शुक्रवार, ३ एप्रिल, २०२०

"राम" हैं

गीतकार: जावेद अख्तर (Javed Akhtar)
संगीत: ए. आर्. रहमान. (A.R. Rahman)

सीता:
पल पल है भारी वो विपदा है आई
मोहे बचाने अब आओ रघुराई
आओ रघुवीर आओ, रघुपति राम आओ
मोरे मन के स्वामी, मोरे श्रीराम आओ
राम-राम जपती हूँ, सुनलो मेरे राम आओ
राम-राम जपती हूँ, सुनलो मेरे रामजी…
कोरस:
बजे सत्य का डंका, जले पाप की लंका
इसी क्षण तुम आओ, मुक्त कराओ
सुन भी लो अब मेरी दुहाई
पल पल है भारी, वो विपदा है आई..
मोहे बचाने अब आओ रघुराई।।
राम को भूलो, यह देखो रावण आया है
फैली सारी सृष्टि पर जिसकी छाया है।
रावण:
क्यों जपती हो राम राम तुम?
क्यों लेती हो राम नाम तुम?
राम राम का रटन जो यह तुमने है लगाया
सीता…. सीता तुमने राम में ऐसा क्या गुण पाया?

                                              ( स्रोत : साभार इंटरनेट)

सीता:
गिन पाएगा उनके गुण कोई क्या,
इतने शब्द ही कहाँ हैं
पहुँचेगा उस शिखर पे कौन भला,
मेरे रामजी जहाँ हैं!
जग में सबसे उत्तम हैं, मर्यादा पुरुषोत्तम है
सबसे शक्तिशाली हैं, फिर भी रखते संयम है
पर उनके संयम की अब आने को है सीमा
रावण समय है…माँग ले क्षमा
कोरस:
बजे सत्य का डंका, जले पाप की लंका
आए राजा राम, करें हम प्रणाम
संग आया लक्ष्मण जैसा भाई
पल पल है भारी, वो विपदा है आई..
मोहे बचाने अब आओ रघुराई।।
रावण:
राम में शक्ति अगर है, राम में साहस है तो
क्यों नहीं आए अभी तक वो तुम्हारी रक्षा को?
जिनका वर्णन करने में थकती नहीं हो तुम यहाँ
यह बताओ वो तुम्हारे राम हैं इस पल कहाँ??
सीता:
राम हृदय में है मेरे, राम ही धड़कन में हैं
राम मेरी आत्मा में, राम ही जीवन में हैं….
राम हर पल में है मेरे, राम है हर स्वास में
राम हर आशा में मेरी, राम ही हर आस में

                                                (स्रोत : साभार इंटरनेट)

मोहन भार्गव:
राम ही तो करुणा में है, शांति में राम हैं
राम ही है एकता में, प्रगती में राम हैं
राम बस भक्तों नहीं, शत्रु के भी चिंतन में हैं
देख तज के पाप रावण, राम तेरे मन में हैं
राम तेरे मन में हैं, राम मेरे मन में हैं …(2)
राम तो घर घर में हैं, राम हर आँगन में हैं
मन से रावण जो निकाले, राम उसके मॅन में हैं …(2)
सीता:
पल पल है भारी, वो विपदा है आई
मोहे बचाने अब आओ रघुराई।।
कोरस:
सुनो राम जी आए, मोरे राम जी आए
राजा रामचंद्रा आए, श्री रामचंद्र आए
राम जी आए, मोरे राम जी आए..हो…(2)
        २ एप्रिल २०२०. चैत्र शुद्ध नवमी अर्थात रामनवमी. रामाचा जन्म इ.स.पूर्व ५११४ वर्षांपूर्वी झाला म्हणजे ही रामाची ७१३४ वी जयंती. आपल्या सिनेसृष्टीमध्ये आपल्या बहुतेक सर्व सण-उत्सवांवर आधारित गाणी आहेत. वर दिलेलं भलं मोठं गाणं जरी दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर 'स्वदेस' (Swades) या सिनेमात दाखवलं असलं तरी ते आजच्या दिवशी त्याचं स्मरण हटकून होतं कारण या गाण्यामध्ये रामाचा गुणगौरव करण्यात आला आहे. थोर व्यक्ती/महापुरुषांचे गुणगान त्यांच्या जयंती-पुण्यतिथीला करणे ही आपली प्रथाच आहे. राम हे तर देवस्वरुप आहेत म्हणून रामभक्ती हा भारतीय संस्कृतीचा भाग आहे. 'स्वदेस' या चित्रपटात मूळचा भारतात वाढलेला, सुट्टी घेऊन एका खेडेगावात आलेला, जगातलं उच्चतम तंत्रज्ञान असणाऱ्या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था 'नासा' (NASA) इथं काम करणारा युवक 'मोहन भार्गव'(शाहरुख खान) (Shahrukh Khan); 'नासा-खेडेगाव;दोन्ही एकदम भिन्न वातावरण आणि संस्कृती असणारी ठिकाणं; नासा मध्ये सतत वैज्ञानिक संशोधन करुन अल्पसंतुष्ट न राहता विश्वातल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा छंद पण गावात पोट भरण्याचं काम करावं आणि जे चालत आलंय ते करावं "ठेविले अनंते" प्रमाणं जगावं ही वृत्ती, कामावरून सुट्टी घेऊन आल्यानंतर गाव आणि अमेरिका यातला फरक बघून त्याचं मन व्यथित होतं आणि त्यातून तो गावासाठी काय करतो हे दाखवलं आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे.
         सदर गाणं दसऱ्याच्या रामलीलेच्या प्रसंगी घेण्यात आलं आहे. उत्तर भारतात दसऱ्याच्या दिवशी रामलीला सादर होणं आणि रावण दहन याला मोठी परंपरा आहे. सणवार-उत्सव व जोडून येणाऱ्या रुढी-प्रथा पाळणं आपल्याकडं हौसेनं केलं जातं, मग त्या मागची भावना-विचार-हेतू पुढच्या पिढ्यांना समजेल वा न समजेल यांवर लक्ष दिलं जात नाही. मोहनच्या या गावातही अशीच परिस्थिती. रामलीलेतल्या भजनात कोरस म्हणावा आणि घरी जाऊन झोपावं, उद्या पुन्हा ये रे माझ्या मागल्या! अरे म्हणजे आम्ही आमचे सण साजरे करायचे नाहीत का, प्रथा- परंपरा पाळायच्या नाहीत का? "आमचेच" सण बरे दिसतात? तसं नाही. काय आहे की हा सिनेमा मोहन भार्गवच्या नजरेतून आपल्याला दिसतो. आपल्या मानलेल्या आईच्या ओढीनं अनोळखी गावात मोहन आला,  त्याच्या नजरेला अमेरिका आणि गाव यातली तफावत चांगलीच लक्षात येत जाते की गावात १८ पगड जाती म्हणून अस्पृश्यता जातीवाद बोकाळला आहे. ६० वर्षे झाली देश स्वतंत्र होऊन तरी मुलींना शाळेत पाठवलं जात नाही,अस्पृश्यांच्या मूला-मुलींना शाळेकडं बघायचीही सोय नाही. गावात अजूनही वीज नाही. ज्या उत्साहात गाव आपले सणवार -परंपरा-उत्सव साजरे करतं तो उत्साह मूलभूत सोयी-सुविधा, विकास करण्यासाठी कणभरही दिसत नाही. म्हणून या गाण्यातही मोहन अस्वस्थ होताना दिसतो. राम हे सीतेचे पती आहेत म्हणून तिने गुणगान करायचं आणि बाकीच्यांनी तल्लीन होऊन त्यावर माना डोलवायच्या! म्हणून बेचैन झालेल्या मोहनच्या रुपात आधुनिकतेनं परंपरावादाला दिलेलं हे उत्तर आहे,
*राम ही तो करुणा मे हैं-
दया हे उत्तम पुरुषाचं लक्षण आहे. दया बाळगा, पोरी-बाळी आणि जे दलित लोक आहेत त्यांची दया येऊ द्या, त्यांना त्यांचे अधिकार द्या. राम तिथं आहेत.
*शांती में राम हैं-
आपल्या या उच-नीचतेमुळं खोट्या अहंकारामुळं भांडण-तंटे होतात. हे सोडा. वैयक्तिक-सामाजिक शांती प्रस्थापित करा.
राम तिथं आहेत.
ही वरची व पुढच्या ओळी एकमेकांशी जोडल्या आहेत.
*राम ही है एकता में-
भांडण-वाद नव्हते, सुसूत्रता होती, एकता होती म्हणून राम-वानरसेना रावण व राक्षस मारुन सीतेला आणू शकले. एकीचं बळ मोठं म्हणून सामाजिक ऐक्य पाहिजे. राम तिथं आहेत.
*प्रगती मे राम है-
शांती आहे. ऐक्य आहे. तर संकटांना समाज एकत्र सामोरा जाऊ शकतो, परस्परांना मदत करून पुन्हा उभा राहू शकतो, आणि प्रगती करु शकतो. राम तिथं आहेत.
*राम बस भक्तों नहीं, शत्रु के भी चिंतन में हैं-
भक्त तर देवाचं स्मरण करतच असतात पण रावण सीतेचं मन बदलावायचा प्रयत्न करताना स्वतःच रामाचा जप करतो. रावणाला सावधान करताना कुंभकर्णही रामाचं गुणवर्णन केल्याचं ऐकलं आहे, शत्रूगटातला तिसरा भाऊ बिभीषण तर सततच राम-नाम जपत होताच. बघा शत्रूच्या विचारात, राम तिथंही आहेत.
*देख तज के पाप रावण, राम तेरे मन में हैं
  राम तेरे मन में हैं, राम मेरे मन में हैं-
खोटा अहंकार, अस्पृश्यता, जातीवाद, वैयक्तिक-सामाजिक प्रगतीसाठी न झटणे, मूलभूत प्रश्नांचा विचार न करणे "असेल माझा हरी/ ठेविले अनंते..." ही वृत्ती पापी आहे, रावणासारखी आहे. तिला सोडा. मग राम तिथं आहेत. राम मनामनांत आहेत. राम सर्वव्यापी आहेत
*राम तो घर घर में हैं, राम हर आँगन में हैं-
प्रत्येक घरात लोक शांती, समाधान, आनंदात राहत आहेत. घरात वातावरण चैतन्यमय आहे. घरातल्या बालगोपालांचं आणि अंगणातल्या तुळस व अन्य झाडांची म्हणजे पर्यायाने निसर्गाची निगा राखली जात आहे. घरात व अंगणात अंतर्बाह्य जिवंतपणा आहे. तिथं राम आहेत.
*मन से रावण जो निकाले, राम उसके मन में हैं-
वैयक्तिक- सामाजिक दोष- दुर्गुण जे रावणासारखे आहेत ते काढून टाका, मग तुमच्यातच राम आहेत.
या गाण्यामध्ये बाकी आध्यात्म आपण ऐकत आलो आहोत, पण या ओळींमध्ये एक वेगळं तत्वज्ञान आहे. तेच समजून घेणं गरजेचं आहे.
         रामलीलेमध्ये हा प्रसंग बघून थोडा अस्वस्थ झालेला मोहन गावकरी लोकांच्या श्रद्धेला नावं ठेवणं, त्यांचा अकारण विरोध करणं, अपमान करणं असे उद्योग करत नाही तर आधी परंपरा पालन पूर्ण होऊ देतो मग त्यांचीच री ओढतो व त्याच्या अनुभवाला आलेलं तत्वज्ञान सगळ्यांसमोर सांगतो. बर हे फक्त त्याच दिवसापुरतं मर्यादित न ठेवता गावासाठी सर्वांना एकत्र आणून त्यांच्याच मदतीनं गावात विजेचा छोटा प्रकल्प उभा करतो, त्यांनतर तो भारतातच स्थायिक होतो, हे सिनेमा पाहिलेल्यांना माहीत आहे. खरं तर हा उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या समाजसेवक, बुद्धिजीवी लोकांसाठी छान उदाहरण आहे की प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करावं.  
          म्हणूनच हे तत्वज्ञान समजून घेऊन ते अंगी बाणवलं जावं. कारण रामराज्य आपोआप येत नाही, त्यासाठी प्रत्येकवेळी राम येण्याचीही वाट पाहत बसू नये, आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. म्हणून जोवर आपल्यात राम आहे तोवर हाच ध्यास धरूया, त्याचसाठी झटूया!
तूर्तास राम राम!.!.! 🙏🏼🙏🏼🙏🏼.

