रविवार, २३ डिसेंबर, २०१८

तुंबाड- जिद्द आणि षडविकारांची कहाणी....

               
                            (स्रोत : साभार इंटरनेट)

       १९१३ साली सुरू झालेल्या भारतीय सिनेसृष्टीची पाहिली काही वर्षे पौराणिक चित्रपट व१९३१च्या "आलम आरा" या बोलपटा नंतर ऐतिहासिक विषयांवर आधारित सिनेमे बनवले गेले. नवरसांपैकी काही प्रकारांवर आधारीतच सिनेमे तयार झाले. अजून  काही प्रकार ज्यांना सध्याच्या भाषेत genre असं म्हणतात  अद्भूत, रौद्र, भयानक इ. बाकी होते. भयपटांचा जन्म होण्यासाठी १९४९ साल उजाडले, 'महल' हा कमाल अमरोही दिग्दर्शित पहिला भयपट म्हणता येईल त्यानंतर बीस साल बाद, गुमनाम , दो गज जमीन के नीचे पासून ते रात, भूत, राज अशी भली मोठी यादी देता येईल. आता यामध्ये भर पडली ती एका नव्या सिनेमाची.....
तुंबाड.....(Tumbbad)
             बॉलीवूड भयपटांचा चेहरा मोहरा बदलणारा म्हणून त्याचं सर्वत्र कौतुक  होत आहे. व्हेनिस फिल्म फेस्टिवल मध्ये ही याचा बोलबाला झाला. खरतर गूगल किंवा विकिपीडिया यांप्रमाणे त्रिकालज्ञानी नसल्यामुळे तुंबाड बद्दल , त्याच्या दिग्दर्शक किंवा कलाकारांबद्दल काहीच माहिती नव्हती. 'संगीत:अजय-अतुल' (Ajay - Atul) या एका गोष्टीमुळे सिनेमाबद्दल उत्सुकता निर्माण झाली. सिनेमा आणि संगीत या दोन्ही गोष्टींचा नाद असलेल्या माझ्या सारख्या माणसाला नवीन दृक्श्राव्य मेजवानी हवीच असते.
              'प्रयत्ने वाळूचे कण....' या ओळीला सार्थ ठरवणं किंवा प्रत्यक्षात उतरवणं म्हणजेच 'तुंबाड' आहे. तसं एका ओळीत त्याचं वर्णन करणं हे खूपच धाडसाचं काम आहे कारण तो केवळ एका कथेचं छायाचित्रण नाहीए; ती एक तपश्चर्या आहे, कारण तुंबाडची जन्मकथा ऐकताना हे लक्षात येतं. लेखक-दिग्दर्शक राही अनिल बर्वे (Rahi Anil Barve) यांचा हा पहिलावहिला चित्रपट. १९९७ मध्ये नागझिराच्या जंगलामध्ये एका रात्री मित्राकडून ही कथा ऐकताना अनुभवलेली भीती नंतर त्यांनी ७०० पानांत शब्दबद्ध केली.... १९९७- २०१२ 'तुंबाड' हा काळाच्या गर्भात होता. आणि शूटींग सुरू होण्यासाठी २०१२ साल उजाडले. हा काळ बर्वेंसाठी खूपच कठीण होता. संयम, चिकाटी-जिद्द, मेहनत आणि त्यावरचा विश्वास या त्यांच्या अंगी असणाऱ्या सगळ्या गोष्टींची कसोटी घेणारा तो काळ... या काळात बर्वेंच्या आईचे आजारपण व निधन नंतर अनुराग कश्यप यांनी दिलेला मदतीचा हात ही तुंबाडच्या निर्मितीच्या पडद्यामागच्या गोष्टी आहेत. काळाच्या भट्टीमध्ये तावून सुलाखून निघालेल्या तुंबाडच सोनं झालं कारण आनंद एल्. राय आणि सोहम शहा (Soham Shah) (शीप ऑफ थिसिस फेम) असे मातब्बर निर्माते त्याला मिळाले.
                    तुंबाड हा सिनेरसिकासाठी full of surprises आहे. सासवडच्या ज्या वाड्यात बहुतांश भाग चित्रित अर्थात शूट झाला आहे त्यात सेट्स कोणते आणि खरा वाडा कोणता यातला भेद करता येत नाही. Scene साठी लागणारा योग्य प्रकाश , वातावरण मिळण्यासाठी निर्माता- अभिनेता सोहम शहा पासून टीमचा प्रत्येक माणूस यांचं तासन्तास वाट पाहत राहणं हे थक्क करणारं आहे. अजून भरीस भर म्हणजे पाऊस हा या कथेचा अविभाज्य भाग असल्यामुळे पावसाचे सर्व scenes हे खऱ्या पावसातच शूट केले गेले. 