"माझी शाळा" या विषयावर निबंध लिहून बऱ्याच वेळेला शाई कागदावर ओतण्याचं काम केलं आहे. आमच्यातले काही सवंगडी ज्यांना शिक्षक "महाभाग" म्हणत ते नेहमीप्रमाणे 'नवनीत निबंधमाला' इतकी बेमालूम छापायचं काम करत की विरामचिन्ह सुद्धा बरोबर येत असत. म्हणूनच शिक्षकांनी त्यांचं असं बारसं केलं असावं....मजा येते जेंव्हा आपण जुने फोटो पाहत असतो, आणि हा अल्बम तर त्या सोनेरी दिवसांचा आहे तो पाहताना तोंडातून आपसूक वाक्य निघून जातं यार, मस्त होते ते शाळेचे दिवस!
आपल्या माणसांसमोर बोलताना, गप्पा मारताना कसला क्रम वगैरे लक्षात न घेता, औपचारिकता न ठेवता मनात येईल तसं सांगण्याचा प्रयत्न केलाय.
६ वर्षे वय नसल्यामुळे घराजवळ नगरपालिका शाळा नं. ३३ मध्ये जाऊन बसायचो, नंतर ६ वर्षे पूर्ण झाल्यानंतर पालकांनी नवीन शाळेत घातलं. कुणी विचारलं तर आवर्जून नाव सांगायचो, "डेक्कन एज्युकेशन सोसायटीची नवीन मराठी शाळा". जप्तीवाले बाईं, माने आणि वायदंडे बाईंच्या त्या वर्गात बडबडगीते, पाढे म्हणायला, आषाढीच्या दिवशी वारकरी, गोकुळाष्टमी दिवशी कृष्ण म्हणून फोटो काढून घ्यायला, कधी चुकून सतरंजी ओली केली म्हणून आमच्या लाडक्या म्हाताऱ्या मावशीबाईंचा मार खाण्यासाठी शाळेत यायचो. कधी नकला केल्या, गोष्ट सांगितली तर मुख्याध्यापिका वाडीकर बाईंची शाबासकी मिळायची. अशा रीतीने लहान गट, मोठा गट पार पडला. इयत्ता पहिली, आता पाटी जाऊन हातात वही- पेन्सिल आली होती. बांदल बाई आम्हाला परिसर अभ्यास, मराठी आणि गणित या विषयांचा परिचय करून देण्यासाठी होत्याच. वर्गशिक्षक आणि आम्हा मुलांचा खेळ हा सामाईक आवडता विषय म्हणून अभ्यासाबरोबर खेळाचाही आनंद आम्ही लुटला. इयत्ता दुसरी, चौगुले सर, यांच्यामुळे आमच्यात बरेच चांगले बदल घडले, कोंबडीचे पाय जे आमच्या वह्यांवर उमटायचे, त्यांना आणि आम्हाला दोघांनाही वळण लावायचं काम त्यांनी केलं. घरी बाबा आणि इथे सर म्हणजे नुसतं छडी लागे छमछमच; यामुळे हस्ताक्षर आणि आम्ही कायमचेच सुधारलो. दिवाळी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सर शिबीर भरवायचे. आम्ही गावाला जाण्यापेक्षा शिबिराला पळायचो. खूप सारे खेळ खासकरून घोडेस्वारी शिकण्याची मजा यायची. सर कवितेला भन्नाट चाल लावायचे; "पलीकडे ओढ्यावर" या कवितेला लावलेली धनगरी गीताची चाल त्यामुळे आजही ती कविता ओठांवर आहे आणि सरांची नक्कीच आठवण होते.