सोमवार, २७ जानेवारी, २०२०

काय सांगते संविधानाची उद्देशिका? : भाग -१.

                        
                         (स्रोत : साभार इंटरनेट)
                 
     महाराष्ट्र आणि त्यानंतर मध्यप्रदेश सरकार यांनी कौतुकास्पद निर्णय घेतला की शाळेमध्ये प्रार्थनेच्या वेळी संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन केलं जावं. पण उद्देशिका म्हणजे काय? संविधान म्हणजे काय? हे सगळे प्रश्न मनात घर करतात. तर आधी त्याची पूर्वपीठिका म्हणजे इतिहास थोडक्यात समजून घ्यायला हवा,
१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारताला इंग्रजी राजवटीपासून स्वतंत्रता मिळाली. आपल्या देशासाठी ही नवीन एक सुरुवात होती. या खंडप्राय अशा देशावर आता नियंत्रण कुणाचं? त्यांनी कसं नियंत्रण ठेवायचं? राज्यकारभार कसा करायचा? या प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी नव्याने निवडून आलेल्या ब्रिटनच्या एटली सरकार मधील ३ मंत्र्यांची त्रिमंत्री योजना १९४६ (सदस्य: लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स, आलेक्झांडर) त्यातल्या तरतुदीनुसार भारतीय संविधान सभा (Indian constitutional assembly) निर्माण झाली. (कार्यकाळ: ९ डिसेंबर १९४६ ते २४ जानेवारी १९५०) त्यातल्या ७ समित्यांपैकी एक आणि मुख्य समिती म्हणजे घटना मसुदा समिती [स्थापना: २९ ऑगस्ट १९४७. अध्यक्ष : डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr.B.R. Ambedkar) अन्य सदस्य: अलादी कृष्णस्वामी अय्यर, डॉ. कन्हैयालाल मुन्शी, गोपाळस्वामी अय्यंगर, मोहंमद सादुल्ला, टी. टी. कृष्णम्माचारी (डी.पी. खैतान यांच्या मृत्युनंतर नियुक्ती १९४८),  एन. माधव राऊ (बी. एल. मित्तर यांनी राजीनामा दिल्यानंतर नियुक्ती)] या समितीने जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीसाठी सर्वात मोठ्या लिखित संविधानाचा मसुदा लिहिला. राज्यघटनेच्या सुरुवातीला संविधानाची उद्देशिका (preamble) पाहायला मिळते. काय आहे उद्देशिका? काय सांगते ती आपल्याला?
         संविधानाचा परिचय किंवा प्रस्तावना म्हणजे उद्देशिका. प्रथमतः अमेरिकन राज्यघटनेत सुरुवातीला उद्देशिकेला स्थान दिलं गेलं आणि पुढे हीच परंपरा भारत व अन्य देशांनी जपली. यात घटनेचा अर्क किंवा सारांश आहे. १३ डिसेंबर १९४६ या दिवशी पं. नेहरूंनी घटना समितीसमोर 'उद्दीष्टांचा ठराव' मांडला. यामध्ये संविधानाचा मसुदा कसा लिहिला जावा यासंबंधीची मूलभूत विचारधारा आणि मोठं तत्वज्ञान होतं, त्यातूनच ही उद्देशिका मिळाली. त्यातल्या तरतूदी इथं मांडल्या आहेत.
*भारत हे एक प्रजासत्ताक गणराज्य असेल.
*सत्तेचं उगमस्थान- भारतीय जनता आहे.
*सर्व लोकांना न्याय , स्वातंत्र्य व समता याची हमी आणि संरक्षण दिले जाईल.
*अल्पसंख्याक, मागास आदिवासी, वंचित व मागासवर्ग यांच्या साठी संरक्षक तरतूदी असतील.
*राष्ट्रीय एकात्मता जोपासली जाईल.
           संविधान हा आपल्यासाठी मूलभूत आणि सर्वश्रेष्ठ कायदा आहे. भारतात लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी केलेले लोकांचंच राज्य आहे, सत्तेचा उगमच जर लोक आहेत म्हणूनच याची सुरुवात 'आम्ही भारताचे लोक' अशी करण्यात आली आहे. तर अशा भारतीय लोकांनी एकत्र येऊन काय आणि कशाप्रकारे साध्य करायचे आहे, हे या उद्देशिकेत सांगितले आहे. यातल्या महत्वाच्या काय शब्दांमध्ये काय दडलंय हे ही समजून घ्यायला हवं,

सार्वभौम- भारतीय लोक राज्यकारभार करताना कोणत्याही स्वरूपाचे निर्णय घेण्यासाठी कुठल्याही परकीय शक्तीवर अवलंबून किंवा तिच्या प्रभावाखाली राहणार नाही, कारण  यासाठी भारत एक स्वतंत्र देश म्हणून राज्यकारभार करण्यासाठी सक्षम आहे.