'पांडुरंग' नावाचं पात्र रंगवणारा बालकलाकार मोहम्मद सामाद (Mohammad Samad) याने तर चित्रपटाच्या पहिल्या भागात असणाऱ्या विनायकच्या आजीही साकारली आहे जी राक्षसी आहे त्यासाठी त्याला 10 किलो वजनाचे Prosthetics परिधान करावे लागले आहेत. एकमेव गीत जे की शीर्षकगीत आहे त्याला अजय-अतुल यांनी नेहमीप्रमाणे छान संगीतबद्ध केले आहे पण हे गाणे अतुल गोगावले यांनी गाणे हे ही आश्चर्यकारक आहे.  बाकी कॅमेरामन पंकज कुमार यांचं छायाचित्रण उत्कृष्ट, बाफ्टा पुरस्कार विजेता आणि हिटमन सीरीज आणि अस्सासीन्स क्रीड या प्रसिद्ध विडिओ गेम्सना संगीत देणाऱ्या जॅसपर कॅड चे जबरदस्त पार्श्वसंगीत,सर्व कलाकारांचा अभिनय ही उत्तम. आदेश प्रसाद, राही बर्वे, आनंद गांधी आणि मितेश शहा यांनी पटकथा लिहिण्याचं काम सुंदर केलं आहे.
         सिनेमाची कथा मराठी साहित्य क्षेत्रातले प्रसिद्ध भयकथाकार नारायण धारप यांच्या भयकथेवर आधारित आहे पण सिनेमा हा सम्पूर्णपणे भयपट म्हणण्यापेक्षा भय , रहस्य , साहस इत्यादी प्रकारांमध्ये मोडतो. त्याला भयपट का म्हणावं याबद्दल  youtube वर असलेल्या एका मुलाखती मध्ये राही बर्वे सांगतात , "तुंबाड में भूत नही इंसान डराते हैं " (खरंतर हे ऐकल्यामुळे माझी सिनेमा पाहण्याची उत्सुकता अधिकच वाढली.) ते अस का म्हणाले? याचं उत्तर पाहताना प्रत्येक वेळी मिळतं.
"सगळ्यांची गरज भागवण्याचं काम निसर्ग करतो पण प्रत्येकाची हाव पुरी करण्याचं नाही- महात्मा गांधी" या वाक्यापासून सिनेमा सुरू होतो. तीन कालखंडात याची कथा घडताना दाखवण्यात आली आहे.
१९१८ सालचा पहिला भाग, १९३३ चा दुसरा व १९४७ चा स्वतंत्र भारतातला तिसरा.
पुराणकालीन एक कथा ज्यात समृद्धीची देवी, पृथ्वी तिचा गर्भ आहे व ती अमर्याद धन (सोनं) - धान्याचं प्रतीक आहे. ती १६ कोटी देवतांना जन्म देते पण थोरला मुलगा हस्तर तिचा जास्त लाडका असतो जो अत्यंत लालची असतो देवीच्या सर्व सोन्यावर तो कब्जा करतो आणि धान्याकडे नजर वळवतो तेंव्हा बाकी देवता त्याचा पराभव करून त्याला शाप देतात, म्हणून त्याचा उल्लेख ना वेद-पुराणात आहे ना त्याचे कुठे मंदिर आहे. पण तुंबाड गावात राहणारे एक कुटुंबीय हस्तरची आराधना करून त्याला प्रसन्न करून घेतात आणि आपल्या वाड्यात त्याचं मंदिर बांधतात. पिढ्यान्पिढ्या हस्तरची भक्ती चालूच आहे आणि त्याच्याकडून मिळणाऱ्या सोन्याचा ओघ ही अखंड आहे. दुर्जनांच्या संगतीला जाणारे दुर्जनच होतात. हस्तर हावरट आहेच आणि त्याची भक्तावळही तितकीच हावरट आहे. हस्तरला हाव आहे ती केवळ अन्नधान्याची पण भक्तावळीची हाव मोठीच हस्तरपेक्षाही जास्त कारण अन्नाबरोबर सोने-खजिना यांचा मोह त्यांना न आवरता येण्यासारखा आहे. सोबतीला कामवासना , मत्सर, क्रोध याचीही देणगी आहेच. या कुटुंबातल्या मागच्या पिढ्यांनी पुढल्या पिढ्यांना हे दुर्गुण वारसा स्वरूपात दिले असावेत असं वाटतं. षडविकारांच्या आहारी गेलेली ही कथानकातील पात्रे त्या षडविकारांच्या हातातल्या कटपुतल्या वाटतात. म्हणून बर्वे यांनी म्हटलेलं "इंसान डराते हैं" हे वाक्य पटतं. या षडविकारांचे भोक्ते असणाऱ्या पात्रांच्या नशिबी दुर्दैवी मृत्यू तरी किंवा वर्षानुवर्षे मृत्यूची वाट बघत जगणं तरी येतं असं सिनेमात दाखवलं गेलं आहे.
म्हणून आपल्या संतांनी 'सज्जनांची संगत धरा आणि षडरिपूंचे दमन करा' अशाच प्रकारचा संदेश दिला आहे.
         तर अशीही जिद्द-चिकाटी आणि मेहनतीचा महिमा सांगणारी आणि षड्विकारांचे दर्शन घडवणारी साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण !.!.!

