो या आणि अन्य हॉलीवुड सिनेमांमध्ये त्यानं वठवलेल्या भूमिकांमध्ये वेगळेपण होतं, आणि ते राखणं, स्वतः स्वतच्या इमेजला तोडणं आणि आपलेच एकेक मुखवटे उतरवत जाणं हीच त्याची खासियत होती. पानसिंग तोमरच्या भूमिकेसाठी त्याला त्यावर्षीचा राष्ट्रीय पुरस्कार आणि फिल्म फेअर दोन्ही मिळालं होतं. तो असा एकमेव भारतीय कलाकार होता की त्यानं काम केलेल्यापैकी दोन सिनेमे ऑस्कर पुरस्कार प्राप्त आहेत. कलाक्षेत्रातल्या योगदानाबद्दल त्याचा पद्मश्री देऊन सन्मानही केला गेला. केवळ भुमिकांमध्येचं नाही वेगळी विचारसारणी असणं, वेगळी वाट चोखाळणं इतकंच काय तर त्याला झालेला आजार त्यातही वेगळेपण. पैसा, प्रसिद्धी असूनही त्याची जिद्द वैविध्यपूर्ण भूमिकांसाठीची होती. त्याचं म्हणणं होतं, “मला माझ्या मधलं रोमॅंटिक पात्र शोधायचं आहे, बाल चित्रपटात काम करायचं आहे, अॅक्शन, फॅंटसी, सांगीतिक, बायोपिक अशी बर्‍याच भूमिका करायच्या राहिल्या आहेत.”  असं वाटतं की असे अभिनेते दर नवीन भूमिकेसाठी नव्यानं जन्माला येतात, भूमिकेच्या कोंदणात बसण्यासाठी नव्यानं स्वतःला पैलू पाडतात. त्यानं सफाईदारपणे अभिनय केला पण वेगळेपण जपण्यासाठी मोठा संघर्ष चालू होता म्हणजे तो त्याचा सोबतीच बनला होता.
आता दोघंही नाही आहेत. पण तो कायम आपल्या हृदयात राहील आणि त्याचे हे शब्द ही,

दर्या भी मै, दरख्त भी मै, झेलम भी मै, चिनार भी मै, दैर हूं, हरम भी हूं, शिया भी हूं, सुन्नी भी हूं, मै हूं पंडित, मै था , मै हूं और मै ही रहूंगा….

शुक्रवार, ३ एप्रिल, २०२०

"राम" हैं

गीतकार: जावेद अख्तर (Javed Akhtar)
संगीत: ए. आर्. रहमान. (A.R. Rahman)

सीता:
पल पल है भारी वो विपदा है आई
मोहे बचाने अब आओ रघुराई
आओ रघुवीर आओ, रघुपति राम आओ
मोरे मन के स्वामी, मोरे श्रीराम आओ
राम-राम जपती हूँ, सुनलो मेरे राम आओ
राम-राम जपती हूँ, सुनलो मेरे रामजी…
कोरस:
बजे सत्य का डंका, जले पाप की लंका
इसी क्षण तुम आओ, मुक्त कराओ
सुन भी लो अब मेरी दुहाई
पल पल है भारी, वो विपदा है आई..
मोहे बचाने अब आओ रघुराई।।
राम को भूलो, यह देखो रावण आया है
फैली सारी सृष्टि पर जिसकी छाया है।
रावण:
क्यों जपती हो राम राम तुम?
क्यों लेती हो राम नाम तुम?
राम राम का रटन जो यह तुमने है लगाया
सीता…. सीता तुमने राम में ऐसा क्या गुण पाया?

                                              ( स्रोत : साभार इंटरनेट)

सीता:
गिन पाएगा उनके गुण कोई क्या,
इतने शब्द ही कहाँ हैं
पहुँचेगा उस शिखर पे कौन भला,
मेरे रामजी जहाँ हैं!
जग में सबसे उत्तम हैं, मर्यादा पुरुषोत्तम है
सबसे शक्तिशाली हैं, फिर भी रखते संयम है
पर उनके संयम की अब आने को है सीमा
रावण समय है…माँग ले क्षमा
कोरस:
बजे सत्य का डंका, जले पाप की लंका
आए राजा राम, करें हम प्रणाम
संग आया लक्ष्मण जैसा भाई
पल पल है भारी, वो विपदा है आई..
मोहे बचाने अब आओ रघुराई।।
रावण:
राम में शक्ति अगर है, राम में साहस है तो
क्यों नहीं आए अभी तक वो तुम्हारी रक्षा को?
जिनका वर्णन करने में थकती नहीं हो तुम यहाँ
यह बताओ वो तुम्हारे राम हैं इस पल कहाँ??
सीता:
राम हृदय में है मेरे, राम ही धड़कन में हैं
राम मेरी आत्मा में, राम ही जीवन में हैं….
राम हर पल में है मेरे, राम है हर स्वास में
राम हर आशा में मेरी, राम ही हर आस में

                                                (स्रोत : साभार इंटरनेट)