समाजवादी- संविधानातल्या राज्यविषयक धोरणामधल्या मार्गदर्शक  तत्वांमध्ये समाजवादाचा भाग आढळतो. भारतात 'लोकतांत्रिक समाजवाद' आहे, 'साम्यवादी समाजवाद' (चीन, क्युबा) नाही. सर्वोच्च न्यायालय म्हणते की लोकतांत्रिक समाजवादाचे ध्येय हे गरिबी, रोगराई आणि संधीची असमानता संपवणे. भारतीय समाजवाद हा मार्क्सवाद आणि गांधीवादाचं सुंदर मिश्रण आहे.

धर्मनिरपेक्ष- आपल्या देशाचा अधिकृत असा कोणताही धर्म नाही, पण नागिरकांना धर्म पाळण्याचा मूलभूत हक्क संविधानाने दिलेेला आहे(कलम २५-२८)  आपल्या संविधानात धर्मनिरपेक्षतेची सकारात्मक संकल्पना आहे, सर्व धर्म (धर्माची लोकसंख्या विचारात न घेता) हे समान पातळीवर आहेत व सरकार दरबारी त्यांना समान वागणूक आहे.

लोकशाही - लोकशाहीचे २ प्रकार पडतात.
प्रत्यक्ष लोकशाही: धोरणे ठरवण्यात जनतेचा प्रत्यक्ष सहभाग. उदा. स्वित्झर्लंड
अप्रत्यक्ष लोकशाही: २ उपप्रकार:-
संसदीय (उदा.भारत) येथे लोकप्रतिनिधी निवडले जातात व ते आपला नेता(पंतप्रधान) निवडतात.
(म्हणून आपली प्रातिनिधिक संसदीय लोकशाही म्हटली जाते.)
आणि अध्यक्षीय (उदा. अमेरिका) येथे अध्यक्ष थेट जनता निवडते.
म्हणजे लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी मिळून सरकार बनवतात आणि या सरकारला जनतेच्या कल्याणाचे राजकीय, सामाजिक व आर्थिक निर्णय संविधानाच्या चौकटीत राहून घ्यावे लागतात.

गणराज्य- लोकशाही राजव्यवस्थेचे २ प्रकार:
राजेशाही: राज्य/राष्ट्रप्रमुखपद हे वंशपरंपरेने मिळते. (ब्रिटन)
गणतंत्र/राज्य: राज्य/राष्ट्रप्रमुखपद हे ठराविक काळासाठी जनता निवडते. (अमेरिका)
आपल्याकडे 'राष्ट्रप्रमुख/राष्ट्रपती' हा अप्रत्यक्षपणे निवडून ५वर्षांसाठी निवडून दिला जातो.
न्याय- ३ प्रकारचे न्याय उद्देशिकेत सांगितले आहेत.
सामाजिक, राजकीय व आर्थिक हे मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत हक्क यांच्या वेगवेगळ्या तरतूदीद्वारे संरक्षित करण्यात आले आहेत.
सामाजिक न्याय: समाजात जात, धर्म-पंथ, लिंग, वर्ण, रंग इ.
असा कोणताही भेदभाव न ठेवता सर्व जनतेला समान वागणूक देणे म्हणजे सामाजिक न्याय.
राजकीय न्याय: सर्व नागरिकांना समान राजकीय हक्क , सर्वच राजकीय कार्यालयांमध्ये प्रवेशासाठी समानता व सरकारकडे दाद मागण्याचा समान हक्क प्रदान करण्यात आलेला आहे.
आर्थिक न्याय: समाजामध्ये कोणत्याही प्रकारचा आर्थिक घटकांवर आधारलेला भेदभाव न करू देणे म्हणजे संपत्ती, अर्थप्राप्ती , मालमत्ता या मुद्द्यांवरून समाजात जी असमानता येते तिला हद्दपार करणे.
वरील ३ प्रकारच्या न्यायाचा आदर्श हा रशियन राज्यक्रांतीकडून (१९१७) घेण्यात आला आहे.

क्रमशः

सोमवार, २० जानेवारी, २०२०

तान्हाजी- २०२० चा पहिला ब्लॉकबस्टर.


                      ( स्त्रोत : साभार इंटरनेट )
                       