शनिवार, ९ सप्टेंबर, २०१७

ब्रह्मं जानाति........

                    


                    ब्रह्म जानाति इति ब्राह्मणः
        ही संस्कृत भाषेत सांगितलेली ब्राह्मण (ह ला म जोडलं जातं बरं का! कारण "गर्व से कहो" म्हणणाऱ्यां बहुतांशी महानुभावांनी या शुद्धलेखनाची माहिती घेतलीच नसावी) या शब्दाची व्याख्या. ज्याला ब्रह्म , अंतिम सत्य  समजलं आहे असा तो! तर "असा तो" किती ज्ञानी असेल याची कल्पना जर तुम्हाला ब्रह्म या शब्दाची व्याप्ती माहीत असेल तर नक्कीच येईल. तर ज्याला अंतिम सत्य काय आहे हे जर माहीतच आहे तर तो "असा" कसा ? हा प्रश्न मी नाही तर या शब्दाला स्वतःशी जोडणाऱ्या व्यक्तींच्या कर्तृत्वाचा इतिहास विचारतो आहे कारण त्यांचा इतिहासच तेवढा महान आहे. तर या महान इतिहासाचा धांडोळा घेत गेलो तर बहुतांशी भाग हा असमानता, अस्पृश्यता आणि अत्याचार अशाच गोष्टींनी भरला आहे हे सत्य नाकारून चालणार नाही कारण याचा गाभा आहे तो म्हणजे स्वतःला अकारण श्रेष्ठ समजण्याची वृत्ती - सुपिरिअरिटी कॉम्प्लेक्स!
        इतकी प्रस्तावना देण्याचा उद्योग यासाठी की पुण्याच्या कुणी डॉ. खोले बाईंनी अब्राह्मण कामवाली २ वर्षे घरी कामाला ठेवली आणि तिच्या शिवाशिवीमुळे त्यांचा "सोवळ्यातला देव" बाटला गेला म्हणे! बापरे अंतिम सत्य जाणणाऱ्यांचे असले फुटकळ विचार?
आता संतश्रेष्ठ श्री नामदेव शिंपी (मुद्दाम उल्लेख केलाय) यांचा नैवेद्य स्वीकारणारा, किंवा संत जनाबाई , कान्होपात्रा यांच्या मदतीला धावून जाणारा देव यामुळे कसा काय बाटू शकतो? हा फार मोठाच प्रश्न आहे.
आता त्या बाईंचा हा वैयक्तिक प्रश्न असेल पण याची तक्रार पोलिसात देऊन त्यांनीच तो सार्वजनिक केलाय मग चर्चा तर होणारच! या बाई हवामान खात्यात उच्च पदावर कार्यरत होत्या म्हणून त्यांच्या मानसिकतेवर टीका करताना त्यांच्या व्यावसायिक आयुष्यावर भाष्य करण्याची काहीच गरज नाही पण सोशल मीडियावरच्या  लोकांना हे भान नाही. असो तर या बाईंची किंवा त्या संबंधित असलेल्या समूहाची मानसिकता व तिचे पैलू पाहिले तर आमची वाणी, आमचे संस्कार, आमचे वळण , आमचे कर्तृत्व , आमची बुद्धी आणि या बरोबर बाय डिफॉल्ट येणारे आमचे श्रेष्ठत्व; आमच्याकडील शुद्धता आणि उच्च दर्जामुळे इतरांनी ते मान्यच करायला हवे. बरं ते मान्यही करू पण "विद्या विनयेन शोभते" हे वाक्य अंमलात आणलं जाताना दिसत नाही ना! एखाद्या दिव्यांग व्यक्तीसमोर धडधाकट व्यक्तीने स्वतःच्या धडधाकटपणाचे भांडवल करणे व त्याला दुजाभाव दाखवणे नंतर त्याची परिणती अत्याचारात होणे यांत कसले आले श्रेष्ठत्वाचे शहाणपण? आता एक  नवीन टूम काढली आहे या श्रेष्ठ लोकांनी , "आम्ही कसल्याच "कुबड्या" घेत नाही, आम्ही आमच्या हिंमतीवर पुढे जातो." हिंमतीवर पुढे जाणे आणि जाता जाता इतरांना ठेचणे हाच इतिहास वर अधोरेखित केला आहे आणि या सद्गुणांमुळेच बाकीच्यांना राजकीय व शैक्षणिक "कुबड्या" देण्यात आल्या आहेत म्हणून त्याची संपूर्ण माहिती न घेता त्याबद्दल काहीही बोलण्याचा नैतिक अधिकार श्रेष्ठ लोकांना नाहीच मुळी!  