इयत्ता ३री म्हणजे सगळंच नवीन. जुन्या दगडी इमारती मधून आता नवीन इमारतीमध्ये आलो होतो. शाळेचं नांव ही बदललं होतं, "श्री कांतीलाल पुरुषोत्तमदास शहा प्रशाला'. वर्गशिक्षिका कुलकर्णी बाईंबद्दलच्या ठळक आठवणी म्हणजे माझ्या शांत स्वभावामुळे बाईंचा मार खूप खाल्ला आहे. चौथी म्हणजे आधीच स्कॉलरशीप मुळे टेन्शन आणि वर्गशिक्षक माने सर. तसं भीतीदायक म्हटलं पाहिजे कारण कडक शिस्तीचे माने सर कदाचित ते स्काऊट गाईडचे वर्ग ही घ्याचे त्यामुळे असावेत पण इतिहास म्हणजे माने सर असं पक्कं समीकरण. साक्षात छत्रपती शिवाजी महाराज मुलांसमोर उभे करायचे ते. आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे त्यांचा हातखंडा. त्यांच्यामुळे विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तमोत्तम गुण मिळवून नाव लौकिक वाढवला. तसेच पाचवीचे मुलांचे लाडके जोशी सर. गणित आणि भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास. ढ भोपळा सुद्धा या चांगले गुण मिळवेलच इतके छान शिकवायचे सर. त्यांनी जेंव्हा शाळा सोडली तेंव्हा बऱ्याच मुलांच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. तसेच मुलांसाठी अतोनात कष्ट घेणारे कै. कर्नाळे सर. त्यांचा विषय खरतर त्यांचा विषय इंग्लिश पण २००३ च्या आमच्या स्कॉलरशीप बॅचसाठी सर स्वतः बुद्धिमत्ता आणि गणित चा अभ्यास करत मग आम्हाला शिकवत. आपला प्रांत नसतानाही समोर आलेली गोष्ट challenge म्हणून स्वीकारणे आणि त्यात पारंगत होणे हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. अजून एक महत्त्वाचं नांव म्हणजे मुख्यध्यापिका पटवर्धन बाई. कायम प्रसन्न मुद्रा, पण कडक शिस्त. कोणत्या वर्गातला कोणता विद्यार्थी कशात पटाईत आहे हे त्यांना चांगलं ठाऊक असायचं. म्हणूनच शिक्षणाबरोबर बाह्य बौद्धिक आणि क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी मुलांना कायम प्रोत्साहन द्यायच्या.
माध्यमिक म्हणजे ८ वी ते १० वी म्हणजे शाळेतली शेवटची ३ वर्षे म्हणून दंगा-मस्ती, खेळ आणि झालंच तर अभ्यास ही मनसोक्त करून घेतलं. आजही कोल्हटकर बाईंच्या मराठीच्या कविता आणि संस्कृतची सुभाषिते, कावडे मॅडमचे इंग्लिशचे तास, लिमये सरांचे गणित आणि विज्ञान १ शिकताना कायम सकारात्मक असण्याबद्दल सांगितलेल्या काही गोष्टी, शशिकांत पाटील सरांचं मुलासाठी वेगवेगळी पुस्तकं आम्हाला वाचण्यासाठी मिळावीत म्हणून झटणं, मुख्याध्यापिका पाटील बाईंनी विद्यार्थ्याने कुठे चूक केली तर पाठीत धपाटा घालणं आणि कुठल्या स्पर्धेमध्ये यश मिळवल्याबद्दल पाठीवर हात ठेवून त्याच कौतुक करणं सगळं आठवतं. आवर्जून नाव घ्यावं असे म्हणजे मोने सर. पण तेंव्हा आमची १० वी होऊन गेली होती आणि सर मुख्याध्यापक झाले. डॉ. दाभोळकर, अनिल अवचट यांसारख्या मोठ्या व्यक्तींची आणि मुलांची त्यांनी गाठभेट घडवली, शाळेचं वातावरण पूर्ण च बदलून टाकलं. पवार काका, मायणे काका, पोतदार काका, कांबळे काका आणि सव्वाशे मावशी यांनाही आम्ही विसरलो नाही. मला त्या वार्षिक क्रीडा स्पर्धा, बौद्धिक स्पर्धा, स्नेहसम्मेलन या सूंदर भूतकाळात वाकून बघताना छान वाटतं, या सगळ्या गोष्टी आताच्या आयुष्यात खूप 'miss' करतोय.
पु.ल.च्या गोष्टीतले चितळे मास्तर, ते एकच होते पण आमच्याकडे फौज आहे या शिक्षकांची. तुमच्या ऋणातून मुक्त नाही होता येणार पण आज संधी आहे तर तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे "शब्देची गौरव पूजा करू".
प्रत्यक्ष हजर नाही राहू शकलो पण इथूनच तुम्हाला नमस्कार करतो, आणि थांबतो.

Thanks Shrram for sharing your memories. You have done it in short time.please do visit our school
उत्तर द्याहटवाविसरु कसा श्रीरामा तुला.......
उत्तर द्याहटवाछान आठवणी लिहिल्या आहेत श्रीराम...
शाळेतील बाक तुमची आजुन वाट पाहत आहेत