                    पुढं खासा उदेभान उभा ठाकलेला
                    तरी सिंहानं गनिमाचा खुर्दा उडवला
                    पन राजपुताचा घाव वर्मी लागला
                   अन् स्वराज्यासाठी प्रान सोडला
            गातो नरवीराच्या पराक्रमाला हो जीs जीs जीs
           मानहानीकारक पुरंदरचा तह, त्यातल्या अटींनुसार ते २३ किल्ले, काही लक्ष होनांचा प्रदेश द्यावा लागला, ऐन उमेदीत आलेलं हिंदुपदपातशाहीचं स्वराज्य मातब्बर मुघल मनसबदार मिर्झाराजे जयसिंग यांच्या अचानक धडकेमुळे कोलमडून गेलं. त्याच स्वराज्याची पुनर्उभारणी करण्याची आवश्यकता होती. काही गड किल्ले घेतलेही पण अजूनही अजेय असा कोंढाणा आणि त्याच्यावर फडकणारा मुघली परचम् जिजाऊ माँसाहेब आणि सिउबाराजांच्या डोळ्यांत कुसळाप्रमाणे सलत होता. महाराजांचा बालपणीचा सवंगडी सुभेदार तान्हाजी मालुसरे यांनी कोंढाणा घेण्याचं कबूल केलं आणि ४ फेब्रुवारी १६७० च्या हल्ला करून प्राणार्पण करून गड काबीज केला.
             याच सर्वश्रुत पार्श्वभूमीवर आधारित असलेल्या अजय देवगण यांचा अभिनय असलेल्या "तान्हाजी- द अनसंग वॉरीअर" (Tanhaji - the unsung warrior) या सिनेमानं २०२० या वर्षाची दणदणीत सुरुवात केली आहे. १०० कोटी ₹ च्या क्लब (100 crore club) मध्ये वर्णी लावून या वर्षीचा पहिला ब्लॉकबस्टर होण्याचा मान मिळवला आहे. भन्साळी कॅम्पचे प्रकाश कपाडिया आणि सोबतीला ओम राऊत यांनी कथा- पटकथा जबरदस्त लिहिली आहे. तसंही ऐतिहासिक कथेवर सिनेमा बनवणं खूप जोखमीचं काम आहे. इतिहासातला आवश्यक तोच घटनाक्रम निवडणे आणि योग्य सृजनस्वातंत्र्य (cinematic liberty) घेऊन पटकथा वेगवान ठेवण्याचं काम उत्तम केलं आहे. वीररसाला मध्यभागी ठेऊन बाकी रसांच प्रसंगानुरूप मिश्रण खूप छान आहे, आणि बॉलीवूडचा असा एक खास फ्लेवरही टाकला आहे. या दोघांबरोबरच याचं श्रेय जातं ते देवगण कॅम्पचे मेंबर संकलक धर्मेंद्र शर्मा यांना. प्रत्येक पात्राला जिवंतपणा देण्याचं काम कपाडियांच्या संवादांनी फारच उत्तम केलेलं आहे, सिनेमातल्या तोफांपेक्षाही बहारदार संवादांनी टॉकीज दणाणून सोडलं. नुसत्या टाळ्या-शिट्या. सिनेमॅटोग्राफर केईको नाकाहारा यांच्या कॅमेऱ्यातून टिपलेला सिनेमा खूपच सुंदर दिसतो, त्यांच्या गाठीशी मेरी कॉम, इंदू सरकार सारख्या सिनेमांचा अनुभव आहे. कला दिग्दर्शनाचं काम- देवीचं मंदिर, राजगडावरचा वाडा, बाजारपेठ,  इ. छानच, NYvfxwala आणि टीम यांचं काम तर खरच जबरदस्त, सजलाय सिनेमा त्यांच्यामुळं. लढाई हा सिनेमाचा अविभाज्य भाग, action director - रमझान बुलूत , Fight choreographer- माईक मूलर, Fight designer - दोल्गा देअरमन आणि टीम यांनी भन्नाट काम केलं आहे, प्रेक्षकांसाठी हे पाहणं म्हणजे मेजवानी आहे. रंगभूषाकारांनी ही छान काम केलं आहे. (सूर्याजी, शेलार मामा अन्य मावळे यांना मावळी पांढरा टिळा, महाराजांना चंद्रकोर आणि शिवगंध असतं तर look अजून खुलला असता.) नचिकेत बर्वे यांनी वेशभूषा विभागात चांगलं काम केलं आहे, याआधी त्यांनी 'कट्यार, काशीनाथ घाणेकर' या सिनेमामध्येही यासाठी उत्तम काम केलं आहे. (पण मला वाटतं पूर्णिमा ओक - स्वराज्यरक्षक संभाजी, फर्जंद, फत्तेशिकस्त च्या वेशभूषाकार यांनी यांत महारथ मिळवली आहे.) आणि आता कप्तानाबद्दल...नेहमीप्रमाणेच राऊत यांचं दिग्दर्शन उत्तमच. लोकमान्य, तान्हाजी जैसा आरंभ हैं प्रचंड तो आगे बढियाही होगा. आता त्यांनी स्वराज्य या शब्दाचं पेटंट घ्यायला हरकत नाही 😋.
       या सिनेमामध्ये गाणी व background score  हा पण तेवढाच महत्वाचा भाग आहे. संदीप शिरोडकर यांनी background score उत्तम केलेला आहे, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई, दबंग, डर्टी पिक्चर सारखे दमदार सिनेमांना याआधी त्यांनी केले आहेत. शंकरा:मेहुल व्यास (जबरदस्त डान्स नंबर आहे हा) माय भवानी:अजय अतुल (Ajay- Atul)( नेहमीप्रमाणेच कडक, यांत "हे उदं उदं" हे ऐकताना विशेष छान वाटतं, अजय-अतुल आहेत म्हटल्यावर असं मराठी लोकसंगीत बाजाचं एखादं गाणं हवं होतं असं वाटतं) तिनक तिनक- मस्त रोमँटिक वाटतं , घमंड कर:सचेत-परंपरा हे गाणं डोक्यात घुमत राहतं, सगळ्यात जास्त याचाच प्रभाव पडतो ते याच्या चालीमुळं, "रा रा रा" ही तानाजी थीम ठरलीय, अनिल वर्मा यांचे शब्द आणि सचेत- परंपरा यांचे स्वर आणि संगीत सगळंच कडकडीत.(शंकरा या गाण्याच्या श्रेयनामावलीत जसं आदर्श शिंदे (Adarsh Shinde) यांच नाव आहे तसं घमंड कर श्रेयनामावलीत गणेश चंदनशिवे (Ganesh Chandanshive) यांचं नाव का नाही?) युरी सूरी- मिर्झाराजे जयसिंग, अंगद म्हसकर-मोरोपंत या नटांना खूपच कमी स्कोप आहे हे बघून जरा वाईट वाटलं. अजिंक्य देव-पिसाळ, शशांक शेंडे-शेलार मामा, देवदत्त नागे-सूर्याजी यांची कामं लक्षात राहण्याजोगी. कैलाश वाघमारे-चुलत्या व गीत्याचं पात्र करणारा या दोघांचं विशेष कौतुक. लुक केनी-औरंगजेब, एक उत्तम प्रयत्न. पद्मावती राव- जिजाऊ मासाहेबांच्या मूर्तिमंत करारीपणाचं दर्शन. शरद केळकर - युगप्रवर्तक शिवछत्रपतींची भावनिक छटा सुंदर पद्धतीनं दाखवली. पाहूनच मुजऱ्यासाठी मान लवते. उदयभान- सैफ (Saif Ali Khan) खणखणीत कामगिरी, (लंगडा त्यागीचा अनुभव. नवरदेवाच्या वेशात नाचतानाच फक्त खिलजीचा भास झाला.) काजोल- ढाण्या वाघाची वाघीण शोभलीय. जबरदस्त. अजय देवगणने (Ajay Devgan) तर नेहमीच्या सहजतेनंच भूमिका वठवली आहे. ९९ सिनेमांचा तगडा अनुभव. नादखुळा परफॉर्मन्स. (पण गणेश यादव- फर्जंद आणि अजय पुरकर-फत्तेशिकस्त मला राहून राहून आठवत होते.)
                जीवंत बुद्धिबळातला उदयभानचा सहभाग, तो राठोड उदयभानपेक्षा उदयखान वाटेल याचा आटापिटा, कल्पनातीत नागीण तोफ, खऱ्या इतिहासापेक्षा घेतलेली लिबर्टी यागोष्टी बाजूला ठेवू पण असे ऐतिहासिक सिनेमे येण्याआधीच बोंबाबोंब का सुरू होते माहीत नाही? प्रसंग बदला, संवाद बदला; भावना दुखावल्या आहेत. भावना इतक्या तकलादू कशा काय असतात? खोटा/ विपरीत इतिहास दाखवला म्हणून शंखनाद. लोकहो Disclaimer नावाचा प्रकार आहे सुरुवातीला (कदाचित नवाबसाहेबांनी प्रीमियरला हे वाचलं नसावं) एकदा सेन्सर बोर्डानं दिली परवानगी झालं की मग! बाकीच्यांची लुडबूड काय कामाची? आधीच तयार झालेल्या धर्मांध वातावरणात निधर्मी देशात हा सिनेमा अजून धार्मिक तेढ निर्माण करतो आहे, अशी टीका मीडियानंही केली.  मध्ययुगात फक्त सत्तासंघर्ष नव्हता, धर्माचा राजकारणावर तेवढाच प्रभाव होता. वर्तमानात लोकशाही असताना इतका प्रभाव आहे, राजेशाहीत का नसेल? एक वेगळा लेख लिहावा लागेल हा असा विषय आहे. असो...
      पण एकूणच सिनेमा विशेष करून लढाई पाहताना लहानपणी ऐकलेल्या ओळी खूपच आठवत होत्या,
             धर्मासाठी झुंजावे। झुंजोनी अवघ्यासी मारावे।
             मारिता मारिता घ्यावे। राज्य आपुले।।
             देव मस्तकी धरावा। अवघा हलकल्लोळ करावा।
             मुलुख बडवावा की बुडवावा। धर्मसंस्थापनेसाठी।।

                              हर हर महादेव
                    🙏🏻 जय जिजाऊ जय शिवराय 🙏🏻

रविवार, १७ नोव्हेंबर, २०१९

फत्तेशिकस्त - एक भव्य सर्जिकल स्ट्राईक

                          (स्रोत : साभार इंटरनेट)
           