पूर्वजांच्या या उज्ज्वल इतिहासाचा त्रास पुढच्या पिढ्यांना भोगावा लागतो आहे हे त्यांना मान्य नाही. श्रेष्ठत्वाचा टेम्भा मिरवताना स्वतःचे जातभाई असलेल्या ज्या थोर व्यक्तींचे गोडवे हे गातात तेंव्हा हा विचार त्यांनी सोयीस्कररित्या बाजूला ठेवलेला असतो की ते थोर लोक आपल्या "आदर्शवादी विचारसरणीच्या" पूर्णपणे विरोधी वागलेत उदा. ज्ञानेश्वर माऊली, संत एकनाथ , श्रीमंत बाजीराव, आगरकर , न्यायमूर्ती रानडे, महर्षी कर्वे , सावरकर , महात्मा फुलेंना शाळेसाठी जागा देणारे भिडे इ. भले जग जरी चंद्रावर चाललं आहे तरी यांचा डोंगरावर राहण्याचाच अट्टाहास का? हे कळायला वाव नाही.
         ही मानसिकता आत्यंतिक कळकळीने फक्त जानवेधारकांनीच नाही तर वर्णव्यवस्थेतल्या बाकीच्या २ वर्णांनीही तितक्याच कसोशीने जपली. काश्मीर ते कन्याकुमारी हीच परिस्थिती होती. आता बहुजनवादाच्या नावाखाली "त्यांच्या महिलांना घरातून बाहेर काढून घरे पेटवून द्या" किंवा " १९४८ ला जे झाले परत होऊ शकते" अशा विचारांचे छापील साहित्य निर्माण करून  द्वेष पसरवणे हे प्रकार दिसून येतात.  आपल्याकडील थोर समाजसुधारकांनी या मानसिकतेवर कोरडे ओढले आणि त्या मानसिकतेचा वेळोवेळी द्वेष केला कुणा व्यक्ती किंवा व्यक्तीसमूहाचा नाही हे समजण्याची कुवत कागदोपत्री ब्राह्मण आणि अब्राह्मण लोकांकडे नसावी ही दुःखाची बाब आहे.
              पोथीनिष्ठता हीच या विखारी मानसिकतेचा आधार आहे. कोणा एका व्यक्तीने कुठल्यातरी पुस्तकामध्ये जे काही त्याचे विचार मांडले त्याच अनुसरण किती काळ करावं? बरं ते काळाला अनुरूप आहे का? हा साधा विचार का केला जाऊ नये? इतके आपण संवेदनाहीन झालो आहोत का? सोवळं-ओवळं, शिवाशिव व संबंधित फालतू परंपरा देव किंवा पितारांनी न सांगता धर्माच्या दलालांनी सांगितल्या आहेत हे ही कळू नये? आणि त्या सर्व प्रथा परंपरा यांची वैधता सदैव का ठेवायची? जे कालबाह्य आहे त्याची चिकित्सा करून ते सोडून जे चांगलं आहे त्याचंच पालन केलं जावं ना! यातच समाजाचं भलं आहे. बरं हे सगळं समाजसुधारकांनी कंठशोष करून फार पूर्वीच सांगितलं आहे.
         तरीही सडक्या प्रथा-परंपरांना धरूनच ज्यांना देव-धर्म करायचा आहे अशा सर्व जातीधर्माच्या लोकांनी गुरू ठाकूर यांनी 'भारतीय' या मराठी सिनेमासाठी लिहिलेल्या खालील गीताचे बोल विचारात घ्यावेत आणि आमच्यासारख्या रिकामटेकड्यांना हे असं लिहिण्याची संधी देऊ नये ही नम्र विनंती!