मोहन भार्गव:
राम ही तो करुणा में है, शांति में राम हैं
राम ही है एकता में, प्रगती में राम हैं
राम बस भक्तों नहीं, शत्रु के भी चिंतन में हैं
देख तज के पाप रावण, राम तेरे मन में हैं
राम तेरे मन में हैं, राम मेरे मन में हैं …(2)
राम तो घर घर में हैं, राम हर आँगन में हैं
मन से रावण जो निकाले, राम उसके मॅन में हैं …(2)
सीता:
पल पल है भारी, वो विपदा है आई
मोहे बचाने अब आओ रघुराई।।
कोरस:
सुनो राम जी आए, मोरे राम जी आए
राजा रामचंद्रा आए, श्री रामचंद्र आए
राम जी आए, मोरे राम जी आए..हो…(2)
        २ एप्रिल २०२०. चैत्र शुद्ध नवमी अर्थात रामनवमी. रामाचा जन्म इ.स.पूर्व ५११४ वर्षांपूर्वी झाला म्हणजे ही रामाची ७१३४ वी जयंती. आपल्या सिनेसृष्टीमध्ये आपल्या बहुतेक सर्व सण-उत्सवांवर आधारित गाणी आहेत. वर दिलेलं भलं मोठं गाणं जरी दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर 'स्वदेस' (Swades) या सिनेमात दाखवलं असलं तरी ते आजच्या दिवशी त्याचं स्मरण हटकून होतं कारण या गाण्यामध्ये रामाचा गुणगौरव करण्यात आला आहे. थोर व्यक्ती/महापुरुषांचे गुणगान त्यांच्या जयंती-पुण्यतिथीला करणे ही आपली प्रथाच आहे. राम हे तर देवस्वरुप आहेत म्हणून रामभक्ती हा भारतीय संस्कृतीचा भाग आहे. 'स्वदेस' या चित्रपटात मूळचा भारतात वाढलेला, सुट्टी घेऊन एका खेडेगावात आलेला, जगातलं उच्चतम तंत्रज्ञान असणाऱ्या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था 'नासा' (NASA) इथं काम करणारा युवक 'मोहन भार्गव'(शाहरुख खान) (Shahrukh Khan); 'नासा-खेडेगाव;दोन्ही एकदम भिन्न वातावरण आणि संस्कृती असणारी ठिकाणं; नासा मध्ये सतत वैज्ञानिक संशोधन करुन अल्पसंतुष्ट न राहता विश्वातल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा छंद पण गावात पोट भरण्याचं काम करावं आणि जे चालत आलंय ते करावं "ठेविले अनंते" प्रमाणं जगावं ही वृत्ती, कामावरून सुट्टी घेऊन आल्यानंतर गाव आणि अमेरिका यातला फरक बघून त्याचं मन व्यथित होतं आणि त्यातून तो गावासाठी काय करतो हे दाखवलं आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे.
         सदर गाणं दसऱ्याच्या रामलीलेच्या प्रसंगी घेण्यात आलं आहे. उत्तर भारतात दसऱ्याच्या दिवशी रामलीला सादर होणं आणि रावण दहन याला मोठी परंपरा आहे. सणवार-उत्सव व जोडून येणाऱ्या रुढी-प्रथा पाळणं आपल्याकडं हौसेनं केलं जातं, मग त्या मागची भावना-विचार-हेतू पुढच्या पिढ्यांना समजेल वा न समजेल यांवर लक्ष दिलं जात नाही. मोहनच्या या गावातही अशीच परिस्थिती. रामलीलेतल्या भजनात कोरस म्हणावा आणि घरी जाऊन झोपावं, उद्या पुन्हा ये रे माझ्या मागल्या! अरे म्हणजे आम्ही आमचे सण साजरे करायचे नाहीत का, प्रथा- परंपरा पाळायच्या नाहीत का? "आमचेच" सण बरे दिसतात? तसं नाही. काय आहे की हा सिनेमा मोहन भार्गवच्या नजरेतून आपल्याला दिसतो. आपल्या मानलेल्या आईच्या ओढीनं अनोळखी गावात मोहन आला,  त्याच्या नजरेला अमेरिका आणि गाव यातली तफावत चांगलीच लक्षात येत जाते की गावात १८ पगड जाती म्हणून अस्पृश्यता जातीवाद बोकाळला आहे. ६० वर्षे झाली देश स्वतंत्र होऊन तरी मुलींना शाळेत पाठवलं जात नाही,अस्पृश्यांच्या मूला-मुलींना शाळेकडं बघायचीही सोय नाही. गावात अजूनही वीज नाही. ज्या उत्साहात गाव आपले सणवार -परंपरा-उत्सव साजरे करतं तो उत्साह मूलभूत सोयी-सुविधा, विकास करण्यासाठी कणभरही दिसत नाही. म्हणून या गाण्यातही मोहन अस्वस्थ होताना दिसतो. राम हे सीतेचे पती आहेत म्हणून तिने गुणगान करायचं आणि बाकीच्यांनी तल्लीन होऊन त्यावर माना डोलवायच्या! म्हणून बेचैन झालेल्या मोहनच्या रुपात आधुनिकतेनं परंपरावादाला दिलेलं हे उत्तर आहे,