   
  तीन शतकांच्या पारतंत्र्याच्या भयाण काळरात्रीनंतर या महाराष्ट्र देशी स्वातंत्र्य सूर्याचा उदय होत होता. पण स्वराज्याची सोनेरी पहाट होण्यातही अजून अडथळे होतेच कारण झुंजूमंजू होण्याआधीच्या गडद अंधाराचे प्रहर कदाचित घट्ट पाय रोवून होते. ती शिवसुर्याची किरणप्रभा काळोखाच्या शृंखलांमध्ये अडकलेल्या भूमीकडे झेपावत होती तिला मुक्त करण्यासाठी. आणि अश्वारूढ झालेल्या शिवभास्कराने  शास्त्यारूपी भयाण अंधकाराला लाल महालात शिरून नेस्तनाबूत केले व अवघी रयत उजळून टाकली. हाच मराठी इतिहासातला पहिला सर्जिकल स्ट्राईक!
          इतिहास (History) मुळात जिव्हाळ्याचा विषय व छत्रपती हे दैवत म्हणून या कालखंडाबद्दल जितकं माहीत करून घेता येतं तितकं घेत आलो आहे म्हणून या सिनेमाची उत्सुकता फेसबुकावर त्याच्या संदर्भातली मराठी सिनेमुलखाचे शिलेदार दिग्पालजी लांजेकरांनी (Digpal Lanjekar) टाकलेल्या पहिल्या पोस्टपासून होती. पोस्टर पाहून  चित्रपटाचं कथानक काय असेल याचा अंदाज आला होता, उत्सुकता वाढत चालली होती. चित्रपट पाहून समाधान झालंं. "आरंभ हैैं प्रचंड" प्रमाणे फर्जंद (Farjand) गाजलाच, त्याचा गाठीशी असलेला अनुभव या सिनेमाच्या प्रोसेस दरम्यान उपयोगाला आला असावा हे दिसून येतं. शिवचरित्रातल्या सगळ्याच घडामोडी या नाट्यपूर्ण आणि थरारक आहेतच पण त्यातल्या एका विशिष्ट घटनेवर कलाकृती बनवणं हे आव्हान आहे. कारण मूळ ऐतिहासिक घटनेला अनुसरून बाकीच्या कथानकाची गुंफण करणं,  जेणे करून दृश्यगणिक सिनेमा पुढे सरकताना प्रेक्षकांच्या मनात घर करत जाईल यासाठी अनावश्यक गोष्टी टाळून एक दमदार पटकथा लिहिणं हा मोठा टास्क असतो. दिग्पाल यांनी हे काम ऊत्तम केलं आहे. इतिहासाची मोडतोड न करता आवश्यक तिथे सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन पटकथा लिहिणे हे त्यांनी योग्य साधलंय. शिवरायांच्या व्यवस्थापन कौशल्य/ management skill व मनुष्य रत्न पारखण्याची कला/ H. R. Skill याचं दर्शन प्रेक्षकांना कसं घडेल याच्यावर काटेकोर लक्ष दिलं गेलं आहे. अथपासून इति होईपर्यंत ते पडद्यावरचे आणि पडद्यामागचे असे सगळे कलाकार यांना त्या माहोलमध्ये ठेवून एक उत्तम कलाकृती घडवणं हे त्यांना जमलंय,  मी वैयक्तिक त्यांच्या संवादांंच्या प्रेमात आहे.  तत्कालीन मावळी प्राकृत भाषा, औपचारिक मराठी आणि विशेषतः ऊर्दूतील संवाद हे कान तृप्त करतात. एकूणच त्यांचा अभ्यास दांडगा आहे, सुयोग्य योजना करणे ही शिवरायांची शिकवण त्यांनी चांगलीच आत्मसात केली आहे, म्हणूनच दिग्पालजी हे एक उत्तम दिग्दर्शक, पटकथाकार आणि संवादलेखकांपैकी आहे हे परत सिद्ध झालं आहे.
           आर्ट डायरेक्टर 'प्रतिक रेडीज' यांच्या करता हे जास्त आव्हानात्मक झालं असावं कारण बहुतांश भाग हा रोहिडा, पन्हाळगड, राजगड या रिअल लोकेशन्स वर शूट झाला आहे तिथल्या वातावरणाचा परिमाण होत असतो. मुघल-मराठा दालने तसेच भटारखाना व स्वयंपाकाला लागणारी तत्कालीन भांडी व इतर साहित्य, लालमहाल, त्यातला दरबार असे सर्व सेटस् त्यांनी अतिशय उत्तम उभे करून ते आपणाला साक्षात शिवकाळात घेऊन गेले आहेत.   सिनेमाला अजून खुलवणारी गोष्ट म्हणजे पात्रांच्या वेशभूषा; उझबेकी, हबशी हा फरक तसंच शिंदेशाही पगडी-फेटे याची पात्रानुसार निवड हे अभ्यासपूर्ण व उत्तम काम 'पूर्णिमा ओक' यांनी केलं आहे.  जोडीला रंगभूषासुद्धा अप्रतिम. राजगडावरील पद्मावती माचीवरच्या नेढ्याच्या ठिकाणी चित्रित केलेलं सुंदर दृश्य पाहता 'रेशमी सरकार' यांच्या कॅमेऱ्यातून चित्रित झालेला सिनेमा खूप छान दिसतो. 'बब्बू खन्ना' यांची साहसदृष्ये ही उत्तम. 'प्रमोद काहर' आणि सहकारी यांनी संकलनाचं कामही खूप छान केलं आहे. 'देवदत्त मनीषा बाजी' यांचं पार्श्वसंगीत आणि गााणीही छान आहेत. मराठी लोकसंंगीत आणि शिवकाल हा नातेसंबंध समजूूून सूरेेख चाली बांधल्या आहेेेत. गोंधळ आणि अभंग व शेवटचं विजयगीत मस्तच पण 'जत्रेला चला' ही 'तुंबडी' (एक लोककला प्रकार) , ठुमरी आणि कव्वाली हे जास्त भावलं. यांवर कडी म्हणजे त्यांनी बाजीप्रभू, जिजाऊसाहेब, महाराज यांच्या music themes बनवल्या आहेत त्या एकदम कडक! तुंबडी गीत संकलनात कापलं गेलं असावं असं वाटत ते पाहायला अजून मजा येईल (विडिओ प्रसिद्ध करावा असेल तर) त्याचे शब्द सुंदर आहेत. खांडेकर आणि तुकोबारायांच्या रचनांबद्दल मी पामर काय बोलणार! पण गोंधळ सुद्धा पारंपरिक वाटला म्हणजे दिग्पालजींनी रचलाय यांवर विश्वास नाही बसत.
             मृणाल कुलकर्णी- जिजाऊसाहेब; दुसऱ्या माँसाहेब नाहीच मिळणार! नेहमीप्रमाणेच जबरदस्त, चिन्मय मांडलेकर-शिवराय यांची संवादफेक दमदार आहेच पण भावमुद्रांमधूनही महाराज उत्तम साकारले आहेत, अजय पुरकर-खरेच 'नरवीर' शोभलेत, मृण्मयी देशपांडे- केसर, निखिल राऊत-किसना यांनी जीव ओतून काम केलं आहे, समीर धर्माधिकारी-नामदारखान हे भाव खाऊन गेले आहेत. आस्ताद काळे-कारतलबखान चांगला निभावलाय, तृप्ती तोरडमल-रायबाघन या त्यांच्या वडिलांचा वारसा पुढे चालवणार नक्कीच, रमेश परदेशी/पिट्या भाई- पण भारीच आहेत, अक्षय वाघमारे-कोयाजी बांदल, विक्रम गायकवाड-चिमणाजी, रुची सावर्ण-सोयराबाई साहेब,नक्षत्रा मेढेकर -बहू बेगम, प्रसाद लिमये- बाळाजी, ऋषी सक्सेना- फत्ते खान, सिद्धार्थ झाडबुके इ. सर्व रंगभूमीचे सेवेकरी असल्यामुळे सगळ्यांचा अभिनय खणखणीत. शास्ता खान- अनुप सोनी हे हिंदी भाषिक असले तरी त्यांचीही नाळ रंगभूमीशी जोडल्यामुळे त्यांनी या प्रतिऔरंगजेबाच्या मूर्तिमंत क्रौर्याचं दर्शन घडवलंय. अंकित मोहन (Ankit Mohan) हे आता "दिल्ली का छोकरा" वाटतच नाहीत, पक्के सह्याद्रीचे ढाण्या वाघ वाटतात. हरीश दुधाडे हे बहिर्जी नाईक अक्षरशः जगलेत, त्यांच नृत्य-अभिनय हे सर्वच कडकडीत.
           कंक- सिधोजी कुस्तीसाठी लाल माती हवी होती का? कात्रज घाटाचं दृश्य अजून फुलवता कसं आलं असतं? हा झाला समीक्षणाचा भाग! तो नको कारण मी तितका मोठा नाही. पण त्यासाठीचे दमदार VFX व बजेट ही कदाचित मराठी चित्रसृष्टीची थोडी कमजोर बाजू! असो पण असे सेवेकरी जर या मायमराठी चित्रसृष्टीला मिळणार असतील तर तीही तेलुगू-तामिळप्रमाणे (Tollywood) विश्वात डंका वाजवेलच!
तर या फत्तेशिकस्त साठी इतकंच म्हणावं लागेल,
     भले भले!.!.!
     छत्रपती शिवाजी महाराज की जय!.!.!
                 
                

शनिवार, ९ मार्च, २०१९

माझी शाळा

              
        