        तुझ्या-माझ्यात भेटल साऱ्यात तो।
        शोध नाही कुठे या पसाऱ्यात तो।
        भाव भोळा जिथे धावला तो तिथे
        भाव नाही तिथे सांग धावल का?
    बघ उघडूनी दार अंतरंगातला देव घावल का?

वाचण्याचे अतोनात कष्ट घेतल्याबद्दल धन्यवाद!.!.!
        

गुरुवार, २० एप्रिल, २०१७

ईश्वराचा ध्यास पण मूलभूत अधिकाराचा ऱ्हास

           
    (स्रोत : साभार इंटरनेट)
              
   ईश्वराला कोणी डोळ्यांनी पाहिलेलं नाही त्याला अनुभवलं गेलं आहे कारण तो मूर्त आहे की अमूर्त याबद्दल मतमतांतरे आहेत. त्याच्या बद्दल असं सांगता येईल की ती सर्वोच्च पारलौकिक शक्ती असून त्याला जगताचा निर्माता - नियंत्रक असं मानलं गेलं आहे. त्याला भगवान, परमपिता, अल्लाह या विविध नावांनी ओळखलं जातं. मुळामध्ये 'ईश्वर' (GOD) हा संस्कृत भाषेतील शब्द आहे तो ईश - नियंत्रित करणे या धातूला वरच् प्रत्यय लावून तयार झाला आहे.प्रत्येक धर्माची ईश्वराविषयीची आपली एक परिभाषा आहे.  तर अशा या ईश्वराची उपासना जगामध्ये लोक आपापल्या ज्ञानाप्रमाणे आणि पद्धतीप्रमाणे करत असतात.
        आपल्या देशामध्ये विविध धर्माचे लोक त्यांचे सण, उत्सव अगदी आनंदाने साजरे करताना दिसतात,  याला विज्ञान-तंत्रज्ञानाची जोड देऊन म्हणजे विजेच्या दिव्यांची रोषणाई, मोठमोठे कर्णे/स्पीकर्स यांच्या साथीने उपासना, उत्सवात भाविक रंगून जातात. देवाची आळवणी सामूहिकरीत्या करताना जो काही नाद तयार होतो त्यातून चैतन्यमय वातावरण होण्यापेक्षा भोवतालच्या लोकांना त्याचा त्रासच अधिक होतो आणि लोकांचे त्रासिक चेहरे पाहून कदाचित त्या देवालाही त्रास होत असावा.
               आपल्या देशाचा कोणताही अधिकृत धर्म नाही, कारण वर म्हटल्याप्रमाणे विविध धर्मिय इथे राहत असल्यामुळे घटनाकारांनीही भारत निधर्मी ठेवण्याची आणि तरीही धर्मस्वातंत्र्य देण्याची चतुराई दाखवली, पण घटनेनं भारतीय नागरिकांना धर्म स्वातंत्र्य दिलंय तरी किती? याची सुरुवात धर्म (Religion) म्हणजे काय? याचं उत्तर घटनेत काय नमूद केलं याची माहिती घेण्यापासून होते. धर्म या शब्दाची व्याख्या जन्माआधी व मृत्यूनंतर अशी परलोकातील बाब अशी करण्यात आली आहे. धर्मग्रंथ हा धर्माचा पाया आहे, त्यातल्या सांगितलेल्या आज्ञांचे पालन करून जर धर्म स्वातंत्र्य उपभोगायचे ठरवले तर राज्यघटना रद्द करावी लागेल कारण मूलभूत हक्क नावाच्या गोष्टीचा फारसा विचार या धर्मग्रंथांनी केल्याचं कुठं वाचनात नाही. घटनेत कलम २५ ते २८ ही मूलभूत हक्कासाठीची कलमे आहेत. कलम २५.१ अनुसार धर्म स्वातंत्र्य ४ बाबींच्या आधीन राहून उपभोगता येऊ शकते.
१. कायदा व सुव्यवस्था :
धर्माशी संबंधीत बाबीमुळे कायदा मोडता कामा नये व दैनंदिन व्यवहार विस्कळीत होऊ नयेत.

२. आरोग्य-वैयक्तिक व सार्वजनिक :
 धर्माने सांगितलेल्या रूढी-परंपरा पाळताना स्वतःच्या व इतरांच्या आरोग्याला हानी होता कामा नये.

३. नीतिमूल्ये-स्वातंत्र्य, समता, बंधुता :
वरील नीतिमूल्ये विचारात घेऊन भेदा-भेद , स्पृश्यास्पृश्यता इ. वाईट चालीरीती सोडून धर्मपालन करणे.

४. दुसऱ्याच्या मूलभूत हक्कांची जपणूक:
धर्मातील प्रथा-परंपरा, सण-समारंभ यासाठी दुसऱ्याच्या मूलभूत हककांची पायमल्ली होता कामा नये.
या बाबींचा विचार करून धर्मपालन करणे याचं प्रमाण खूप कमी आहे. सर्वच धर्मियांची या बाबतीत सारखीच वागणूक आहे आणि कुणी वरील बाबींचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आधार घेऊन वक्तव्य केलं की लगेच धार्मिक भावना दुखावल्या जातात. धार्मिक उन्मादातून कधी कधी भयानक पडसाद उमटतात म्हणून कुठल्याच धर्माचं उदाहरण इथे न घेतलेलंच बरं.
              हे टाळण्यासाठी वरील सगळ्याच बाबींचे ज्ञान समाजाला देणे ,त्यांचे गैरसमज दूर करणे उदा. Secularism म्हणजे सर्वधर्मसमभाव. Secularism हा धार्मिक बाबींतून झालेला अन्याय निवारण करण्यासाठी आहे. धर्माच्या व्याख्येनुसार परलोक आणि इहलोक अशी भान ठेवून विभागणी करून वागणे गरजेचे आहे.
       हे सगळं मांडता आलं याचं श्रेय राज्यघटनेला आहे कारण स्वतंत्र भारतात राज्यघटनाच (Constitution) सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळेच आम्ही शांततेत नांदू शकतो.
           राज्यघटनेचा विजय असो!                जय हिंद!