*राम ही तो करुणा मे हैं-
दया हे उत्तम पुरुषाचं लक्षण आहे. दया बाळगा, पोरी-बाळी आणि जे दलित लोक आहेत त्यांची दया येऊ द्या, त्यांना त्यांचे अधिकार द्या. राम तिथं आहेत.
*शांती में राम हैं-
आपल्या या उच-नीचतेमुळं खोट्या अहंकारामुळं भांडण-तंटे होतात. हे सोडा. वैयक्तिक-सामाजिक शांती प्रस्थापित करा.
राम तिथं आहेत.
ही वरची व पुढच्या ओळी एकमेकांशी जोडल्या आहेत.
*राम ही है एकता में-
भांडण-वाद नव्हते, सुसूत्रता होती, एकता होती म्हणून राम-वानरसेना रावण व राक्षस मारुन सीतेला आणू शकले. एकीचं बळ मोठं म्हणून सामाजिक ऐक्य पाहिजे. राम तिथं आहेत.
*प्रगती मे राम है-
शांती आहे. ऐक्य आहे. तर संकटांना समाज एकत्र सामोरा जाऊ शकतो, परस्परांना मदत करून पुन्हा उभा राहू शकतो, आणि प्रगती करु शकतो. राम तिथं आहेत.
*राम बस भक्तों नहीं, शत्रु के भी चिंतन में हैं-
भक्त तर देवाचं स्मरण करतच असतात पण रावण सीतेचं मन बदलावायचा प्रयत्न करताना स्वतःच रामाचा जप करतो. रावणाला सावधान करताना कुंभकर्णही रामाचं गुणवर्णन केल्याचं ऐकलं आहे, शत्रूगटातला तिसरा भाऊ बिभीषण तर सततच राम-नाम जपत होताच. बघा शत्रूच्या विचारात, राम तिथंही आहेत.
*देख तज के पाप रावण, राम तेरे मन में हैं
  राम तेरे मन में हैं, राम मेरे मन में हैं-
खोटा अहंकार, अस्पृश्यता, जातीवाद, वैयक्तिक-सामाजिक प्रगतीसाठी न झटणे, मूलभूत प्रश्नांचा विचार न करणे "असेल माझा हरी/ ठेविले अनंते..." ही वृत्ती पापी आहे, रावणासारखी आहे. तिला सोडा. मग राम तिथं आहेत. राम मनामनांत आहेत. राम सर्वव्यापी आहेत
*राम तो घर घर में हैं, राम हर आँगन में हैं-
प्रत्येक घरात लोक शांती, समाधान, आनंदात राहत आहेत. घरात वातावरण चैतन्यमय आहे. घरातल्या बालगोपालांचं आणि अंगणातल्या तुळस व अन्य झाडांची म्हणजे पर्यायाने निसर्गाची निगा राखली जात आहे. घरात व अंगणात अंतर्बाह्य जिवंतपणा आहे. तिथं राम आहेत.
*मन से रावण जो निकाले, राम उसके मन में हैं-
वैयक्तिक- सामाजिक दोष- दुर्गुण जे रावणासारखे आहेत ते काढून टाका, मग तुमच्यातच राम आहेत.
या गाण्यामध्ये बाकी आध्यात्म आपण ऐकत आलो आहोत, पण या ओळींमध्ये एक वेगळं तत्वज्ञान आहे. तेच समजून घेणं गरजेचं आहे.
         रामलीलेमध्ये हा प्रसंग बघून थोडा अस्वस्थ झालेला मोहन गावकरी लोकांच्या श्रद्धेला नावं ठेवणं, त्यांचा अकारण विरोध करणं, अपमान करणं असे उद्योग करत नाही तर आधी परंपरा पालन पूर्ण होऊ देतो मग त्यांचीच री ओढतो व त्याच्या अनुभवाला आलेलं तत्वज्ञान सगळ्यांसमोर सांगतो. बर हे फक्त त्याच दिवसापुरतं मर्यादित न ठेवता गावासाठी सर्वांना एकत्र आणून त्यांच्याच मदतीनं गावात विजेचा छोटा प्रकल्प उभा करतो, त्यांनतर तो भारतातच स्थायिक होतो, हे सिनेमा पाहिलेल्यांना माहीत आहे. खरं तर हा उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या समाजसेवक, बुद्धिजीवी लोकांसाठी छान उदाहरण आहे की प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करावं.  
          म्हणूनच हे तत्वज्ञान समजून घेऊन ते अंगी बाणवलं जावं. कारण रामराज्य आपोआप येत नाही, त्यासाठी प्रत्येकवेळी राम येण्याचीही वाट पाहत बसू नये, आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. म्हणून जोवर आपल्यात राम आहे तोवर हाच ध्यास धरूया, त्याचसाठी झटूया!
तूर्तास राम राम!.!.! 🙏🏼🙏🏼🙏🏼.

मातृ दिनाच्या इतिहासाची कहाणी

                              प्रेम स्वरूप आई वात्सल्यसिंधु आई                  बोलावू तुज आता मी कोणत्या उपायी                             ...