               "माझी शाळा" या विषयावर निबंध लिहून बऱ्याच वेळेला शाई कागदावर ओतण्याचं काम केलं आहे. आमच्यातले काही सवंगडी ज्यांना शिक्षक "महाभाग" म्हणत ते नेहमीप्रमाणे 'नवनीत निबंधमाला' इतकी बेमालूम छापायचं काम करत की विरामचिन्ह सुद्धा बरोबर येत असत. म्हणूनच शिक्षकांनी त्यांचं असं बारसं केलं असावं....मजा येते जेंव्हा आपण जुने फोटो पाहत असतो, आणि हा अल्बम तर त्या सोनेरी दिवसांचा आहे तो पाहताना तोंडातून आपसूक वाक्य निघून जातं यार, मस्त होते ते शाळेचे दिवस!
आपल्या माणसांसमोर बोलताना, गप्पा मारताना कसला क्रम वगैरे लक्षात न घेता, औपचारिकता न ठेवता मनात येईल तसं सांगण्याचा प्रयत्न केलाय.
              ६ वर्षे वय नसल्यामुळे घराजवळ नगरपालिका शाळा नं. ३३ मध्ये जाऊन बसायचो, नंतर ६ वर्षे पूर्ण झाल्यानंतर पालकांनी नवीन शाळेत घातलं. कुणी विचारलं तर आवर्जून नाव सांगायचो, "डेक्कन एज्युकेशन सोसायटीची नवीन मराठी शाळा". जप्तीवाले बाईं, माने आणि वायदंडे बाईंच्या त्या वर्गात बडबडगीते, पाढे म्हणायला, आषाढीच्या दिवशी वारकरी, गोकुळाष्टमी दिवशी कृष्ण म्हणून फोटो काढून घ्यायला, कधी चुकून सतरंजी ओली केली म्हणून आमच्या लाडक्या म्हाताऱ्या मावशीबाईंचा मार खाण्यासाठी शाळेत यायचो. कधी नकला केल्या, गोष्ट सांगितली तर मुख्याध्यापिका वाडीकर बाईंची शाबासकी मिळायची. अशा रीतीने लहान गट, मोठा गट पार पडला. इयत्ता पहिली, आता पाटी जाऊन हातात वही- पेन्सिल आली होती. बांदल बाई आम्हाला परिसर अभ्यास, मराठी आणि गणित या विषयांचा परिचय करून देण्यासाठी होत्याच. वर्गशिक्षक आणि आम्हा मुलांचा खेळ हा सामाईक आवडता विषय म्हणून अभ्यासाबरोबर खेळाचाही आनंद आम्ही लुटला. इयत्ता दुसरी, चौगुले सर, यांच्यामुळे आमच्यात बरेच चांगले बदल घडले, कोंबडीचे पाय जे आमच्या वह्यांवर उमटायचे, त्यांना आणि आम्हाला दोघांनाही वळण लावायचं काम त्यांनी केलं. घरी बाबा आणि इथे सर म्हणजे नुसतं छडी लागे छमछमच; यामुळे हस्ताक्षर आणि आम्ही कायमचेच सुधारलो. दिवाळी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सर शिबीर भरवायचे. आम्ही गावाला जाण्यापेक्षा शिबिराला पळायचो. खूप सारे खेळ खासकरून घोडेस्वारी शिकण्याची मजा यायची. सर कवितेला भन्नाट चाल लावायचे;  "पलीकडे ओढ्यावर" या कवितेला लावलेली धनगरी गीताची चाल त्यामुळे आजही ती कविता ओठांवर आहे आणि सरांची नक्कीच आठवण होते.
                  इयत्ता ३री म्हणजे सगळंच नवीन. जुन्या दगडी इमारती मधून आता नवीन इमारतीमध्ये आलो होतो. शाळेचं नांव ही बदललं होतं, "श्री कांतीलाल पुरुषोत्तमदास शहा प्रशाला'. वर्गशिक्षिका कुलकर्णी बाईंबद्दलच्या ठळक आठवणी म्हणजे माझ्या शांत स्वभावामुळे बाईंचा मार खूप खाल्ला आहे. चौथी म्हणजे आधीच स्कॉलरशीप मुळे टेन्शन आणि वर्गशिक्षक माने सर. तसं भीतीदायक म्हटलं पाहिजे कारण कडक शिस्तीचे माने सर कदाचित ते स्काऊट गाईडचे वर्ग ही घ्याचे त्यामुळे असावेत पण इतिहास म्हणजे माने सर असं पक्कं समीकरण. साक्षात छत्रपती शिवाजी महाराज मुलांसमोर उभे करायचे ते. आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे त्यांचा हातखंडा. त्यांच्यामुळे विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तमोत्तम गुण मिळवून नाव लौकिक वाढवला. तसेच पाचवीचे मुलांचे लाडके जोशी सर. गणित आणि भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास. ढ भोपळा सुद्धा या चांगले गुण मिळवेलच इतके छान शिकवायचे सर. त्यांनी जेंव्हा शाळा सोडली तेंव्हा बऱ्याच मुलांच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. तसेच मुलांसाठी अतोनात कष्ट घेणारे कै. कर्नाळे सर. त्यांचा विषय  खरतर त्यांचा विषय इंग्लिश पण २००३ च्या आमच्या स्कॉलरशीप बॅचसाठी सर स्वतः बुद्धिमत्ता आणि गणित चा अभ्यास करत मग आम्हाला शिकवत. आपला प्रांत नसतानाही समोर आलेली गोष्ट challenge  म्हणून स्वीकारणे आणि त्यात पारंगत होणे हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. अजून एक महत्त्वाचं नांव म्हणजे मुख्यध्यापिका पटवर्धन बाई. कायम प्रसन्न मुद्रा, पण कडक शिस्त. कोणत्या वर्गातला कोणता विद्यार्थी कशात पटाईत आहे हे त्यांना चांगलं ठाऊक असायचं. म्हणूनच शिक्षणाबरोबर बाह्य बौद्धिक आणि क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी मुलांना कायम प्रोत्साहन द्यायच्या.
                       माध्यमिक म्हणजे ८ वी ते १० वी म्हणजे शाळेतली शेवटची ३ वर्षे म्हणून दंगा-मस्ती, खेळ आणि झालंच तर अभ्यास ही मनसोक्त करून घेतलं. आजही कोल्हटकर बाईंच्या मराठीच्या कविता आणि संस्कृतची सुभाषिते, कावडे मॅडमचे इंग्लिशचे तास, लिमये सरांचे गणित आणि विज्ञान १ शिकताना कायम सकारात्मक असण्याबद्दल सांगितलेल्या काही गोष्टी, शशिकांत पाटील सरांचं मुलासाठी वेगवेगळी पुस्तकं आम्हाला वाचण्यासाठी मिळावीत म्हणून झटणं, मुख्याध्यापिका पाटील बाईंनी विद्यार्थ्याने कुठे चूक केली तर पाठीत धपाटा घालणं आणि कुठल्या स्पर्धेमध्ये यश मिळवल्याबद्दल पाठीवर हात ठेवून त्याच कौतुक करणं सगळं आठवतं. आवर्जून नाव घ्यावं असे म्हणजे मोने सर. पण तेंव्हा आमची १० वी होऊन गेली होती आणि सर मुख्याध्यापक झाले. डॉ. दाभोळकर, अनिल अवचट यांसारख्या मोठ्या व्यक्तींची आणि मुलांची त्यांनी गाठभेट घडवली, शाळेचं वातावरण पूर्ण च बदलून टाकलं. पवार काका, मायणे काका, पोतदार काका, कांबळे काका आणि सव्वाशे मावशी यांनाही आम्ही विसरलो नाही. मला त्या वार्षिक क्रीडा स्पर्धा, बौद्धिक स्पर्धा, स्नेहसम्मेलन या सूंदर भूतकाळात वाकून बघताना छान वाटतं, या सगळ्या गोष्टी आताच्या आयुष्यात खूप 'miss' करतोय.
                  पु.ल.च्या गोष्टीतले चितळे मास्तर, ते एकच होते पण आमच्याकडे फौज आहे या शिक्षकांची. तुमच्या ऋणातून मुक्त नाही होता येणार पण आज संधी आहे तर तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे "शब्देची गौरव पूजा करू".
प्रत्यक्ष हजर नाही राहू शकलो पण इथूनच तुम्हाला नमस्कार करतो, आणि थांबतो.

रविवार, २३ डिसेंबर, २०१८

तुंबाड- जिद्द आणि षडविकारांची कहाणी....

               
                            (स्रोत : साभार इंटरनेट)