बुधवार, ४ मे, २०१६

झिंगाट आणि बॉयकॉट

           
  
  (स्रोत : साभार इंटरनेट)
          
      हे दोन शब्द सध्या महाराष्ट्रातून कानावर पडत आहेत, एका शब्दाचं गारुड आणि दुसऱ्यातून; जो त्याच्या अर्थातच दडलेला असा रागाचा सूर अनुभवायला मिळत आहे. या दोन्ही शब्दांचा संबंध एकाशीच आहे,  "सैराट".(Sairat).
              भन्नाट दिग्दर्शक नागराज मंजुळेंचा हा चित्रपट सध्या सैराट होऊन धुमाकूळ घालतो आहे. 'An epic love story' अशी ओळ लिहून ज्याप्रमाण याचं जोरदार प्रमोशन  केलं गेलं, त्याचप्रमाणं महाराष्ट्र त्याला डोक्यावर घेताना दिसत आहे. कारण अजय-अतुल यांचं बहारदार संगीत, सिनेमाला असलेला स्पेशल 'नागराज' टच, सुंदर चित्रीकरण आणि करमाळ्यातली सुंदर लोकेशन्स  यामुळे खरंच 'याड लागलंय'. याचं कौतुक करावं तितकं कमी आहे. या चित्रपटाची संकल्पना ज्यावर आधारित आहे ती नाजूक भावना साधं आयुष्य कसं सैराट बनवते याचा हा लेखा-जोखा. 'प्रेमात असते मृदुता; कठोरताही असते, फुलाप्रमाणे नाजूक प्रेम पाषाणाला ही भेदू शकते'  या कुण्या कवीच्या वाचलेल्या ओळींचा प्रत्यय हा सिनेमा बघताना येतो. या चित्रपटाला असलेला मराठी उसाचा गोडवा आणि त्याला येणारा कस्तुरीचा वास पार जर्मनीमध्ये ही दरवळला आणि बर्लिनकर ही त्यामुळे झिंगाट झाले; दणक्यात प्रीमियर पार पडला. प्रमोशनवेळी दिलेल्या मुलाखतीत नागराज म्हणतात तसं त्यातलं परश्या - आर्चीचं प्रेम प्रेक्षकांना आपलस वाटून जात आहे. आकाश ठोसर-रिंकू राजगुरू या दोघांचा पहिल्याच प्रयत्नातला अभिनय अतिशय सुंदर आहे, त्याबद्दल अभिनेता आणि अभिनेत्रींचं सगळीकडून कौतुक होत आहे. रिंकू-प्रेरणाने तर पहिल्याच चेंडूंमध्ये राष्ट्रीय पुरस्काराचा षटकारच मारला. संगीत - अजय अतुल (Ajay - Atul) म्हणलं की पुढं काही बोलायचीच गरज आहे असं वाटत नाही. "याड लागलं" आणि "सैराट झालं जी" यातली सिंफनी, "आता ग बयाचा" रॉक बाज आणि "झिंगाट"वर तर तरुण, म्हातारे-कोतारे, बाया बापड्या सगळीच हौस फिटे पर्यंत नाचत आहेत. या द्वयींच्या संगीताची गोडी शब्दांत मांडणं अवघड आहे, कारण त्याचा केवळ अनुभव घ्यावा आणि तृप्तता मिळवावी. हा सिनेमा प्रेम रसात ओतप्रोत न्हाऊन गेलेला आहेच पण शृंगार, करुण ,वीर, रौद्र, हास्य आणि शेवटी पसरणारी भयाण शांतता इ.रसांचा नागराज यांनी  सुरेख मेळ घातलेला आहे. एकूणच पब्लिकच्या तोंडून ऐकायला मिळत आहे, "झालय झिंग झिंग झिंगाट....."