       १९१३ साली सुरू झालेल्या भारतीय सिनेसृष्टीची पाहिली काही वर्षे पौराणिक चित्रपट व१९३१च्या "आलम आरा" या बोलपटा नंतर ऐतिहासिक विषयांवर आधारित सिनेमे बनवले गेले. नवरसांपैकी काही प्रकारांवर आधारीतच सिनेमे तयार झाले. अजून  काही प्रकार ज्यांना सध्याच्या भाषेत genre असं म्हणतात  अद्भूत, रौद्र, भयानक इ. बाकी होते. भयपटांचा जन्म होण्यासाठी १९४९ साल उजाडले, 'महल' हा कमाल अमरोही दिग्दर्शित पहिला भयपट म्हणता येईल त्यानंतर बीस साल बाद, गुमनाम , दो गज जमीन के नीचे पासून ते रात, भूत, राज अशी भली मोठी यादी देता येईल. आता यामध्ये भर पडली ती एका नव्या सिनेमाची.....
तुंबाड.....(Tumbbad)
             बॉलीवूड भयपटांचा चेहरा मोहरा बदलणारा म्हणून त्याचं सर्वत्र कौतुक  होत आहे. व्हेनिस फिल्म फेस्टिवल मध्ये ही याचा बोलबाला झाला. खरतर गूगल किंवा विकिपीडिया यांप्रमाणे त्रिकालज्ञानी नसल्यामुळे तुंबाड बद्दल , त्याच्या दिग्दर्शक किंवा कलाकारांबद्दल काहीच माहिती नव्हती. 'संगीत:अजय-अतुल' (Ajay - Atul) या एका गोष्टीमुळे सिनेमाबद्दल उत्सुकता निर्माण झाली. सिनेमा आणि संगीत या दोन्ही गोष्टींचा नाद असलेल्या माझ्या सारख्या माणसाला नवीन दृक्श्राव्य मेजवानी हवीच असते.
              'प्रयत्ने वाळूचे कण....' या ओळीला सार्थ ठरवणं किंवा प्रत्यक्षात उतरवणं म्हणजेच 'तुंबाड' आहे. तसं एका ओळीत त्याचं वर्णन करणं हे खूपच धाडसाचं काम आहे कारण तो केवळ एका कथेचं छायाचित्रण नाहीए; ती एक तपश्चर्या आहे, कारण तुंबाडची जन्मकथा ऐकताना हे लक्षात येतं. लेखक-दिग्दर्शक राही अनिल बर्वे (Rahi Anil Barve) यांचा हा पहिलावहिला चित्रपट. १९९७ मध्ये नागझिराच्या जंगलामध्ये एका रात्री मित्राकडून ही कथा ऐकताना अनुभवलेली भीती नंतर त्यांनी ७०० पानांत शब्दबद्ध केली.... १९९७- २०१२ 'तुंबाड' हा काळाच्या गर्भात होता. आणि शूटींग सुरू होण्यासाठी २०१२ साल उजाडले. हा काळ बर्वेंसाठी खूपच कठीण होता. संयम, चिकाटी-जिद्द, मेहनत आणि त्यावरचा विश्वास या त्यांच्या अंगी असणाऱ्या सगळ्या गोष्टींची कसोटी घेणारा तो काळ... या काळात बर्वेंच्या आईचे आजारपण व निधन नंतर अनुराग कश्यप यांनी दिलेला मदतीचा हात ही तुंबाडच्या निर्मितीच्या पडद्यामागच्या गोष्टी आहेत. काळाच्या भट्टीमध्ये तावून सुलाखून निघालेल्या तुंबाडच सोनं झालं कारण आनंद एल्. राय आणि सोहम शहा (Soham Shah) (शीप ऑफ थिसिस फेम) असे मातब्बर निर्माते त्याला मिळाले.
                    तुंबाड हा सिनेरसिकासाठी full of surprises आहे. सासवडच्या ज्या वाड्यात बहुतांश भाग चित्रित अर्थात शूट झाला आहे त्यात सेट्स कोणते आणि खरा वाडा कोणता यातला भेद करता येत नाही. Scene साठी लागणारा योग्य प्रकाश , वातावरण मिळण्यासाठी निर्माता- अभिनेता सोहम शहा पासून टीमचा प्रत्येक माणूस यांचं तासन्तास वाट पाहत राहणं हे थक्क करणारं आहे. अजून भरीस भर म्हणजे पाऊस हा या कथेचा अविभाज्य भाग असल्यामुळे पावसाचे सर्व scenes हे खऱ्या पावसातच शूट केले गेले. 'पांडुरंग' नावाचं पात्र रंगवणारा बालकलाकार मोहम्मद सामाद (Mohammad Samad) याने तर चित्रपटाच्या पहिल्या भागात असणाऱ्या विनायकच्या आजीही साकारली आहे जी राक्षसी आहे त्यासाठी त्याला 10 किलो वजनाचे Prosthetics परिधान करावे लागले आहेत. एकमेव गीत जे की शीर्षकगीत आहे त्याला अजय-अतुल यांनी नेहमीप्रमाणे छान संगीतबद्ध केले आहे पण हे गाणे अतुल गोगावले यांनी गाणे हे ही आश्चर्यकारक आहे.  बाकी कॅमेरामन पंकज कुमार यांचं छायाचित्रण उत्कृष्ट, बाफ्टा पुरस्कार विजेता आणि हिटमन सीरीज आणि अस्सासीन्स क्रीड या प्रसिद्ध विडिओ गेम्सना संगीत देणाऱ्या जॅसपर कॅड चे जबरदस्त पार्श्वसंगीत,सर्व कलाकारांचा अभिनय ही उत्तम. आदेश प्रसाद, राही बर्वे, आनंद गांधी आणि मितेश शहा यांनी पटकथा लिहिण्याचं काम सुंदर केलं आहे.
         सिनेमाची कथा मराठी साहित्य क्षेत्रातले प्रसिद्ध भयकथाकार नारायण धारप यांच्या भयकथेवर आधारित आहे पण सिनेमा हा सम्पूर्णपणे भयपट म्हणण्यापेक्षा भय , रहस्य , साहस इत्यादी प्रकारांमध्ये मोडतो. त्याला भयपट का म्हणावं याबद्दल  youtube वर असलेल्या एका मुलाखती मध्ये राही बर्वे सांगतात , "तुंबाड में भूत नही इंसान डराते हैं " (खरंतर हे ऐकल्यामुळे माझी सिनेमा पाहण्याची उत्सुकता अधिकच वाढली.) ते अस का म्हणाले? याचं उत्तर पाहताना प्रत्येक वेळी मिळतं.
"सगळ्यांची गरज भागवण्याचं काम निसर्ग करतो पण प्रत्येकाची हाव पुरी करण्याचं नाही- महात्मा गांधी" या वाक्यापासून सिनेमा सुरू होतो. तीन कालखंडात याची कथा घडताना दाखवण्यात आली आहे.
१९१८ सालचा पहिला भाग, १९३३ चा दुसरा व १९४७ चा स्वतंत्र भारतातला तिसरा.
पुराणकालीन एक कथा ज्यात समृद्धीची देवी, पृथ्वी तिचा गर्भ आहे व ती अमर्याद धन (सोनं) - धान्याचं प्रतीक आहे. ती १६ कोटी देवतांना जन्म देते पण थोरला मुलगा हस्तर तिचा जास्त लाडका असतो जो अत्यंत लालची असतो देवीच्या सर्व सोन्यावर तो कब्जा करतो आणि धान्याकडे नजर वळवतो तेंव्हा बाकी देवता त्याचा पराभव करून त्याला शाप देतात, म्हणून त्याचा उल्लेख ना वेद-पुराणात आहे ना त्याचे कुठे मंदिर आहे. पण तुंबाड गावात राहणारे एक कुटुंबीय हस्तरची आराधना करून त्याला प्रसन्न करून घेतात आणि आपल्या वाड्यात त्याचं मंदिर बांधतात. पिढ्यान्पिढ्या हस्तरची भक्ती चालूच आहे आणि त्याच्याकडून मिळणाऱ्या सोन्याचा ओघ ही अखंड आहे. दुर्जनांच्या संगतीला जाणारे दुर्जनच होतात. हस्तर हावरट आहेच आणि त्याची भक्तावळही तितकीच हावरट आहे. हस्तरला हाव आहे ती केवळ अन्नधान्याची पण भक्तावळीची हाव मोठीच हस्तरपेक्षाही जास्त कारण अन्नाबरोबर सोने-खजिना यांचा मोह त्यांना न आवरता येण्यासारखा आहे. सोबतीला कामवासना , मत्सर, क्रोध याचीही देणगी आहेच. या कुटुंबातल्या मागच्या पिढ्यांनी पुढल्या पिढ्यांना हे दुर्गुण वारसा स्वरूपात दिले असावेत असं वाटतं. षडविकारांच्या आहारी गेलेली ही कथानकातील पात्रे त्या षडविकारांच्या हातातल्या कटपुतल्या वाटतात. म्हणून बर्वे यांनी म्हटलेलं "इंसान डराते हैं" हे वाक्य पटतं. या षडविकारांचे भोक्ते असणाऱ्या पात्रांच्या नशिबी दुर्दैवी मृत्यू तरी किंवा वर्षानुवर्षे मृत्यूची वाट बघत जगणं तरी येतं असं सिनेमात दाखवलं गेलं आहे.
म्हणून आपल्या संतांनी 'सज्जनांची संगत धरा आणि षडरिपूंचे दमन करा' अशाच प्रकारचा संदेश दिला आहे.
         तर अशीही जिद्द-चिकाटी आणि मेहनतीचा महिमा सांगणारी आणि षड्विकारांचे दर्शन घडवणारी साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण !.!.!

शनिवार, ९ सप्टेंबर, २०१७

ब्रह्मं जानाति........