                आता या झिंगाट मध्ये बॉयकॉटचा विषय कुठून आला? वर तोंड भरून कौतुक केल्यानंतर बहिष्कार करण्यासारखं आहेच काय यांत? आले ना हे प्रश्न डोक्यात? बघितल्यानंतर मलाही हे उमगत नव्हतं की बॉयकॉट कशासाठी? नंतर समजलं की सैराटच्या पटकथेत उच्च जातीत जन्मलेेली तरुणी व नीच जातीत जन्मलेल्या तरुणाची प्रेमकथा आहे, प्रेमासाठी घर-दार सोडणं याला समर्थन करायचं? का? हा संस्कृतीवर घाला आहे. तसंच यामुळं तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या  मुला-मुलींवर वाईट संस्कार होतील, सिनेमा बघून ते असंच काही भलतं-सलतं करतील. "V" किंवा "Mtv" वरचे थिल्लर कार्यक्रम तरुण पिढी आवडीने पाहते त्याच्याकडे काणाडोळा का? तेंव्हा संस्कार आडवे येत नाहीत? गद्धे पंचविशी येईपर्यंत २-३ वेळा ब्रेकअप , पॅचअप होऊन जातं आणि प्रेमिकांनी "चिल्ल" मारलेलं असतं याचा थांगपत्ता असतो कुणाला? चित्रपटात प्रेमाचा ओलावा जसा दाखवला तसे नंतर वास्तवाचे चटके सुद्धा कसे बसतात यावर ही प्रकाश टाकण्यात आला आहेच की,  मग प्रेम करावं की नको हा ज्याचा त्याचा प्रश्न!
     जातीयवाद पसरवतात म्हणून एकीकडे राजकारण्यांना शिव्या द्यायच्या आणि आपण त्याच पंक्तीला जाऊन बसायचं, हा विरोधाभास कसा कायजमतो आपल्याच लोकांना? हो आपल्याच लोकांना! कारण सारे भारतीय 'माझे' बांधव आहेत. तर या आपल्याच लोकांनी तुमचे सावरकर आणि आमचे बाबासाहेब हे केलंच आहे पण आता कलाकृतींच्या बाबतीत ही? का?  आमची 'कट्यार' तुमचा 'सैराट' हा 'ट्रेंड' येऊ द्यायचा नाही. नागराज यांनी भीषण वास्तव, खोटी प्रतिष्ठा , विखारी मानसिकता मांडली तर बिघडलं कुठं? जे चित्रपटाच्या शेवटाचं समर्थन करणाऱ्या तथाकथित उच्चंवर्णीय अशा दोन्ही जातींमधले लोक म्हणतात की दलित - उच्चवर्णीय यांनी लग्न केल्याचा परिणाम असाच होणार! मग कोल्हापुरातील विवाहित ब्राह्मण तरुण - मराठा तरुणी ते ही असेच दुर्दैवी ठरले. त्याबाबत काहीच अवाक्षर नाही. या मानसिकतेच्या त्रासातून बाजीराव-मस्तानी किंवा पठ्ठे बापूराव-पावळा सुटले नाहीत तर आर्चि- परश्याची काय बात महाराजा! म्हणूनच सोशल मीडियावर #boycottsairat पाहायला मिळत आहे.
यासाठी नागराजला एकट्यालाच का जबाबदार धरायचं? निर्माते निखिल साने आणि नितीन केणीही आहेतच की!
    आपल्या देशात चांगल्या परंपरा आहेत त्यामुळंच आपली संस्कृती टिकली आहे, पण त्यासोबत विषारी मानसिकता बाळगणे, खोट्या प्रतिष्ठेपायी प्रेमिकांचा बळी घेणे, जातीयवाद याचीही  जपणूक होत आहे ,हे वाईट आहे.
एकीकडे संवेदनशीलता, प्रेम, नवं काही करण्याची उर्मी आणि दुसरीकडे खोटी प्रतिष्ठा, जातीयवाद आणि विषारी मानसिकता. बॉयकॉट कशाचा करायचा? हे सुज्ञांस सांगणे  न लगे!