                    


                    ब्रह्म जानाति इति ब्राह्मणः
        ही संस्कृत भाषेत सांगितलेली ब्राह्मण (ह ला म जोडलं जातं बरं का! कारण "गर्व से कहो" म्हणणाऱ्यां बहुतांशी महानुभावांनी या शुद्धलेखनाची माहिती घेतलीच नसावी) या शब्दाची व्याख्या. ज्याला ब्रह्म , अंतिम सत्य  समजलं आहे असा तो! तर "असा तो" किती ज्ञानी असेल याची कल्पना जर तुम्हाला ब्रह्म या शब्दाची व्याप्ती माहीत असेल तर नक्कीच येईल. तर ज्याला अंतिम सत्य काय आहे हे जर माहीतच आहे तर तो "असा" कसा ? हा प्रश्न मी नाही तर या शब्दाला स्वतःशी जोडणाऱ्या व्यक्तींच्या कर्तृत्वाचा इतिहास विचारतो आहे कारण त्यांचा इतिहासच तेवढा महान आहे. तर या महान इतिहासाचा धांडोळा घेत गेलो तर बहुतांशी भाग हा असमानता, अस्पृश्यता आणि अत्याचार अशाच गोष्टींनी भरला आहे हे सत्य नाकारून चालणार नाही कारण याचा गाभा आहे तो म्हणजे स्वतःला अकारण श्रेष्ठ समजण्याची वृत्ती - सुपिरिअरिटी कॉम्प्लेक्स!
        इतकी प्रस्तावना देण्याचा उद्योग यासाठी की पुण्याच्या कुणी डॉ. खोले बाईंनी अब्राह्मण कामवाली २ वर्षे घरी कामाला ठेवली आणि तिच्या शिवाशिवीमुळे त्यांचा "सोवळ्यातला देव" बाटला गेला म्हणे! बापरे अंतिम सत्य जाणणाऱ्यांचे असले फुटकळ विचार?
आता संतश्रेष्ठ श्री नामदेव शिंपी (मुद्दाम उल्लेख केलाय) यांचा नैवेद्य स्वीकारणारा, किंवा संत जनाबाई , कान्होपात्रा यांच्या मदतीला धावून जाणारा देव यामुळे कसा काय बाटू शकतो? हा फार मोठाच प्रश्न आहे.
आता त्या बाईंचा हा वैयक्तिक प्रश्न असेल पण याची तक्रार पोलिसात देऊन त्यांनीच तो सार्वजनिक केलाय मग चर्चा तर होणारच! या बाई हवामान खात्यात उच्च पदावर कार्यरत होत्या म्हणून त्यांच्या मानसिकतेवर टीका करताना त्यांच्या व्यावसायिक आयुष्यावर भाष्य करण्याची काहीच गरज नाही पण सोशल मीडियावरच्या  लोकांना हे भान नाही. असो तर या बाईंची किंवा त्या संबंधित असलेल्या समूहाची मानसिकता व तिचे पैलू पाहिले तर आमची वाणी, आमचे संस्कार, आमचे वळण , आमचे कर्तृत्व , आमची बुद्धी आणि या बरोबर बाय डिफॉल्ट येणारे आमचे श्रेष्ठत्व; आमच्याकडील शुद्धता आणि उच्च दर्जामुळे इतरांनी ते मान्यच करायला हवे. बरं ते मान्यही करू पण "विद्या विनयेन शोभते" हे वाक्य अंमलात आणलं जाताना दिसत नाही ना! एखाद्या दिव्यांग व्यक्तीसमोर धडधाकट व्यक्तीने स्वतःच्या धडधाकटपणाचे भांडवल करणे व त्याला दुजाभाव दाखवणे नंतर त्याची परिणती अत्याचारात होणे यांत कसले आले श्रेष्ठत्वाचे शहाणपण? आता एक  नवीन टूम काढली आहे या श्रेष्ठ लोकांनी , "आम्ही कसल्याच "कुबड्या" घेत नाही, आम्ही आमच्या हिंमतीवर पुढे जातो." हिंमतीवर पुढे जाणे आणि जाता जाता इतरांना ठेचणे हाच इतिहास वर अधोरेखित केला आहे आणि या सद्गुणांमुळेच बाकीच्यांना राजकीय व शैक्षणिक "कुबड्या" देण्यात आल्या आहेत म्हणून त्याची संपूर्ण माहिती न घेता त्याबद्दल काहीही बोलण्याचा नैतिक अधिकार श्रेष्ठ लोकांना नाहीच मुळी!  पूर्वजांच्या या उज्ज्वल इतिहासाचा त्रास पुढच्या पिढ्यांना भोगावा लागतो आहे हे त्यांना मान्य नाही. श्रेष्ठत्वाचा टेम्भा मिरवताना स्वतःचे जातभाई असलेल्या ज्या थोर व्यक्तींचे गोडवे हे गातात तेंव्हा हा विचार त्यांनी सोयीस्कररित्या बाजूला ठेवलेला असतो की ते थोर लोक आपल्या "आदर्शवादी विचारसरणीच्या" पूर्णपणे विरोधी वागलेत उदा. ज्ञानेश्वर माऊली, संत एकनाथ , श्रीमंत बाजीराव, आगरकर , न्यायमूर्ती रानडे, महर्षी कर्वे , सावरकर , महात्मा फुलेंना शाळेसाठी जागा देणारे भिडे इ. भले जग जरी चंद्रावर चाललं आहे तरी यांचा डोंगरावर राहण्याचाच अट्टाहास का? हे कळायला वाव नाही.
         ही मानसिकता आत्यंतिक कळकळीने फक्त जानवेधारकांनीच नाही तर वर्णव्यवस्थेतल्या बाकीच्या २ वर्णांनीही तितक्याच कसोशीने जपली. काश्मीर ते कन्याकुमारी हीच परिस्थिती होती. आता बहुजनवादाच्या नावाखाली "त्यांच्या महिलांना घरातून बाहेर काढून घरे पेटवून द्या" किंवा " १९४८ ला जे झाले परत होऊ शकते" अशा विचारांचे छापील साहित्य निर्माण करून  द्वेष पसरवणे हे प्रकार दिसून येतात.  आपल्याकडील थोर समाजसुधारकांनी या मानसिकतेवर कोरडे ओढले आणि त्या मानसिकतेचा वेळोवेळी द्वेष केला कुणा व्यक्ती किंवा व्यक्तीसमूहाचा नाही हे समजण्याची कुवत कागदोपत्री ब्राह्मण आणि अब्राह्मण लोकांकडे नसावी ही दुःखाची बाब आहे.
              पोथीनिष्ठता हीच या विखारी मानसिकतेचा आधार आहे. कोणा एका व्यक्तीने कुठल्यातरी पुस्तकामध्ये जे काही त्याचे विचार मांडले त्याच अनुसरण किती काळ करावं? बरं ते काळाला अनुरूप आहे का? हा साधा विचार का केला जाऊ नये? इतके आपण संवेदनाहीन झालो आहोत का? सोवळं-ओवळं, शिवाशिव व संबंधित फालतू परंपरा देव किंवा पितारांनी न सांगता धर्माच्या दलालांनी सांगितल्या आहेत हे ही कळू नये? आणि त्या सर्व प्रथा परंपरा यांची वैधता सदैव का ठेवायची? जे कालबाह्य आहे त्याची चिकित्सा करून ते सोडून जे चांगलं आहे त्याचंच पालन केलं जावं ना! यातच समाजाचं भलं आहे. बरं हे सगळं समाजसुधारकांनी कंठशोष करून फार पूर्वीच सांगितलं आहे.
         तरीही सडक्या प्रथा-परंपरांना धरूनच ज्यांना देव-धर्म करायचा आहे अशा सर्व जातीधर्माच्या लोकांनी गुरू ठाकूर यांनी 'भारतीय' या मराठी सिनेमासाठी लिहिलेल्या खालील गीताचे बोल विचारात घ्यावेत आणि आमच्यासारख्या रिकामटेकड्यांना हे असं लिहिण्याची संधी देऊ नये ही नम्र विनंती!

        तुझ्या-माझ्यात भेटल साऱ्यात तो।
        शोध नाही कुठे या पसाऱ्यात तो।
        भाव भोळा जिथे धावला तो तिथे
        भाव नाही तिथे सांग धावल का?
    बघ उघडूनी दार अंतरंगातला देव घावल का?

वाचण्याचे अतोनात कष्ट घेतल्याबद्दल धन्यवाद!.!.!
        

मातृ दिनाच्या इतिहासाची कहाणी

                              प्रेम स्वरूप आई वात्सल्यसिंधु आई                  बोलावू तुज आता मी कोणत्या उपायी                             ...