गुरुवार, २८ एप्रिल, २०१६

निंदकाचे घर

     

    "निंदकाचे घर असावे शेजारी" या संतशिरोमणी श्री. तुकाराम महाराजांच्या ओळी स्वानुभवातून आल्या आहेत. निंदकाने केलेल्या निंदेमुळे आपण ध्येयप्राप्ती साठी योग्य मार्गक्रमण करत आहोत का? हे तपासून पाहण्याची ती संधी मिळालेली असते. अपयश लाभल्यामुळे खूप वेळा निंदा सहन करावी लागते, या संक्रमणाच्या काळात निंदकाला हितचिंतक न मानता आपण त्याच्याबद्दल मनात अढी धरून बसतो. स्वाभिमानाला पोहोचलेल्या धक्कयामुळे त्या टीकेला होकारार्थी वळण देण्यासाठीच्या मानसिकतेची अतीव कमतरता बहुतांशी लोकांमध्ये दिसून येते.
              व्यक्ती जितकी महान असते तितकी अधिक निंदा तिच्या वाट्याला येते. हे निंदारूपी टाकीचे घाव व्यक्तीला देवत्वाकडे घेऊन जातात, पण तो मान-मरातब मिळाल्यावर प्रशंसकांबरोबर निंदक ही हातात हात घालून त्यांच्यासोबत आलेले असतात. मुद्दाम टीकाकार हा त्याच्याजवळ असणारा शब्द वापरण्याचं टाळलं कारण टीकाकार हा उत्प्रेरक/कॅटॅलीस्ट आहे जो चुका-दोष हा अनावश्यक भाग बाजूला काढून बाकी त्याच्या व्याखेनुसार काम करतो. तो ज्याच्यावर टीका करायची आहे त्याच्या यशापशाचा लेखा-जोखा त्यानं समोर ठेवलेला असतो, त्यावरच तारतम्य बाळगून तो भाष्य करत असतो. आजकाल जो उठतो तो टीकाकाराची भूमिका बजावतो आहे, पण हे टीकाकाराचं कातडं पांघरलेले निंदक आहेत, त्यांची भडक निंदाच याची जाणीव करून देत आहे.
सामाजिक प्रसारमाध्यमांमुळे याला मोकळं रान मिळालं आहे. नरेंद्र मोदी असोत की राहुल गांधी असोत, केजरीवाल असोत की कन्हैया कुमार; यांच्या समर्थकांनी त्यांची निंदा केली त्यांचे समर्थक यांची निंदा करायला कंबर कसून तयार. याला सध्याच्या बोलीभाषेत ट्रोलिंग म्हटलं जातं आणि हे करत बसतात ते ट्रोलर्स. चुका झाल्या तर तीव्र शब्दांत खरडपट्टी नक्कीच काढावी, अपराध घडला असेल तर कडक शासन करण्यासाठी स्वतंत्र न्यायव्यवस्था आहेच पण स्तर सोडून निंदा करण्याचा कसोशीने प्रयत्न का? ही घाणेरडी मानसिकता संसर्गजन्य रोगासारखी फैलावताना दिसत आहे. याला अटकाव घालण्याची तसदीही कुणी घेत नाही.
            वैचारिक मतभेद असतीलही, का असू नयेत? पण वैचारिक मतभेद असणाऱ्यांनी परस्परांना शत्रू मानून संधी मिळेल तेंव्हा पोटभर निंदा करून एकमेकांवर तोंडसुख घेण्याचा आटोकाट प्रयत्न चाललेला असतो. साधक-बाधक चर्चा करण्याची वृत्ती, समोरच्याची बाजू ऐकून घेण्याचा धीर या गोष्टींचा या मंडळींच्याकडे अभावच आहे अशी दूषित मानसिकता घेऊन कसं जगता येतं हे त्याच निंदकांना माहीत! आणि हे सगळं समोरासमोर करण्यासाठी अजिबात वेळ नाही, पण दिसला बॉक्स की द्या कॉमेंट, टाका पोस्ट...प्रातःकाळी हरिनामाऐवजी आज कुणाला आणि कसं ट्रोल करावं हाच विचार करत असतील बहुतेक. ऑफिस मधला रिकामा वेळ असो, जेवणाची सुट्टी असो सामाजिक प्रसारमध्यमांवर काही लोक तीन प्रहरी हेच काम करताना आढळतात, यांना केवळ ब्रेकिंग न्युज मिळण्याचा अवकाश असतो. जेष्ठ नागरिकांसोबत तरुणही त्याच मार्गाला लागले आहेत. या उद्देशासाठी अशा समविचारी जनांचे समूह होताना पहायला मिळत आहेत. यासाठी या लोकांना स्वतःच्या वैचारिक, बौद्धिक पात्रतेचा विसर पडल्याचं जाणवत आहे.
             हे सत्कार्य करण्यासाठी फावला वेळ खर्ची घालवण्यापेक्षा आपले छंद जोपासणे, आपल्याजवळचे ज्ञान या समूहांतून नव्या पिढीला देणे, विचारांचे आदान-प्रदान करणे, सामाजिक प्रश्नांवर काम करण्यासाठी एकत्र येणे इ. स्वप्नवत गोष्टी सामजिक प्रसारमाध्यमांवरील समूहांमधून कधी साध्य होतील? विज्ञानाच्या प्रगतीमुळे मिळालेल्या या सामाजिक माध्यमांसारख्या अमूल्य देणग्यांचा वापर स्वहितार्थ तथा जनहितार्थ करणार का? तर कधी करणार? हा प्रश्न स्वतःला विचारण्याची हीच वेळ आहे. ती दवडु नये असं वाटतं.

मातृ दिनाच्या इतिहासाची कहाणी

                              प्रेम स्वरूप आई वात्सल्यसिंधु आई                  बोलावू तुज आता मी कोणत्या उपायी                             ...